दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे सखोल ज्ञान आत्मसात करण्यासाठी एका उत्तम ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा देण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून होत असते. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास लोकसत्ताच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ‘यशस्वी भव’ उपक्रमातून प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान त्यांना दिले जाते. हे मार्गदर्शन त्यांना तज्ज्ञांच्या माध्यमातून दिले जात असल्याने त्याचे मोल त्यांच्यासाठी अनन्यसाधारण असून, हा एक माहितीचा उपयुक्त खजिनाच आहे, असे मत उद्योजक अतुल शिरोडकर यांनी व्यक्त केले.
खार पूर्व येथे असलेल्या जवाहरनगर येथील अन्योग विद्यालयात ‘लोकसत्ता यशस्वी भव’तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिरोडकर उपस्थित होते. शिरोडकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासात परिपूर्ण राहण्यासोबतच जगातील दैनंदिन घडामोडींबाबतही अद्ययावत असायला हवे. ज्ञान आणि दैनंदिन जीवनातील घडामोडींचे एकत्रित ज्ञान मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी आवर्जून लोकसत्ताचे वाचन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सतीशचंद्र चिंदरकर होते. विद्यार्थ्यांसाठी लोकसत्ता जो उपक्रम राबवत आहे त्याबद्दल चिंदरकर यांनी आपल्या भाषणातून गौरवोद्गार व्यक्त करत विशेष आभार मानले. यावेळी शाळेतील विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  काही विद्यार्थ्यांनी लोकसत्तामधून देण्यात येणारे शैक्षणिक मार्गदर्शन आपल्याला कसे उपयुक्त ठरत आहे, याबाबत मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाला ‘लोकसत्ता यशस्वी भव’चे समन्वयक सी.डी. वडके, शाळेचे माजी मुख्याध्यापक जोशी सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक शिवाजी रसाळ यांनी, कार्यक्रमाचे व्यवस्थापन उपमुख्याध्यापक इंगळे सर आणि शिक्षकवृंदाने केले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ‘लोकसत्ता यशस्वी भव’ पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.