20 November 2017

News Flash

माझा पोर्टफोलियो : सवलतीत उपलब्ध दीर्घकालीन शिलेदार

८६० रुपयांना दिलेला हा शेअर सध्या बाजारात सवलतीत उपलब्ध आहे.

अजय वाळिंबे | Updated: September 4, 2017 1:15 AM

एल अँड टी टेक्नॉलॉजी सव्‍‌र्हिसेस लिमिटेड

साधारण वर्षभरापूर्वीच एल अँड टी टेक्नॉलॉजी सव्‍‌र्हिसेसचा ‘आयपीओ’ येऊन गेल्याने बहुतांशी गुंतवणूकदारांना या कंपनीची थोडीबहुत माहिती असेलच. त्यातून लार्सन अँड टुब्रो प्रवर्तक असल्याने त्यावेळी आयपीओला प्रतिसाद देखील चांगलाच मिळाला होता. दुर्दैवाने शेअर बाजारात नोंदणी झाल्यापासून या शेअरने मात्र चांगली कामगिरी न केल्याने गुंतवणूकदारांच्या पदरी निराशाच आली असणार. ८६० रुपयांना दिलेला हा शेअर सध्या बाजारात सवलतीत उपलब्ध आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विविध क्षेत्रांत विविध प्रकारच्या इंजिनीयरिंग सेवा पुरवणाऱ्या एल अँड टी टेक्नॉलॉजी सव्‍‌र्हिसेसने गेल्या काही वर्षांत डेल कंपनीचा काही हिस्सा तसेच टीएसआयपीएल, इसेन्शिया टेक्नॉलॉजी इन्कसारख्या कंपन्या ताब्यात घेऊन विस्तारीकरण केले आहे. सध्या कंपनी वाहतूक-दळणवळण, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, औद्योगिक उत्पादने, वैद्यकीय उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स तसेच प्रक्रिया उद्योगाला सेवा पुरवीत आहे. जगभरात २०० हून अधिक मोठय़ा जागतिक कंपन्यांना सेवा पुरवणारी एल अँड टी टेक्नॉलॉजी सव्‍‌र्हिसेस आपल्या प्रवर्तकांच्या (लार्सन अँड टुब्रो) कामगिरीला साजेसे काम करीत आहे. केवळ २०.४ कोटी रुपयांचे भागभांडवल असलेल्या कंपनीची आर्थिक कामगिरी कायम चांगलीच राहिली आहे. यंदाच्या पहिल्या तिमाहीत ७७९.१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर कंपनीने १०३.९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो १३ टक्क्य़ांनी कमी आहे. मात्र कुठलेही कर्ज नसलेली आणि उत्तम प्रवर्तक असलेली एल अँड टी टेक्नॉलॉजी सव्‍‌र्हिसेस तुमच्या पोर्टफोलियोसाठी एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकते.

एल अँड टी टेक्नॉलॉजी सव्‍‌र्हिसेस लिमिटेड

(बीएसई कोड – ५४०११५)

सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on September 4, 2017 1:15 am

Web Title: company profile for l and t technology services limited