कल्याण-डोंबिवलीच्या पलीकडे झपाटय़ाने विकसित आणि नागरीकरण होत असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर या विस्तारित महामुंबईतील शहरांच्या तिजोऱ्या कुणाच्या ताब्यात द्यायच्या याचा फैसला आज, बुधवारी मतदारराजा करणार आहे. राज्यात एकत्र नांदत असलेल्या शिवसेना-भाजपने घेतलेली फारकत, निवडणुकीच्या धामधुमीत झालेली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या, शहरातील विकासकामांची रखडपट्टी आणि वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण झालेला नियोजनाचा प्रश्न अशा अनेक मुद्दय़ांभोवती या दोन्ही शहरांतील प्रचार घुटमळत राहिला. मात्र, आता मतदार कुणाच्या पारडय़ात आपले वजन टाकतात, यावर या शहरांतील पुढची सत्ता समीकरणे ठरणार आहेत. बुधवारी मतदान झाल्यानंतर गुरुवारीच निकाल लागणार असल्याने उमेदवारांना आपल्या भवितव्यासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नव्याने बांधकाम परवानग्या देण्यास न्यायालयाने मनाई केल्याने आता भविष्यात ठाणे जिल्ह्य़ातील अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांवर खूप ताण येणार आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांत नागरी सुविधा पुरविताना स्थानिक प्रशासनांवर खूप ताण येणार आहे. दोन्ही शहरांत शिवसेनेची सत्ता असून निवडणूक निकालातही याच पक्षाचे वर्चस्व राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत शहरांतील महत्त्वाची विकासकामे रखडल्याने सत्ताधाऱ्यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. शिवसेनेच्या कारभारावर हल्लाबोल करत भाजपने स्वबळाचा नारा दिला असला तरी केंद्र, राज्य आणि अनेक महापालिकांत एकत्र असलेले पक्ष   निवडणुकीनंतर सत्तासमीकरणे जुळवण्यासाठी एकत्र येऊ शकतात. ठाणे जिल्ह्यातील वेगाने नागरीकरण होत असलेली ही शहरे आपल्या ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात अक्षरश: रान पेटवले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री भास्कर जाधव, जीतेंद्र आव्हाड, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आदी नेत्यांनी प्रचार सभांमधून नागरिकांना विविध आश्वासनांची गाजरे दाखवली. तसेच काहींनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेकही केली. पण आता पूर्ण फैसला मतदारांच्या हातात असून जनता सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती देते, हे गुरुवारी स्पष्ट होईल.
निवडणूक आयुक्तांची भेट
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी या वेळी बदलापूर येथील आदर्श महाविद्यालयातील मतमोजणी केंद्राला भेट देत येथील यंत्रणेची पाहणी केली. या वेळी त्यांनी बदलापूर येथील निवडणूक प्रक्रियेचा व मतदान केंद्रांचा आढावा घेतला. बदलापूरची निवडणूक गेले काही दिवस गाजत असल्याने राज्य निवडणूक आयुक्तांनी दिलेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
बदलापुरात निवडणूक प्रचारादरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्याने मतदानाच्या दिवशी एसआरपीच्या दोन तुकडय़ा, स्ट्रायकिंग फोर्सची तुकडी, दोनशे पोलीस असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जलद प्रतिकार पथकाच्या पंधरा गाडय़ा, ज्या दर दहा मिनिटांना एक मतदान केंद्रावर फिरतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यात महिला पोलीस कर्मचारीदेखील असणार आहेत. तसेच, ११७ पैकी ६५ मतदान केंद्रांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. अंबरनाथमध्ये एक साहाय्यक पोलीस आयुक्त, सहा पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक बावीस, १५० पोलीस शिपाई व ४३४ पोलीस कर्मचारी एसआरपीएफच्या दोन तुकडय़ा आदी तैनात असणार आहेत. तसेच, अंबरनाथमधील बारा प्रभागांतील ४३ मतदान केंद्रे संवेदनशील  आहेत.

अंबरनाथ
* एकूण ५७ प्रभागापैकी ४ प्रभागात बिनविरोध निवडणूक. अन्यत्र ३२० उमेदवार.
* १५३ मतदान केंद्रांवर ११०० कर्मचाऱ्यांची फौज.
* एकूण २,१६,२३४ मतदारांमध्ये १,१६,९९० पुरुष, ९९२३० स्त्रिया तर १४ तृतीयपंथी.

बदलापूर
* एकूण ४७ प्रभागापैकी ५ प्रभागात बिनविरोध निवडणूक. अन्यत्र १५० उमेदवार.
* ११७ मतदान केंद्रांवर ८१९कर्मचाऱ्यांची फौज.
* एकूण १,५२,०७९ मतदारांमध्ये ८२,२३४ पुरुष, ६९,८३८ स्त्रिया.