फूजीफिल्म ही एकेकाळी नावाजलेली कंपनी डिजिटल जमान्यात काहीशी मागे पडल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. मात्र गेल्या वर्षीपासून त्यांनीही या बाजारपेठेमध्ये एक चांगली आघाडी उघडलेली दिसते. बाजारपेठेची खास करून तरुण पिढीची मानसिकता लक्षात घेऊन त्यांनी आता बाजारपेठेत मुसंडी मारलेली दिसते. त्यामुळे पॉइंट अ‍ॅण्ड शूट कॅमेरा बाजारपेठेत आणतानाच कमी व परवडणाऱ्या किंमतीसोबत चांगली रंगसंगती आणि त्याचबरोबर चांगले फोटो येण्यासाठीच्या भरपूर सुविधा असी रचना त्यात पाहायला मिळते. ही सारे वैशिष्टय़े असलेला फूजीफिल्म जेझेड १०० हा कॅमेरा कंपनीने अलीकडेच बाजारात आणला आहे.
 निळा, जांभळा, गुलाबी, लाल, करडा, चंदेरी आणि काळ अशा विविध रंगरूपात ही मॉडेल्स उपलब्ध आहेत. त्यासोबत २५ मिमी.ची लेन्स वापरण्यात आली आहे. तर त्याला ८एक्स झूमची जोड देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा १४ मेगापिक्सेल चित्रण देणारा कॅमेरा आहे. सध्या १४ मेगापिक्सेल ही क्षमता स्टँडर्ड होते आहे. त्यामुळे पॉइंट अ‍ॅण्ड शूट या मालिकेतील असला तरीही तो १४ मेगापिक्सेल असणे हे ग्राहकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. त्याला मागच्या बाजूस २.७ इंचाचा एलसीडी स्क्रीनही देण्यात आला आहे. विविध प्रकारचे शूटींग मोडस्ही देण्यात आले असून त्यातील एसआर ऑटो मोडमध्ये तर थेट एखादा प्रसंग टिपण्यास सिद्ध झाल्यानंतर तो कोणत्या मोडमध्ये चांगला टिपला जाईल, त्याचा निर्णय कॅमेराच स्वतच घेतो आणि चांगले छायाचित्र हाती येते. कॅमेऱ्यामध्ये डय़ुएल इमेज स्टॅबिलायझेशनची सोय असून त्यात आयएसओ ३२०० पर्यंत शूट करता येते. अर्थात त्यामुळेच कमी प्रकाशातही चांगले चित्र मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे हल्ली प्रामुख्याने चित्रण केले जाते ते सोशल नेटवर्किंग साईटस्वर अपडेटस्साठी. हे अपडेट टाकणे सोपे जावे, यासाठी या कॅमेऱ्याला स्पेशल सोशल नेटवर्क कनेक्टची सोयही देण्यात आली आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ८,४९९ /-