मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तब्बल सहा कोटी ४८ लाख रुपये खर्च करून वांद्रे-कुर्ला संकुलात बांधलेला सायकल ट्रॅक प्रकल्प सायकलस्वारांच्या प्रतिसादाअभावी अपयशी ठरला असून संकुलातील वाढत्या वाहनांच्या गर्दीत हा प्रकल्प अडथळा ठरू लागला आहे. पदपथालगत सुमारे दोन ते अडीच फूट जागा या सायकल ट्रॅकने व्यापल्यामुळे वाहतुकीचा रस्ता अरुंद झाला आहे.
मुंबईत सायकलस्वारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सायकलच्या वापरास चालना मिळावी या ‘उदात्त’ हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सायकल ट्रॅक प्रकल्प राबवण्याचे ठरवले. त्यानुसार वांद्रे-कुर्ला संकुलात पहिला सायकल ट्रॅक प्रकल्प राबविण्यात आला. त्याचे काम ऑक्टोबर २०१० मध्ये सुरू झाले आणि एप्रिल २०११ मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करीत मुंबईतील या सायकल ट्रॅकचे उद्घाटन करण्यात आले. सायकलस्वारांनी त्याकडे पाठ फिरवल्याने आणि मुळात सायकलस्वारांची संख्या नाममात्र असल्याने हा प्रकल्प अपयशी ठरला. या अपयशानंतर मुंबईत आणखी सायकल ट्रॅक बांधण्याचा विचार प्राधिकरणाने सोडून दिला.
हा सायकल ट्रॅक बांधण्यापूर्वी किती लोकांकडून त्याचा वापर होईल याचा अभ्यास वा सर्वेक्षण करण्यात आले नव्हते, अशी धक्कादायक कबुली प्राधिकरणाने दिली होती. वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘जी ब्लॉक’मध्ये असलेल्या या १९ हजार ६५२ चौरस मीटरच्या सायकल ट्रॅकसाठी तब्बल सहा कोटी ४८ लाख रुपये खर्च झाल्याचेही सांगण्यात आले. खरे तर कोणताही प्रकल्प राबवताना त्याचा वापर किती होईल याचा अभ्यास होणे आवश्यक असते. पण तसे न करताच साडे सहा कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली.
या सायकल ट्रॅकचा वापर तर होत नाहीच, शिवाय त्यावर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे संकुलात येणारी वाहने सायकल ट्रॅकच बाजूला रस्त्यावर उभी करावी लागतात. वांद्रे-कुर्ला संकुलात वाहतुकीची वर्दळ मोठय़ा प्रमाणात वाढत असून खासगी मोटार वाहने, टॅक्सी, रिक्षा ही संकुलातील रस्त्यांवर उभी असतात. त्यामुळे संकुलातील वाहतुकीसाठीचा रस्ता उभ्या असलेल्या वाहनांमुळे अडत आहे.
अनेकदा बेस्टची बस रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांपासून अवघ्या तीन-चार बोट अंतरावरून जाते. मुख्यत्वे वळणावरून बेस्ट बस जाताना लगत उभ्या असलेल्या वाहनांना धडक लागून अपघात होण्याचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे वापराविना मोकळ्या पडलेल्या या सायकल ट्रॅकची जागा वाहने उभी करण्यास दिली तर वाहतुकीचा रस्ता थोडा मोकळा होईल आणि मुख्य रस्त्यावरची वाहनांची गर्दी बाजूला होईल, वाहतूक सुरळीत होऊ शकते.