कृषी क्षेत्रात मोठा उपयोग
पूर्वीच्या काळी कुणी कल्पना केली नव्हती, पण घरात वाढणाऱ्या बुरशीतून अॅलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिनसारखे क्षयावरचे गुणकारी औषध तयार केले. वनस्पतींमध्येही अनेक परजीवी बुरशी व कवके वाढत असतात, त्यांचा उपयोग आपल्याला औषधांसाठी करता येतो. अशाच एका नवीन संशोधनात प्रियांका कुडाळकर या भारतीय युवतीने व तिच्या सहकारी संशोधकांनी मस्कोडोर सुतुरा या बुरशीचे औषधी गुण शोधून काढले असून त्याच्या मदतीने हानिकारक जीवाणूंना मारता येते.
अमेरिकेतील मोंटाना स्टेट युनिव्हर्सिटीत वनस्पती विज्ञान विषयात संशोधन करणारी मूळची मुंबईची असलेली प्रियांका कुडाळकर,जी. स्ट्रॉबेल, एस. रियाझ उल हासन व  ब्रिगहॅम यंग विद्यापीठातील बी. गिअरी व सेंटर फॉर लॅब सव्र्हिसेस-आरजे ली ग्रुपचे जे. सिअर्स यांनी संयुक्तपणे हे संशोधन केले आहे. डॉ. गॅरी स्ट्रॉबेल यांच्या प्रयोगशाळेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात आले आहे. मायकोसायन्स या नियतकालिकात याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अनेकदा आपण असे पाहतो की, रखरखीत वाळवंटातही काही झुडपे तग धरून राहतात. कमी पाणी असतानाही काही वनस्पती त्यांची जीवनेच्छा सोडत नाहीत पण यामागे जे वैज्ञानिक सत्य दडलेले आहे ते म्हणजे या वनस्पतींमध्ये वाढणाऱ्या परोपजीवी बुरशी व कवके यांच्यापासून निर्माण होणारी रसायने मातीचे कितीही तापमान असले तरी या झाडांचे तापमान वाढू देत नाहीत. वनस्पतींना गुरांपासून धोका असतो त्यामुळे काही वनस्पतींमध्ये विषारी द्रव्ये म्हणजे अल्कलॉइड्स तयार करण्याचे कामही या बुरशी व कवकेच करीत असतात फक्त त्या आपल्याला वरून सहजासहजी दिसत नाहीत. एक प्रकारे हे निसर्गाच्या सहजीवनाचे उदाहरण म्हणता येईल या कण्हेरीसारख्या वनस्पतींमध्ये वाढणाऱ्या बुरशी व कवके यांच्यापासून निर्माण होणाऱ्या रसायनांमध्ये आहे. प्रियांका व तिच्या सहकाऱ्यांनी जे संशोधन केले आहे त्यात प्रेस्टोनिया ट्रायफिडी या कोलंबियातील जंगलात वाढणाऱ्या एका औषधी वनस्पतीच्या मुळात आतून वाढणाऱ्या मस्कोडोर सुतुरा ही आंतरबुरशी नोव्हेंबर २००९ मध्ये वेगळी करण्यात आली.  
 वर्षभर पाऊस असलेल्या या पर्जन्य जंगलात ज्या वनस्पती आहेत त्यातील कवके व बुरशी यांच्यातील गुणधर्मही वेगळे आहेत त्यामुळे तिथे जैवविविधता खूपच जास्त आहे. प्रेस्टोनिया ट्रायफिडी या वनस्पतीपासून वेगळी केलेली बुरशी बटाटय़ाच्या पोषण माध्यमात वाढवण्यात आली. या बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यामुळे त्यात ब्यूटनॉइक अॅसिड, २-मेथिल, थुजोपसिन, आयसोकॅरयोफायलिन, श्ॉमिग्रिन, ओलिक अॅसिड, नॅप्थालिन , १,२ बेन्झिनडायकाबरेक्सिलिक अॅसिड, डिसोसायटिल इस्टर ही रसायने तयार झालेली दिसून आली. विशेष म्हणजे बटाटय़ाच्या पोषण माध्यमात वाढणारी ही लालसर रंगातील धाग्यासारखी मस्कोडोर सुतुरा नावाची जी बुरशी आहे त्यात याच कुळातील एम. अल्बस, एम.फेंगीजेनेसिस, एम.क्रिस्पन्स या बुरशीपेक्षा वेगळे गुणधर्म आहेत. या संशोधनाबाबत प्रियांका कुडाळकर म्हणाली की, आम्ही जी मस्कोडोर सुतुरा ही बुरशी अशी आहे की, जिच्यापासून मिळणारी रसायने ही इतर बुरशी व जीवाणूंना रोखतात. जनुकीय पातळीवर करण्यात आलेल्या अभ्यासातून ही बुरशीची एक नवीन जात असल्याचे सिद्ध झाले आहे. कृषी क्षेत्रातही तिचा चांगला उपयोग होणार असून पिकांवर वाढणाऱ्या १९ घातक जीवाणूंना ती मारक ठरते. डॉ. गॅरी स्ट्रॉबेल यांनी इंधन तयार करता येईल अशी बुरशीची जात शोधून काढली असून त्यांच्या मते अशाप्रकारे इंधन तयार करता येणे शक्य आहे. शेतामध्ये जो कचरा निर्माण होतो त्यावर वाढणारी कवके व बुरशी यांचा अशाप्रकारे इंधनासाठी वापर करता येऊ शकतो त्यामुळे खर्चात मोठी बचत होते व तसे इंधन तयार करणारे यंत्रही त्यांनी विकसित केले आहे.
राजेंद्र येवलेकर