आपला वारेमाप खर्च राष्ट्रहिताचा आणि विरोधकांनी केला तर मात्र ती भ्रष्ट उधळपट्टी या खेळाचा अंक सौदी अरेबियातही खेळला जातो आहे..

भ्रष्टाचाराची चाड फक्त आपल्यालाच आहे आणि त्याचे निर्दालन हे जणू आपलेच निसर्गदत्त कर्तव्य आहे असे दाखवत जगात सध्या अनेक राज्यकर्ते एकाधिकारशाहीच्या वाटेने निघालेले दिसतात. सौदी राजपुत्र महंमद बिन सलमान हे त्यातील एक. या राजपुत्राने एका धडाकेबाज कारवाईत आपल्या अनेक भाऊबंद, मंत्री, लष्करी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या कारणावरून तुरुंगात डांबले. हे महंमद बिन सलमान हा सौदी राजकीय क्षितिजावरील अलीकडचा उगवता तारा. आपल्या काकास सत्तास्पर्धेतून माघार घ्यावयास लावून त्याने राज्यारोहणाच्या शर्यतीत आघाडी घेतली. सौदी परंपरेत राजघराण्यांची उतरंड ही भावांमध्ये होते. म्हणजे सत्ताधीशाचा धाकटा भाऊ हा त्या देशाचा पुढचा राजा असतो. विद्यमान सौदी राजे सलमान हे या माळेतले शेवटचे. त्यामुळे त्यांच्या पुत्राने सत्तापरंपरेवर वारसा हक्क  सांगण्यास सुरुवात केली असून ही कारवाई हा या संदर्भातील इशारा आहे. जागतिक ऊर्जा बाजारात तो देश केंद्रस्थानी आहे आणि खनिज तेलाचे सर्वात मोठे आणि सर्वाधिक साठे आजही त्याच देशात आहेत. तेव्हा सौदीतील घडामोडी आपल्यासाठीही महत्त्वाच्या असल्याने त्या समजून घेणे आवश्यक ठरते.

यातील लक्षात घ्यायलाच हवी अशी बाब म्हणजे या मंडळींना राजेमहाराजे आदी उपाध्या लावल्या जात असल्या तरी मूळचे हे टोळीवाले. यातील सर्वात मोठय़ा आणि क्रूर टोळीच्या म्होरक्यास, महंमद बिन इब्न सौद यास, आपल्या वालुकामय जमिनीखालील तेलाची किंमत लक्षात आली आणि अमेरिका आणि इंग्लंड यांना एकाच वेळी झुलवत त्याने स्वत:कडे सत्ता राहील याची व्यवस्था केली. त्याच वेळी आणखी एक महंमद, महंमद वहाब यास आपल्या धर्मसत्तेच्या प्रसारासाठी राजसत्तेच्या पाठिंब्याची गरज होती आणि नुकतेच राजेपद मिळवलेल्या महंमद बिन इब्न सौद यास धार्मिक समर्थनाची निकड होती. या परस्परांच्या सोयीतून सौदीत धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा एकाच वेळी विकास होत गेला आणि सौद साम्राज्य जन्मास येत असताना वहाबी पंथाचा देखील प्रसार होत गेला. अनेक राज्यकर्ते सुरुवातीच्या काळात धर्मसत्तेच्या साह्य़ाने राजसत्तेवर कसे नियंत्रण मिळवतात याचे ते पहिलेच उदाहरण नाही. अशी अन्य उदाहरणे आणि सौदी यांत फरक असलाच तर इतकाच की आपली सत्ता बळकट झाल्यावर महंमद बिन इब्न सौद याने आपल्याला पाठिंबा देणाऱ्या धर्मसत्तेची अरेरावी मोडून काढली. तेव्हापासून सौदी राजघराणे आणि धर्मसत्ता यांच्यातील संबंध हे प्रेमद्वेषाचेच राहिले आहेत. राजे फैजल यांच्यासारख्या पुरोगामी राजाने हा प्रभाव आणखी कमी केला आणि महिलांसाठी शाळा आदी काढण्याइतके धाडसी पाऊल उचलले. सौदी अरेबियासारख्या कर्मठ देशात हे फारच मोठे काम. राजे फैजल यांच्या पत्नी त्या वेळी जातीने महिलांच्या शाळेत जाऊन बसत आणि तरुणींना शिक्षणासाठी उत्तेजन देत. हा इतिहास आहे. परंतु त्याच धार्मिक इतिहासाने राजे फैजल यांचा बळी घेतला आणि त्यानंतरचे राजे हे हळूहळू धर्मसत्तेच्या कह्य़ात जाऊ लागले. राजे फाहद यांच्या काळात याचा कळस झाला आणि गुलछबूगिरी करण्यात आपली संपत्ती उधळल्याने कफल्लक झालेल्या सौदी राजघराण्यास एका श्रीमंत कंत्राटदारांकडून पैसे हातउसने घ्यावे लागले. त्या कंत्राटदाराचे आडनाव बिन लादेन. ओसामा याचे वडील. पुढे १९७९ साली अफगाणिस्तानात सोव्हिएत रशियाच्या फौजा घुसल्यानंतर धर्मविरोधी साम्यवाद्यांना धडा शिकविण्यासाठी याच ओसामा यास सौदी राजघराणे आणि अमेरिका यांनी पोसले आणि त्यातून अल कायदाचा राक्षस जन्मास आला. आता त्याच बिन लादेन घराण्याविरोधात राजपुत्र महंमद बिन सलमान याने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारवाई केली. या कारवाईत जगातील तीन सर्वोच्च श्रीमंत नजरकैदेत ठेवले गेले आहेत.

परंतु तरीही ही कारवाई केवळ हास्यास्पद ठरते. याचे कारण भ्रष्टाचार मुक्तीच्या कार्यवाहीसाठी जी काही संस्थात्मक उभारणी लागते तिचा अंशदेखील सौदी अरेबियात नाही. जगातील अपारदर्शक अर्थसंकल्पीय देशात सौदी पहिल्या क्रमांकावर आहे. सौदी सरकार किती कमावते आणि कशावर किती खर्च करते याचा कोणताही हिशेब दिला जात नाही. कारण तो देशच्या देश एकाच कुटुंबाच्या मालकीचा आहे आणि त्या कुटुंबाची सदस्यसंख्या २० हजारांहून अधिक आहे. या राजघराण्यातील सदस्यांना सौदी मालकीच्या विमान कंपन्यांतून कायमस्वरूपी मोफत प्रवास ते संपत्तीतील मालकी अशा अनेक सवलती दिल्या जातात. तेव्हा अशा व्यवस्थेत भ्रष्टाचार म्हणजे काय याची व्याख्याच झालेली नाही. या भ्रष्टाचार मोहिमेच्या सूत्रधाराचे वडील राजे सलमान यांनी आपल्या ताज्या अमेरिका दौऱ्यात १० कोटी डॉलर्सचा खुर्दा उडवला आणि भ्रष्टाचार निर्दालक खुद्द राजपुत्र सलमान यानेही खासगी नौकेच्या खरेदीसाठी ५० कोटी डॉलर्स मोजले. परंतु आपला खर्च राष्ट्रहिताचा आणि विरोधकांनी केला तर मात्र ती भ्रष्ट उधळपट्टी या जनप्रिय खेळाचा अंक सौदी अरेबियातही खेळला जात असून या राजपुत्राच्या कारवाईने तो उघड झाला आहे. अशा वेळी याच व्यवस्थेचा भाग असलेल्या या राजपुत्रास आताच का भ्रष्टाचाराचा साक्षात्कार झाला? तेलाच्या घसरलेल्या किमती हे याचे कारण. सौदी अरेबिया तेलावर जगतो. कोसळलेल्या तेल दरांमुळे सरकारचे -म्हणजेच राजाचे- उत्पन्न मोठय़ा प्रमाणावर घटले. त्यामुळे नागरिकांवर विविध अनुदाने, निवृत्ती भत्ते आदी मार्गाने होणारी खैरात आटू लागली. परिणामी नागरिकांत नाराजी निर्माण झाली. पण नागरिकांचे उत्पन्न घटत्या तेल दरांनी कमी केले तरी राजघराण्याच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे नागरिकांना दिसले नाही. त्यांचे छानछौक तसेच सुरू होते. अशा वेळी जनमानसांत कोंडल्या जाणाऱ्या नाराजीस या भावी राजाने कारण दिले.

ते म्हणजे भ्रष्टाचार. जगातील कोणत्याही राजवटीतील नागरिकांना आपल्या हलाखीसाठी सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार जबाबदार आहे हे कारण सुखावते. अशा भ्रष्टांवर कथित कारवाई झाल्यास हे नागरिक आपल्या हालअपेष्टा विसरून आनंदतात. सौदीतील कारवाईचा नेमका हाच अर्थ आहे. वास्तविक भावी राजा म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून राजपुत्र सलमान याने प्रत्येक आघाडीवर देशास संकटात आणले आहे. परराष्ट्र आघाडीवर सीरिया, येमेन, इराण आदी अनेक आखाती देशांतील संबंधांचे संतुलन या सलमानने घालवले असून त्या आघाडीवर सौदीस नव्या ताणतणावांना सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला शेजाऱ्यांशी संबंध बिघडत असताना तेलाचे घटते उत्पन्न हा सौदीसाठी चिंतेचा विषय आहे. तेव्हा यातून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी या राजपुत्राने अनेक आघाडय़ांवर नाटय़मय कृत्ये सुरू केली आहेत. महिलांना वाहन चालविण्यास अनुमती देणे आणि आपल्याच भाऊबंदांवर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारवाई करणे हे याचाच भाग आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. त्यातून काहीही साध्य होणारे नाही. याची परिणती फक्त सौदी राजघराण्यात आणि आखाती देशांत ताणतणाव वाढण्यात होईल. याआधी इतिहासात दोन वेळा सौदी घराण्यात असे प्रसंग घडले आणि त्यातून फक्त रक्तपातच झाला.

हा नवा राजपुत्र तरुण आहे. त्यास राज्यकारण आणि राजकारण याचा काहीही अनुभव नाही. असे नव राज्यकर्ते ज्या उत्साहाने आपल्या हातातील सत्ताकुऱ्हाडी फिरवून काहीतरी केल्याचे समाधान मिळवतात तोच उत्साह सौदी राजपुत्राच्या कृत्यांमागे आहे. उत्साहास धोरण आणि विवेक याची जोड नसेल तर तो वाया जातो. या राजपुत्राचेही तसेच होईल. परंतु त्यामुळे होणारे नुकसान अधिक असेल. आताच खनिज तेलाचे दर ६२ डॉलर्स प्रतिबॅरलवर जाऊन पोहोचले असून ती आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. ५० डॉलर्स प्रतिबॅरल या दरावर आपला अर्थसंकल्प उभा आहे. तो ५५ डॉलर्सपर्यंतचा ताण सहन करू शकतो. त्यानंतर वाढणारा प्रत्येक एक डॉलर आपला खर्च ८५०० कोटी डॉलर्सने वाढवतो. तेव्हा सौदीत जे काही सुरू आहे त्यामागे भ्रष्टाचार निर्मूलनाचे कारण केवळ आभासी आहे. वास्तवात ही हुकूमशाहीची चाहूल असून ती आपली डोकेदुखी वाढवेल यात शंका नाही.