हेडिंगमध्ये जुगाड वाटतोय ना? पण ते अचूक आहे. आपण आंघोळ रोज करतो (म्हणजे निदान तसं करणं अपेक्षित तरी आहे.) आपण रस्त्यावरच्या खड्डय़ांना रोज सामोरे जातो. दूरान्वयेही संबंध नसलेल्या या दोन कृतींचा परस्परसंबंध जोडला गेलाय. कसा?

रस्ता म्हणजे खड्डय़ांतून उरलेली जागा अशी व्याख्या एव्हाना तुमच्या गळी उतरून ती पचन वाटेला लागली असेल. तुम्ही स्मार्ट सिटीत राहणारे असाल, बकालतेच्या उंबरठय़ावरून अनागोंदीकडे वाटचाल करणाऱ्या सिटीतले असाल, शहर नाही पण गावही नाही अशा निमशहरी अर्थात सेमी अर्बन परिसरातले असाल, शौचालये कमी आणि स्मार्टफोन्स चौपट अशा गावचे रहिवासी असाल किंवा अगदी पार दुर्गम एकलकोंडय़ा पाडय़ावरचा आणि इंटलेक्च्युअल चर्चामध्ये वर्णिलेला समाज नावाच्या उतरंडीतला शेवटचा माणूस वगैरे असाल – सगळ्यांना रस्ता लागतो. प्रगती-उन्नतीचा मार्ग वगैरे अशा आध्यात्मिक वाटेवर जाऊ नका. ज्याच्या पृष्ठभागावरून जाताना गेल्या जन्मीचे काय भोग उरले होते असे उरी येते ती डांबरी सडक म्हणतोय आम्ही.

A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

अर्थात म्हणायला, अनुभवायला, अभ्यासायला रस्ताच शिल्लक नाही तो भाग वेगळा. बरं आम्ही चॅनेलीय चर्चातले एक्सपर्टही नाही. संगीत आदळआपट युनिट ऊर्फ डीजे इन्स्टॉल केलेल्या रिक्षेपासून गार हवेची झुळूक सोडणाऱ्या लेटेस्ट एसयूव्हीपर्यंत कशातही बसा-तुमची चिडचिड होणार. तुम्ही नगरसेवकापासून प्रधानसेवकापर्यंत मनात (काही जण जनातही)सगळ्यांना शिव्या देणार. निवडणुकीला मतदान करा, कर भरा आणि आमच्या नशिबी ही कवटं असा आत्मक्लेश करून घेणार. डांबर, रेती, खडी, वाळू, रोलर, डंपर, टेंडरं, कंत्राटदार अशा सगळ्या खडबडीत संकल्पनांची उजळणी करणार. हाडं आमची ठेचकाळणार, डॉक्टरांच्या फी आम्ही देणार आणि या रस्त्यासाठी आम्ही टोलही भरणार अशा तिहेरी नुकसान सापळ्यात अडकल्यासाठी तुम्ही स्वत:ला बोल लावणार. या राज्यात, देशात आपण ‘अच्छे नाहीच उलट दीनवाणे’ आहोत याची जाणीव होऊन तुम्ही परदेशगमनाचा विचार करू लागाल. तेवढय़ातच ओबांमांनाही नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देणार असल्याचा मथळा आणि निर्वासितांच्या जगण्याचे दुर्दैवी प्रतीक झालेला ‘ओम्रान दाक्वीन्श’चा रक्ताळलेला चेहरा तुमच्या डोळ्यांसमोर तरळणार. एकुणात बाहेर जाणंही तेवढं श्रेयस्कर नाही या निष्कर्षांप्रत येऊन आपण याच खातेऱ्यात सडणार यावर तुम्ही शिक्कामोर्तब करणार. पण मंडळी अजिबात हताश होऊ नका. रस्ते म्हणजे खड्डेप्रश्नी ग्लोबल जालीम उतारा सापडला आहे. या उताऱ्याविषयी पहिल्यांदा कळलं तेव्हा आम्ही हरखून गेलो. फक्त आपणच तिसऱ्या जगातले, कष्टी, वंचित, दुर्लक्षित, मिनिमम आनंद आणि मॅक्झिमम समस्या गटातले नाही हे पाहून आनंद झाला. समदु:खी भेटल्यावर बरं हे वाटतंच.

थायलंडमधल्या टॅक प्रांतातली ही सत्य घटना. मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत पाम नावाच्या युवतीला मेई रामत जिल्ह्य़ातल्या नातेवाईकांकडे जायचं होतं. फोनाफोनी झाली. जायची वेळ आणि रस्ता ठरला. पाम अपेक्षित वेळी पोहचली. मात्र वाटेत रस्त्यातल्या खड्डय़ांनी तिचा पिच्छा पुरवला. या खड्डय़ांविषयी स्थानिक प्रशासनाला कळवण्याचा विचार तिच्या मनात आला. पण ही परिस्थिती त्यांना ठाऊक का नाही? झोपलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाचं काय करणार हे ध्यानात घेऊन तिनं पत्राचा विचार सोडून दिला. या खड्डय़ांसह सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकू या असंही तिला वाटलं. पण तिथेही हल्ली बरेच रिकामे लोक फॉरवर्डेड गोष्टींची आयात-निर्यात करत असतात. आपल्यासमोर येणाऱ्या आणि आपण पाठवणाऱ्या मजकुराची शहानिशा देखील मंडळी करत नाहीत. सोशल मीडिया म्हणजे पटापटा अपडेट होणारी स्टेट्स आणि दर २० मिनिटांनी बदलणारे डीपी असंच झाल्याने सेल्फी आणि मजकुराचा मुद्दाही पामने बाजूला सारला. त्रास तर झालाय, त्याची दप्तरी नोंद व्हायला हवीच. काहीतरी अरभाट केल्याशिवाय सुस्त यंत्रणेला जाग यायची नाही हे जाणलेल्या पामला निषेध स्नानाची कल्पना सुचली.

पामनं रीतसर खड्डय़ांत बसून खड्डय़ातल्या पाण्याने प्रतीकात्मक निषेध स्नान केलं. पामनं जे केलं ती कृती करायला धैर्य लागतं. आपलंच उदाहरण घ्या. परीटघडीचे कपडे करून निघाल्यानंतर वाटेतल्या खड्डय़ांमुळे पँट किंवा सलवारवर चिखलाची फरांटेदार नक्षी तयार झाली की तुमचा किती जळफळाट होतो ते आठवा. जगभरातले जंतू माजलेल्या त्या रस्त्यावरच्या डबक्यात बसून प्रतीकात्मक आंघोळ करण्याचं धाडस पामने केलं. या निषेध स्नानाचे फोटो सोशल मीडियावर प्रकटले आणि जगभर बभ्रा झाला. पामप्रमाणे रस्त्यावरल्या खड्डय़ांनी वैतागलेल्या थायलंडमधल्या अन्य प्रांतातल्या बायाबापडय़ा, लहान मुलांनी खड्डय़ात बसून प्रतीकात्मक स्नानाचा फंडा अवलंबला. पामच्या निषेध स्नानाचा परिणाम झाला. टॅक प्रांताचं प्रशासन खडबडून जागं झालं आणि अवघ्या दोन दिवसांत पामने निषेध स्नान केलं तो रस्ता गुळगुळीत झाला.

आपलीही अवस्था पामपेक्षा फार निराळी नाही. प्रचंड अगतिक झाल्याशिवाय सामान्य माणूस असं टोकाचं वागत नाही. खड्डे बुजवा, रस्ते नीट करा असं न्यायालयाला प्रशासनाला वारंवार सांगावं लागतंय. बरं ही स्थिती चांद्यापासून बांद्यापर्यंत अशीच आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायाधीशांनी रस्त्यावरच्या खड्डय़ांमुळे पाठदुखीचा त्रास झाल्याचं सांगितलं होतं. ताळेबंदात रस्त्यासाठी दाखवला जाणारा निधी जातो तरी कुठे असा प्रश्न उरतोच. एकीकडे नवनवीन एक्स्प्रेस वे, हायवे, सुवर्ण चौकोन प्रकल्पांचा घाट घातला जातोय आणि दुसरीकडे आहे त्या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. देशासमोरच्या गंभीर प्रश्नांच्या तुलनेत खड्डय़ांचा प्रश्न मामुली. पण छोटय़ा गोष्टीतूनच मोठं कोडं सुटतं. कसं आहे- आंघोळ ही आडोशात करायची गोष्ट. बंदिस्त गोष्टी चव्हाटय़ावर येणं केव्हाही वाईटच. मग ती आंघोळ असो की अब्रू..

(तुमच्याही मनात निषेध स्नानाचं घोळत असेल. तुमच्या निषेध स्नानावेळी वाहतूक नियंत्रित करणं, खड्डय़ांमध्ये जंतूविरोधी औषध फवारणं, स्नानासाठी साबण, टॉवेल आणि चंबूची व्यवस्था, स्नानाचे फोटोसेशन या गोष्टींची जबाबदारी स्नानेच्छुक व्यक्तींनी घेणे अपेक्षित आहे.)