मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव हा दरवर्षी जल्लोषात साजरा केला जातो. पण ऑगस्ट अखेरीस स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाल्यावर स्पर्धेत आपली चमक दाखविणाऱ्या सर्वच कलाकारांना माध्यमांमध्ये संधी मिळते असे नाही. पण यंदा ही संधी युवा महोत्सवात सहभागी झालेल्या कलाकारांना मिळणार असून यासाठी आकाशवाणीने पुढाकार घेतला आहे.
युवा महोत्सवात विविध स्पर्धा मिळून दरवर्षी हजारहून अधिक कार्यक्रम सादर होतात. या कार्यक्रमांचे चित्रीकरण आणि ध्वनिमुद्रण विद्यापीठ दरवर्षी करतच असते. मात्र विद्यार्थ्यांंच्या या कला सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नव्हत्या. त्या पोहचवण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न सुरू असतानाच आकाशवाणीने याबाबत पुढाकार घेतला असून युवा महोत्सवात सादर करण्यात आलेले सर्व कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित केले जाणार आहेत. यामध्ये समूह गाण्यांचे कार्यक्रम, एकांकिका, लोकगीते, भाषणे, वाद-विवाद अशा विविध स्पर्धाचा समावेश असणार आहे. हे कार्यक्रम सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांंना पुन्हा आकाशवाणीवर बोलविले जाणार आहे. यासाठीचे मानधनही त्यांना दिले जाणार असल्याचे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मृदुल निळे यांनी स्पष्ट केले.
प्रथमच युवा महोत्सवातील कलाकारांना अशा माध्यमांमध्ये वाव मिळत असून यामुळे विद्यार्थ्यांंना नवीन संधी मिळण्याचा मार्ग खुला होईल अशी अशाही त्यांनी व्यक्त केली. युवा महोत्सवाचे कार्यक्रम सादर करणारे कलाकार हे खूप गुणी असतात. अशा कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी आकाशवाणीतर्फे कार्यक्रमाचे वार्ताकन केले जाते. पण त्यामध्ये काही मर्यादा येतात. यामुळे अशा कलाकारांना आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये बोलावून ध्वनीमुद्रण करण्याचा विचार आला आणि ‘युवावाणी’ कार्यक्रमात हे कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार असल्याचे आकाशवाणीतील कार्यक्रम अधिकारी नेहा खरे यांनी स्पष्ट केले. या माध्यमातून आकाशवाणीद्वारे चांगले कार्यक्रम लोकांना ऐकावयास मिळतील तसेच विद्यार्थ्यांंनाही चांगली संधी मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.