स्मार्टफोनच्या कोणत्याही विद्यमान वापरकर्त्यांला नवीन स्मार्टफोनविषयीची अपेक्षा विचारली की, प्रोसेसर, रॅम आणि स्टोअरेज यांच्याआधी तो जास्त बॅटरीक्षमतेची मागणी करतो. स्मार्टफोनच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या इंटरनेट, म्युझिक, व्हिडीओ, गेम्स, अ‍ॅप्स, मेसेंजर या सर्व सुविधांचा पुरेपूर वापर करायचा असेल तर त्यासाठी स्मार्टफोनची बॅटरी भक्कम असली पाहिजे. कारण बऱ्याचदा स्मार्टफोनची सकाळी पूर्ण चार्ज झालेली बॅटरी संध्याकाळ उजाडण्याच्या आधीच लोप पावलेली असते. यामुळे एकीकडे बाजारात पॉवर बँक्स अर्थात पोर्टेबल चार्जरची मांदियाळी सुरू असतानाच मोबाइल बनवणाऱ्या कंपन्याही बॅटरीच्या क्षमतेवर अधिकाधिक लक्ष देऊ लागल्या आहेत. यातीलच एक उदाहरण म्हणून जिओनीच्या ३००० एमएएच इतक्या बॅटरीक्षमतेच्या ‘पायोनिअर पी टू एम’ या स्मार्टफोनचा दाखला देता येईल.

दिवसेंदिवस विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोनच्या वैशिष्टय़ांमध्ये नवनवीन सुधारणा आणि भर पडत आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या दैनंदिन वापराचा सरासरी वेळ वाढत चालला असला, तरी त्या तुलनेत स्मार्टफोनच्या बॅटरीने फारमोठी झेप घेतलेली नाही. जास्त क्षमतेची बॅटरी वापरायची झाली तर त्यामुळे स्मार्टफोनची जाडी किंवा आकार वाढतो. यामुळे स्मार्टफोनच्या ‘स्लिम’ किंवा ‘हलक्या’ वैशिष्टय़ाला छेद दिला जातो. त्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी मर्यादित ठेवून फोनची जाडी आणि वजन कमी करण्यावर कंपन्या भर देतात. परंतु, अँड्रॉइडचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना आता बॅटरीची चणचण जास्त जाणवू लागली आहे. सर्व सुविधा असल्या तरी त्यांचा पुरेपूर आस्वाद घ्यायला बॅटरी पुरेशी नसेल तर काय फायदा, या विचाराने वापरकर्तेही जास्त बॅटरीक्षमता असलेल्या स्मार्टफोनना पसंती देऊ लागले आहेत. याच दृष्टिकोनातून बनवण्यात आलेला ‘पायोनिअर पी टू एम’ कमी किमतीत जास्त ‘पॉवर’ देणारा स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये ३ हजार एमएएच इतका बॅटरी बॅकअप ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे पूर्ण चार्ज झालेली बॅटरी दिवसभर व्यवस्थित चालते. या बॅटरीमुळे थ्रीजीवर ३०० व टूजी वर ३४० तास स्मार्टफोन चार्जविना चालू शकतो, असा कंपनीचा दावा आहे.जिओनी पायोनिअर पी टू एम ही जिओनीच्या २०१३मध्ये बाजारात दाखल झालेल्या पायोनिअर मालिकेतील सुधारित आवृत्ती आहे. अँड्रॉइड लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या या स्मार्टफोनमध्ये ‘अमिगो पेपर’ या जिओनीकृत ‘यूजर इंटरफेस’ची तिसरी आवृत्ती आहे. त्यामुळे स्मार्टफोन दिसायला आकर्षक आहे. यामध्ये काही ‘थीम्स’ वेगळय़ा असून ‘विंडोज’फोनमध्ये आढळणाऱ्या ‘टाइल्स मेनू’ची प्रचीती देणारा मेनू असलेली थिम वेगळी आणि सहज हाताळता येण्यासारखी आहे. डिस्प्लेच्या पातळीवर बोलण्यासारखे विशेष ‘पी टू एम’मध्ये नाही. मात्र फोनचा डिस्प्ले त्याच्या किमतीच्या तुलनेत निराश करत नाही. चार इंची आकाराच्या डिस्प्लेचे रेझोल्युशन ४८० बाय ८०० पिक्सेल्स इतके आहे. सध्या पाच किंवा साडेपाच इंची डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनना अधिक मागणी आहे. मात्र, ‘पी टू एम’ची किंमत श्रेणी पाहता चार इंची डिस्प्ले ग्राहकांना पसंत पडेल, अशी शक्यता आहे. स्मार्टफोनची बॉडी प्लास्टिकची असली तरी ती मजबूत असल्याचे फोन हातात घेतल्याक्षणी जाणवते. मात्र, एकंदर दिसण्याच्या बाबतीत हा फोन सर्वसामान्य वाटतो.या फोनमध्ये १.३ गिगाहार्ट्झचा प्रोसेसर असून एक जीबी रॅम आहे. फोनची अंतर्गत मेमरी १६ जीबी असून मायक्रोएसडी कार्डनिशी स्टोअरेज क्षमता ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. अँड्रॉइड लॉलिपॉप या सध्याच्या सर्वात आधुनिक अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर असलेला हा फोन वेगाने आणि सहजपणे काम करतो. व्हिडीओ पाहात असतानाच ब्राउजिंग करून अथवा ई-मेल पाठवण्यात काही अडचण येत नाही.जिओनी पायोनिअर पी टू एमची किंमत ६९९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या किंमत श्रेणीतील स्मार्टफोनमध्ये असलेली सर्व वैशिष्टय़े ‘पी टू एम’मध्येही पाहायला मिळतील. मात्र, या फोनचा कॅमेरा बऱ्याच बाबतीत निराशा करणारा आहे. मागे पाच मेगापिक्सेल आणि पुढे दोन मेगापिक्सेल क्षमतेचा कॅमेरा असल्याने फोटो काढण्याची हौस असलेल्यांना हा स्मार्टफोन पसंत पडणार नाही. त्यातही मागील कॅमेऱ्यातून काढलेल्या छायाचित्रांना ‘ग्रेन्स’ दिसतात शिवाय ‘झुमिंग’ किंवा ‘लाइट अ‍ॅडजस्टमेंट’ची सुविधाही फारशी समाधानकारक नाही. ‘पी टू एम’ची सर्वात पडती बाजू त्याचा कॅमेरा ठरू शकतो.या स्मार्टफोनची एकंदर वैशिष्टय़े पाहता, ज्या किंमत श्रेणीतील ग्राहकांसाठी तो बनवण्यात आला आहे, त्या श्रेणीतील ग्राहकांना ‘पी टू एम’ भावेल, असे वाटते. सात ते आठ हजार रुपये किमतीच्या श्रेणीतील स्मार्टफोनमध्ये इतक्या मोठय़ा क्षमतेची बॅटरी क्वचितच आढळते. ही ‘पी टू एम’ची सर्वात जमेची बाजू आहे. त्या बाबतीत हा स्मार्टफोन ‘पॉवर हाऊस’ आहे.

पी टू एमची वैशिष्टय़े

१.३ गिगा हार्ट्झचा क्वाड कोअर प्रोसेसर
एक जीबी रॅम
१६ जीबी अंतर्गत स्टोअरेज.
३२ जीबीपर्यंत मायक्रोएसडी स्टोअरेजची सुविधा
चार इंच आकाराचा डिस्प्ले
डय़ुअल सिम (थ्रीजी, टूजी)
ब्लूटूथ, वायफाय
पाच मेगापिक्सेल बॅक कॅमेरा
अँड्रॉइड लॉलिपॉप ५.१
किंमत ६९९९ रुपये

 

– आसिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com