जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील गैरप्रकार वारंवार उघड होत असताना त्यात महसूल यंत्रणेतील काही घटकही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी असल्याची तक्रार केली जाते. या कामात पारदर्शकता नसल्याने गैरप्रकारांना प्रोत्साहन मिळते. या पाश्र्वभूमीवर, दिंडोरी तालुक्यात प्रायोगिक तत्वावर राबविला जाणारा ‘ऑनलाईन म्युटेशन’ हा उपक्रम पारदर्शकता आणण्यास महत्वपूर्ण ठरू शकतो. यापूर्वी कागदी घोडे नाचविणारे तलाठी आता ‘लॅपटॉप’ घेऊन नोंदी करत आहेत. १५५ गावांमधील शेतजमिनींच्या संगणकीकृत फेरफार नोंदीचे अद्ययावतीकरण करताना ‘ऑनलाईन म्युटेशन’द्वारे दिंडोरी तहसील कार्यालयात १७ हजार ९३८ नोंदी टाकण्यात आल्या आहेत.
जमिनीचे खरेदी-विक्री ही खरेतर किचकट प्रक्रिया. सर्वसामान्यांना त्याबाबत फारशी माहिती नसल्याने फसवणुकीचे अनेक प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. एखाद्या शेतजमिनीची खरेदी वा विक्री झाली की, त्याची कागदपत्रे सादर करून सात बारा उताऱ्यावर तशी नोंद केली जाते. म्हणजे, आधीच्या मालकाचे नांव वगळून खरेदीदाराचे नांव सात बारा उताऱ्यावर लागते. खरेदी प्रक्रियेत संबंधित शेतजमिनीच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या नोंदींची जमवाजमव करावी लागते. या कामात गतिमानता व पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने वर्षभरापूर्वी दिंडोरी तालुक्यात ऑनलाईन म्युटेशन कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. त्याकरिता तालुक्यातील ४२ सजेच्या सर्व तलाठय़ांनी लॅपटॉप खरेदी केले. आता हे तलाठी स्वत: संगणकात नोंद टाकतात, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
शेत जमिनीबाबत कोणत्याही नोंदी करण्याचे काम तलाठी कार्यालयात आजवर नेहमीच्या पारंपरिक नोंदीने चालत असे. या उपक्रमाने अधिकाधिक काम संगणकीकृत करत कागदपत्रांचा फापटपसारा कमी केला गेला. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना सात बाराचा उतारा त्वरित उपलब्ध करणे, शेत जमिन खरेदी विक्रीत सुलभता आणणे, वेगवेगळ्या नोंदींची माहिती उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी यांना खास प्रशिक्षण देण्यात आले. शिवाय, दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले. या ठिकाणी नोंदविलेल्या गेलेल्या दस्ताची तलाठी पुढील फेरफार क्रमांक घेऊन दप्तरात अर्थात संगणकात नोंद करतात. संगणकीय नोंदी करताना अडचणी उद्भवू नयेत, याकरिता तलाठय़ांच्या मार्गदर्शनाची दक्षता घेतली गेली आहे. महसूल विषयक कामकाजासंबंधी उपयुक्त अशा २५ हून अधिक पुस्तकांची व शासन निर्णयाची माहितीची आज्ञावली विकसित करून दिंडोरी तालुक्यातील सर्व तलाठी वर्गाला देण्यात
आली आहे.
त्यासाठी दिंडोरी तालुक्याचे संकेतस्थळही विकसित करण्यात आले आहे. तहसील कार्यालयात ऑनलाईन म्युटेशनद्वारे १७,९३८ नोंदी टाकण्यात आल्या आहेत. तालुक्यातील सर्वच्या सर्व १५५ गावांचे संगणकीकृत फेरफार नोंदीचे अद्ययावतीकरण करण्याचे कामही पूर्ण करण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. या बाबतची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी
प्राप्त केली.