News Flash

तारेवरची कसरत

मतदानाने पलानीस्वामी यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली आहे.

तामिळनाडू विधानसभेत पाच तासांच्या युद्धसदृश परिस्थितीनंतर, बेहिशेबी संपत्ती बाळगल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेल्या शशिकला नटराजन यांच्या गटाने आवाजी मतदानाने पलानीस्वामी यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली आहे. त्यामुळे शशिकला आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनारगुडी माफियांचाच हा विजय आहे, यावर राज्यातील जनतेने शिक्कामोर्तब करेपर्यंत तेथील राजकीय स्थिती सतत दोलायमान राहील. विधानसभेत तातडीने बहुमत सिद्ध करण्याची पलानीस्वामी यांची घाई हेच दर्शवणारी होती की, जेवढा उशीर तेवढी विजयाची शक्यता धूसर. शशिकला यांच्याविरोधात लागलेल्या निकालात जयललिता यांनाही दोषी ठरवण्यात आले होते, ही बाब विसरून पनीरसेल्वम यांच्या अनुयायांनी फटाके वाजवून त्या निकालाचे स्वागत करणे जेवढे अनुचित तेवढेच विधानसभेत गुप्त मतदान नाकारणेही. परंतु सत्ता मिळणे एवढेच ध्येय असलेल्या अण्णाद्रमुक पक्षाच्या १२२ आमदारांना तातडीने निवडणुका होणे परवडणारे नव्हते. येत्या चार वर्षांत मतदारांना राजी करणे शक्य होईल आणि सत्ताही हाती राहील, अशी त्यांची अटकळ असावी. मुख्यमंत्रिपदासाठी शेवटपर्यंत आटापिटा करणाऱ्या शशिकला यांना तेथपर्यंत पोहोचू न देणारे राज्यपाल या प्रकरणी बदनाम झाले आणि पनीरसेल्वम यांना पुन्हा सत्ता मिळण्याची स्वप्ने पडू लागली. येथपर्यंत विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने या प्रकरणी कोणतीच भूमिका घेतली नाही. मग असे काय घडले की, ऐन मतदानाच्या दिवशी या पक्षाचे नेते स्टालिन यांच्या आदेशावरून त्यांच्या आमदारांनी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला. एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, खुच्र्याची फेकाफेक करणे यांसारखे प्रकार घडले आणि लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या सत्ताबाजारात आपलीही पोळी भाजून घेण्याची इच्छा स्टालिन यांना फार काळ दाबून ठेवता आली नाही, हे याचे उत्तर.  सत्तेच्या रस्सीखेचीत निवडणुका झाल्या तर फायदा होण्याची शक्यता त्यांना दिसली असणार. त्यामुळेच चित्रपटात शोभेल असा फाटक्या शर्टचा प्रसंग त्यांनी उत्तम वठवला. शशिकला यांनी तुरुंगात पाऊल टाकता टाकताच टीटीव्ही दिनकरन या त्यांच्या नातेवाईकाच्या हाती पक्षाची सारी सूत्रे सोपवून टाकली. हे दिनकरन फेरा कायद्याच्या कचाटय़ात सापडलेले आहेत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे थेट आरोप आहेत. त्यांना मंत्रिमंडळात घेण्याची तंबीही या बाईंनी दिली होती. राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिल्याने हे दिनकरन अर्थमंत्री होता होता राहिले. अम्मा विरुद्ध चिन्नम्मा या वादात सामान्य जनतेच्या मनात चिन्नम्मा यांच्याबद्दल कमालीचा राग आहे, असे पनीरसेल्वम यांचे म्हणणे आहे. ते खरे असेल, तर अगदी थोडय़ा मताधिक्याने मुख्यमंत्री झालेले पलानीस्वामी यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची काटेरी असणार, हे नक्की. ज्या आमदारांनी मनारगुडी माफियांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि सत्तेची पोळी भाजून घेतली, त्यांना आता मतदारांना सामोरे जावे लागणार आहे. तळापासून उठाव होऊन त्यांना सळो की पळो करून सोडण्याएवढी ताकदवान चळवळ पनीरसेल्वम यांना उभी करता येईल, याबद्दल शंकेला वाव आहे. सदसद्विवेकबुद्धीला स्मरून डांबून ठेवलेले आमदार विधानसभेत मतदान करतील, अशी भोळी आशा त्यांनी बाळगली होती. सभ्यता आणि राजकारण यांचा संबंध संपलेल्या आजच्या काळात आपण केवळ जयललिता यांचे विश्वासू होतो, एवढाच प्रतिवाद पुरेसा नसतो, त्यासाठी जनतेचा पाठिंबा असणे आवश्यक असते, हे आता त्यांनी लक्षात घ्यायला हवे. तामिळ जनता त्यांना किती साथ देते आणि नव्याने सत्तेत आलेल्यांना किती धारेवर धरते, यावर या राज्याचे राजकारण ठरेल. तुरुंगातून राज्य हाकणाऱ्या शशिकलाबाईंच्या सल्ल्याने राज्य चालवताना नवे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे आणि त्यात ते कितपत यशस्वी होतात, ते आता पाहावे लागेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 2:53 am

Web Title: tamil nadu cm palaniswami 2
Next Stories
1 काश्मीर धुमसतेच
2 ‘मोर्चा’ चर्चेत आला!
3 निवडणूक आयोगाचा धाक
Just Now!
X