अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंड..
arth06विमा कंपन्यांकडे व्यवस्थापन असलेल्या निधीपैकी ७०% निधी हा निवृत्तीपश्चातच्या उदरनिर्वाहासाठी आहे. तरुण वयात कर नियोजनासाठी केलेली ही गुंतवणूक अवघ्या चार-साडेचार टक्के दराने परतावा मिळवून देते, हे या योजना विकत घेतलेल्यांच्या गावीही नसते. महागाईच्या दराहून कमी परतावा देणाऱ्या व म्हणून बचतीच्या क्रयशक्तीचा ऱ्हास करणाऱ्या या गुंतवणुकांपेक्षा करबचतीसाठी ‘ईएलएसएस’ या गुंतवणूक पर्यायाची ओळख आजच्या तरुण पिढीला करून देण्याचा हा प्रयत्न..

‘इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी’ या ओवीचे वित्तीय क्षेत्रातील उदाहरण कोणाला जाणून घ्यायचे असेल तर आजच्या अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंडाकडे पाहावे लागेल. २९ डिसेंबर २००९ रोजी फंडाची पहिली ‘एनएव्ही’ जाहीर झाली तेव्हा जेमतेम १ कोटीची मालमत्ता असलेल्या या फंडांची ३० जून २०१६ रोजीची मालमत्ता ९,२९१ कोटी झाली आहे. कर नियोजनासाठी ‘ईएलएसएस’ हा प्रकार अर्थसाक्षर गुंतवणूकदरांमध्ये करबचतीचे लोकप्रिय साधन असून या फंडातील गुंतवणूक आयकराच्या कलम ८० सीखाली कर वजावटीस पात्र आहे. ‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम’ अर्थात ‘ईएलएसएस’ या फंडाइतका परताव्याच्या दरात सातत्य राखणारा दुसरा फंड नसल्याने कर नियोजनासाठी गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती या फंडास लाभली आहे. कर वजावटपात्र कमाल मर्यादा १.५० लाख असल्याने या फंडात १.५० लाख गुंतवणूक केल्यास १५,००० रुपयांपर्यंत कर वाचविता येऊ शकतो.
arth10हा फंड ‘ईएलएसएस’ या प्रकारातील असल्याने केलेली गुंतवणूक तीन वर्षे काढून घेता येत नाही. तरीसुद्धा हा गुंतवणुकीस (व र्निगुतवणुकीस) कायम खुला असल्याने सेवानिवृत्ती, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी होणारा खर्च यासाठी जमा करावा लागणारा निधी ‘एसआयपी’च्या माध्यमातून जमविण्याचा आदर्श गुंतवणूक पर्याय आहे. समभाग गुंतवणूक हा गुंतवणूक विकल्प दीर्घ मुदतीसाठी असल्याने फंडातील गुंतवणूक तीन वर्षांनी काढून घेता येत असली तरी कमाल १० वर्षे व किमान २० वर्षे एसआयपी केल्यानंतर अपेक्षित भांडवली वृद्धीचा लाभ मिळणे शक्य आहे.
हा फंड समभाग गुंतवणूक करणारा असल्याने गुंतवणुकीवरील परतावा बाजार संलग्न जोखमीच्या अधीन असतो. कर नियोजनाकरिता केल्या जाणाऱ्या मुदत ठेवी, पीपीएफ, पारंपरिक विमा योजना या व अन्य गुंतवणुका स्थिर उत्पन्न देणाऱ्या असल्याने त्यांच्या परताव्याचा दर स्थिर असतो; परंतु महागाईच्या दराहून कमी असल्याने या गुंतवणुका बचतीची क्रयशक्ती टिकवून ठेवण्यास बिनकामाच्या ठरतात. कर वाचविण्यासाठी या फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टीची दाखल घेणे आवश्यक आहे.
अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड घराण्याकडे गुंतवणुकीचे काम पाहणारे आठ विश्लेषक व तीन निधी व्यवस्थापक असे मनुष्यबळ आहे. फंडाच्या गुंतवणूकविश्वात ३०० समभाग असून हे तज्ज्ञ या ३०० समभागांचा आवर्ती मागोवा घेत असतात. या ३०० समभागांपैकी निधी व्यवस्थापकांनी फंडाच्या गुंतवणुकीत ३० मेच्या गुंतवणुकीच्या यादीनुसार ३९ समभागांचा समावेश केला आहे.
arth11
यापैकी पहिल्या पाच गुंतवणुकांचे प्रमाण ३४%, तर पहिल्या दहा गुंतवणुकांचे प्रमाण ५५.५३% आहे. फंडाच्या गुंतवणुकांत प्रामुख्याने लार्ज कॅप समभागांचा समावेश असून मिड कॅपचे प्रमाण ५५%, तर स्मॉल कॅपचे प्रमाण ४५% आहे. निधी व्यवस्थापक त्या त्या व्यवसायाचे नेतृत्व arth12करणाऱ्या किंवा भविष्यात पहिल्या तीन क्रमांकांत येण्याची शक्यता असलेल्या कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करतात. ज्या कंपनीच्या समभागात गुंतवणूक केली आहे त्या कंपनीचे व्यवस्थापन अल्पसंख्याक भागधारकांचे हित जोपासणारे असावे हा निकष निधी व्यवस्थापक कटाक्षाने पाळतात. फंडाचा भर आर्थिक आवर्तनांच्या दिशाबदलाचा फायदा असणाऱ्या उद्योग क्षेत्रातील लार्ज कॅप प्रकारच्या समभागावर आहे. बहुतांश अर्थतज्ज्ञांना ‘ब्रेग्झिट’मुळे जगभरात चलन अवमूल्यनाचे पेव फुटण्याची भीती वाटत आहे. या फंडाची गुंतवणूक लार्ज कॅपकेंद्रित असल्याने खरोखरीच चलन अवमूल्यनाचे पेव फुटल्यास या फंडाच्या एनएव्हीत कमी घसरण व्हावी अशी धुरंधर रणनीती निधी व्यवस्थापकांची असण्याची शक्यता आहे.
या फंडाचा ‘बीएसई एस अँड पी २००’ हा संदर्भ निर्देशांक असून मागील पाच वर्षांत फंडाने संदर्भ निर्देशांकापेक्षा १०% सरस कामगिरी (अल्फा) केली आहे. फंडाचे मागील पाच वर्षांचे दर महिन्याचे सरासरी प्रमाणित विचलन १६.५६% आहे. अन्य ‘ईएलएसएस’ फंडांच्या प्रमाणित विचलनाची सरासरी १८.३५% असल्याने हा फंड कमी जोखमीत अधिक परतावा मिळवीत असल्याने निधी व्यवस्थापकाचे कौशल्य सिद्ध होते. फंडाच्या पहिल्या विक्रीत २९ डिसेंबर २००९ रोजी ज्या गुंतवणूकदारांनी १००,००० गुंतविले असतील त्यांचे १५ जुलै २०१६च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीप्रमाणे ३,२१,७६२ रुपये
झाले असून परताव्याचा दर १९.६८% आहे. चार वर्षांपूर्वी एसआयपी सुरूकरणाऱ्या गुंतवणूकदारांना या फंडाने २०% हून अधिक परतावा दिला आहे. केवळ एसआयपीच नव्हे तर वर्षांतून एकदा १,५०,००० गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना फंडाने भरघोस परतावा दिला असून ‘ईएलएसएस’ फंड गटात मागील सात वर्षांत हा फंड सर्वाधिक परतावा देणारा फंड ठरला आहे. अशा फंडाला ‘क्रिसिल’ने सर्वोत्तम अशी ‘Very Good- Rank 1’ पत बहाल केली आहे.
arth13अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंड हा ईएलएसएस फंड गटात गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती लाभलेला फंड आहे. ईएलएसएस फंड गटात अन्य टॅक्स सेव्हर फंडाच्या परताव्यापेक्षा किती तरी अव्वल परतावा अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंडाने दिला आहे. तेजी व मंदीच्या आवर्तनात या फंडाने या फंडाचा परतावा अन्य ईएलएसएस फंडांपेक्षा अव्वल राहिल्याने अनेक वाचकांना कर नियोजनासाठी या फंडात गुंतवणूक करण्याचा मोह होण्याची शक्यता आहे. या लेखाचा उद्देश ४-४.५% परतावा देणारी व सध्या सुरू असलेल्या विमा योजनेतील गुंतवणूक बंद करून किंवा पीपीएफमध्ये भरत असलेले पैसे थांबवून या फंडात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्याचा नसून कर नियोजनात ईएलएसएस फंडांना आपली जोखीम सहन करण्याच्या क्षमतेनुसार योग्य तो वाटा देणे हे अधोरेखित करणे हा आहे. आयकराच्या ‘कलम ८०सी’च्या खाली कर वजावटीसाठी दीड लाख गुंतविण्यास वेगवेगळे २१ पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी सर्वाधिक परतावा ईएलएसएस फंडच देतात ही अनुभवसिद्ध वस्तुस्थिती आहे. या पर्यायांपैकी जवळजवळ शून्य जोखीम असलेला व मध्यम परताव्याचा दर असलेला पीपीएफ हा लोकप्रिय पर्याय आहे. पीपीएफमध्ये गुंतविलेल्या रकमेवर मिळणारे व्याज व या व्याजावर मिळणारे व्याज करमुक्त असले तरीसुद्धा घटत्या व्याज दरामुळे व दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन व्याज दर स्थिर किंवा घटवले जाणार असल्याने पीपीएफबाबत नव्याने विचार करण्यास वाचकांना जागृत करणे इतपतच मर्यादित उद्देश आहे. पीपीएफ खात्यावर देय व्याजदर २००८ मध्ये १२% होते व सध्याचे व्याजदर ८.१% असून आधी भरलेल्या रकमेवरसुद्धा नव्या व्याजदराने व्याज आकारणी होणार असल्याने पीपीएफला पर्याय शोधण्याची वेळ करदात्यांवर आली आहे. जे कोणी पारंपरिक गुंतवणुकीवर श्रद्धा असणारे ज्येष्ठ नागरिकांच्या वयमर्यादेतील गुंतवणूकदार असतील त्यांनी पीपीएफची कास मुळीच सोडू नये; परंतु जोखीम स्वीकारून अधिक परतावा मिळविण्याच्या प्रतीक्षेतील तरुण गुंतवणूकदारांनी १,५०,००० पैकी शक्य तितके अधिक योगदान ईएलएसएस फंडांना देणे आवश्यक आहे. एखाद्या तरुण वयाच्या गुंतवणूकदाराने वयाच्या ३० व्या वर्षीपासून ६०व्या वर्षांपर्यंत १३,१५० रुपयांची दरमहा सिप ईएलएसएस फंडात गुंतवणूक केली व या काळात फंडातून १६% परतावा गृहीत धरला तर ३० वर्षांत गुंतविलेली रक्कम ४७,३४,००० रुपये असेल व ३० वर्षांनंतर ११ कोटी १९ लाख रुपयांची रक्कम निवृत्तीच्या वेळी त्यांच्या हाती पडेल. हा विचार करून कोणत्या ईएलएसएस फंडाला आपल्या नियोजनात किती वाटा द्यायचा हा ज्याचा त्याने विचार करणे जरुरीचे आहे. ईएलएसएस फंडात दीर्घ काळ केलेली सिप नक्कीच फायद्याची ठरेल.
shreeyachebaba@gmail.com