‘समुद्रात भराव टाकून पक्क्य़ा खोल्या बांधण्याचे काम सुरू आहे..रोजच्या रोज ट्रकने विटांसह सर्व सामान आणले जात आहे..साहेब आता तरी या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा’, वरळीच्या जनता कॉलनी येथील नरीमनभाट येथील चाळीसएक महिला-पुरुष आणि मनसेचे नगरसेवक संतोष धुरी महापालिकेच्या जी-दक्षिण विभाग कार्यालयातील सहाय्यक अभियंता मिलिंद व्हटकर यांना तात्काळ कारवाई करण्यासाठी सांगत होते.. ‘साहेब खैरनार साहेबांनीही कारवाई केली होती. नुसते कागदी घोडे नाचवले नव्हते.’ एका कार्यकर्त्यांने असे सांगताच, ‘मी काही खैरनार नाही, पालिकेत किती खैरनार झाले ते सांगा, असा सवाल मिलिंद व्हटकर यांनी करताच जमलेले सारे आवाक्  होऊन पाहातच राहिले..
नरिमन भाटनगर येथे समुद्रकिनारी गेले अनेक दिवस अनधिकृत भरणी सुरू आहे. या भरणीवर विटांच्या पक्क्य़ा खोल्या बांधून त्या सात लाख रुपयांना एक याप्रकरणे विकण्याचे काम एका स्थानिक दादा करतो आहे. याचा नरिमनभाट येथील रहिवाशांना या साऱ्याचा त्रास तर होतोच; शिवाय समुद्रिकिनारी भराव घातल्यामुळे भरतीच्या वेळी थेट त्यांच्या घरांमध्ये पाणी घुसण्याची भीती आहे.
संतोष धुरी यांनी याप्रकरणी जिल्हाधिकारी, म्हाडा तसेच पालिका अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. समुद्रकिनाऱ्यावरील बांधकामाशी आमचा संबंध नाही, असे जिल्हाधिकारी, म्हाडा तसेच पालिकेचे अधिकारी सांगू लागल्यानंतर थेट मनसेस्टाईलने स्थानिक नागरिकांना घेऊन संतोष धुरी यांनी जी-दक्षिण कार्यालय गाठले. सहाय्यक पालिका आयुक्त कार्यालयातच नसल्यामुळे सहाय्यक अभियंता मिलिंद व्हटकर यांच्या कार्यालयात जाऊन धुरी व स्थानिकांनी या बांधकामावर कारवाई कधी करणार, असा सवाल केला. महिलांनीही रुद्रावतार धारण केल्यानंतर व्हटकर या बांधकामाला नोटीस बजावल्याचे सांगू लागले. अखेर संतोष धुरी यांनी आत्ताच्या आत्ता कारवाई करता, की आम्हीच तोडू? असा सवाल केल्यानंतर ‘दादर पोलिसांकडे आम्ही कारवाईसाठी संरक्षण मागितले आहे. ते मिळाले की कारवाई करू!’ असे उत्तर व्हटकर यांनी दिले.
त्यावर धुरी यांनी तात्काळ दादर पोलिसांना दूरध्वनी लावून संरक्षण देण्यास सांगितले. समुद्र किनाऱ्यावर डंपरमधून डेब्रीज आणून उघडपणे भराव टाकण्याचे आणि झोपडय़ा बांधण्याचे काम सुरू आहे. पालिका अधिकाऱ्यांनी झोपडीदादांशी संगनमत करून अनधिकृत झोपडय़ा बांधण्याचे जणूकाही कंत्राट दिल्याचे चित्र सध्या दिसत आहे. धुरी यांनी याबाबतचे चित्रण तसेच अनेक छायाचित्रे पालिका अधिकाऱ्यांना दाखवली असून पालिकेने २४ तासांत कारवाई केली नाही तर मनसे स्थानिकांना घेऊन कारवाई करेल, असा इशारा धुरी यांनी दिला.