सुरुवातीला लॅपटॉपने, नंतर खिशातल्या टॅबलेटने आणि आता तर मोबाइलने संगणक बाजार पुरता गिळंकृत केला आहे. पण छोटय़ा स्क्रीनवर काम करण्यापेक्षा मोठय़ा स्क्रीनवर काम करण्याचा नवा प्रवाह पुन्हा दिसू लागला आहे. ही काळाची गरज लक्षात घेऊन आयबॉल आणि मायक्रोसॉफ्टने सहकार्याने खिशातल्या संगणकाची निर्मिती केली आहे. यामध्ये एक डोंगल देण्यात आले आहे जे आपल्या संगणकाचा सीपीयू म्हणून काम पाहणार आहे. पाहूयात काय आहे हे नवीन गॅजेट आणि त्याची उपयुक्तता.

काही महिन्यांपूर्वी इंटेलने संगणक स्टीक बाजारात आणली आणि संगणक आपल्या खिशात नेऊन ठेवला. याच पावलावर पाऊल टाकत आयबॉल आणि मायक्रोसॉफ्टने एकत्र येऊन एक संगणक स्टिक बाजारात आणली आहे. ‘स्प्लेन्डो पीसी-ऑन-स्टिक’ असे या उपकरणाचे नाव असून हे उपकरण आपल्या टीव्हीच्या एचडीएमआय पोर्टला जोडले की आपल्या टीव्हीचे संगणकात रूपांतर होते. इंटेलची स्टिक ही भारतीय वापरकर्त्यांची मानसिकता लक्षात ठेवून बनविण्यात आली नसून, ती एक प्रयोग म्हणून बनविण्यात आली होती. यामुळे त्याच्यासमोर आयबॉलची ही स्टिक केव्हाही सरस ठरते. या स्टिकचा आकार इंटेलच्या स्टिकपेक्षा कमी असून, त्यात अतिरिक्त यूएसबी पोर्ट देण्यात आले आहे. याचबरोबर या स्टिकसोबत वायरलेस कीबोर्ड आणि माऊस देण्यात आला आहे.

काय आहे ही स्टिक..
खरेतर या स्टिकला नवतंत्रज्ञानातील जादूची काठी म्हटले तरी हरकत नाही. ही स्टिक आपण जर आपल्या टीव्हीतील एचडीएमआय पोर्टला जोडली आणि टीव्हीच्या सेटिंग्जमध्ये जाऊन एचडीएमआय डिवाइस निवडल्यावर तुमचा टीव्ही संगणकाच्या मॉनिटरमध्ये बदलून जाईल. ही स्टिक म्हणजे संगणकाच्या सीपीयूचे छोटेखानी रूप आहे. यामध्ये संगणक चालण्यासाठी आवश्यक ऑपरेटिंग प्रणाली आणि उपयुक्त सॉफ्टवेअर्स देण्यात आले आहेत. यामध्ये आपण आपला डेटा साठवून कोणत्याही ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. टीव्ही किंवा एचडीएमआय पोर्ट असलेल्या कोणत्याही स्क्रीनसह उपलब्ध उपकरणाला ही स्टिक जोडून त्याद्वारे आपल्या संगणकातील फाइल वापरू शकतो.

स्टिकची रचना
या स्टिकचा बॉक्स खूप मोठा आहे. पण तितकीच लहान ही स्टिक आहे. यासोबत कीबोर्ड आणि माऊस देण्यात आला आहे. जर तुमच्या टीव्हीला एचडीएमआय पोर्ट डाव्या किंवा उजव्या बाजूला असेल आणि त्याच्या आजूबाजूला टीव्हीची इतर कोणतीही रचना नसेल तरच तुम्ही ही स्टिक त्याला जोडू शकता. अन्यथा या स्टिकचा आकार पेनड्राइव्हपेक्षा खूपच मोठा असल्यामुळे ती जोडणे अवघड होते. ही स्टिक जोडल्यानंतर त्याला एक पॉवर बटण देण्यात आले आहे. याशिवाय मायक्रो यूएसबी पॉवर इनपूट आणि एक पूर्ण यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. तसेच उपकरणाला मायक्रो एसडी कार्डसाठी वेगळा स्लॉट देण्यात आला आहे. ही स्टिक आपण टीव्हीला जोडली की, त्याच्या बाजूचे सर्व पोर्ट वापरता येत नाही. हे टाळायचे असेल तर कंपनीने या खोक्यात दिलेल्या एचडीएमआय वायरचा वापर तुम्ही यामध्ये करू शकता. याशिवाय यामध्ये यूएसबी-ओटीजी अ‍ॅडप्टर देण्यात आले आहे, यामुळे तुम्ही त्याचा वापर करून दुसरा मायक्रो यूएसबी पोर्ट वापरू शकता. याच्यासोबत देण्यात आलेला कीबोर्ड आणि माऊस हा आयबॉलचाच असून याच्या कीबोर्डला खास आयबॉलचा लेआऊट देण्यात आला आहे. पण याचा कीबोर्ड आणि माऊस वापरण्यासाठी ‘एएए’ सेलची आवश्यकता भासते. अर्थात हे सेल या पॅकमध्ये देण्यात आले आहेत. कीबोर्ड आणि माऊसला युनिफाइड यूएसबी आरएफ रिसिव्हर देण्यात आला आहे. यामुळे तुम्हाला स्टिकवरचा एक यूएसबी पोर्ट यासाठी द्यावा लागणार आहे.

वापर आणि दर्जा
याचा वापर करणे खरोखरच अगदी सोपे आहे. टीव्ही, मॉनिटर किंवा प्रोजेक्टरच्या एचडीएमआय पोर्टमध्ये ही स्टिक तुम्ही जोडली की पॉवर ऑन केल्यावर तुमची स्टिकी सुरू होते. यामध्ये विंडोज ८.१ ही ऑपरेटिंग प्रणाली देण्यात आली आहे. याची जोडणी पूर्ण झाली की मग ताबडतोब आपल्याला संगणकासारखी स्क्रीन तेथे दिसते. हे एकदा जोडले की अगदी वाय-फाय जोडणीपासून आपण कोणतीही गोष्ट येथे करू शकतो. यामध्ये एक मोठी अडचण येते की आपण कोणतीही विंडो सुरू केली, की यामध्ये १९२० गुणिले १०८० रिझोल्युशनचे आऊटपूट येते. यामुळे अनेकदा प्रोग्रामच्या वर देण्यात आलेला मिनिमाईझ, क्लोज आणि स्क्रीन मोठी किंवा छोटी करण्याचे पर्याय असलेला बार आणि विंडोजचा टूलबार स्क्रीनवर दिसत नाही. डेस्कटॉप मॉनिटरच्या स्क्रीनवर ते योग्य प्रकारे दिसते. पण ३२ इंचांच्या टीव्हीवर मात्र व्हिडीओ आणि फोटोचे पिक्सेल विस्तारलेले दिसतात. पण जर आपल्या मॉनिटरवर किंवा टीव्हीला संगणकासारखे पर्याय उपलब्ध असतील तर आपण ही स्टिक अगदी सहजपणे वापरू शकतो. या स्टिकचा दर्जा हा एखाद्या बजेटेड टॅबलेटप्रमाणे आहे. यामुळे ही स्टिक टॅबला पर्याय ठरू शकते. इंटेलच्या स्टिकच्या तुलनेत या स्टिकमध्ये वेब ब्राऊझिंगचा अनुभव खूप चांगला आहे. यामध्ये इंटेलचा अ‍ॅटोम झेड ३७३५ हा प्रोसेसर वापरण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये दोन जीबी रॅम आणि ३२ जीबीची अंतर्गत साठवणूक देण्यात आली आहे. यात वायफाय आणि ब्लू-टूथ ४.० जोडणी देण्यात आली आहे. यामध्ये आपण मायक्रोएसडीच्या मदतीने साठवणूक क्षमता ६४ जीबीने वाढवू शकतो.

थोडक्यात
पाठीवर मोठा लॅपटॉप घेऊन जाण्यापेक्षा हा खिशातला संगणक कधीही तुमच्या मदतीसाठी उपयुक्त ठरू शकतो. यामध्ये तुम्ही तुम्हाला उपयुक्त अशा गोष्टी साठवून त्या तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. ही स्टिक तुमच्या संगणक किंवा लॅपटापला पर्याय ठरणार नाही. पण प्रवासातील ओझ्याला नक्कीच पर्याय ठरू शकते. याची किंमत ८९९९ रुपये असून, यामध्ये स्टिकसोबत कीबोर्ड आणि माऊसही देण्यात आला आहे. एवढय़ा किमतीत उपलब्ध हा संगणक आपल्याकडे असलेल्या गॅजेटपैकी एक ठरू शकतो.

niraj.pandit@expressindia.com