12 August 2020

News Flash

फंड विश्लेषण : दमदार पुनरागमन..

म्युच्युअल फंडांच्या दुनियेत फंड ‘टॉप क्वारटाईल’मध्ये असण्याला खूप महत्व आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

कॅनरा रोबेको इक्विटी डायव्हर्सिफाइड फंड

आज ऑक्टोबर महिन्याचा पहिला सोमवार. सद्य कलेंडर वर्षांतील चौथ्या तिमाहीतील पहिला सोमवार. पुढील दोन आठवडय़ात म्युच्युअल फंडांची मागील तिमाहीची क्रमवारी प्रसिद्ध होईल. म्युच्युअल फंडांच्या दुनियेत फंड ‘टॉप क्वारटाईल’मध्ये असण्याला खूप महत्व आहे. म्युच्युअल फंड विेषक म्हणून शिफारस केलेले फंड ‘टॉप क्वारटाईल’मध्ये आहेत की नाही याची कायम उत्सुकता असते. मागील वर्षभरात क्रमवारीत मागे पडलेला परंतु मागील तिमाहीतील जोरदार कामगिरीच्या बळावर येत्या तिमाहित लार्जकॅप फंड गटात, ‘टॉप क्वारटाईल’मध्ये स्थान मिळविण्याची आशा असलेल्या कॅनरा रोबेको इक्विटी डायव्हर्सिफाइड फंडाची ही ओळख.

या फंडाला १६ सप्टेंबर रोजी १४ वर्षे पूर्ण झाली. पहिल्या एनएव्हीला गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना या फंडाने वार्षिक १९.१ टक्के दराने परतावा दिला आहे. पहिल्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीला १० लाखाची गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराचे २५ सप्टेंबरच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १.१६ कोटी रुपये झाले आहेत. ‘एस अ‍ॅण्ड पी बीएसई २००’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. १६ सप्टेंबर २००३ ते २५ सप्टेंबर २०१७ या कालावधीत संदर्भ निर्देशांकाने १५.७६ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या फंडात सुरुवातीपासून ५,००० रुपयांची नियोजनबद्ध गुंतवणूक केलेल्यांना ८.४५ लाख रुपये गुंतवणुकीवर १५.३९ टक्के वार्षिक दराने परतावा मिळाला असून गुंतवणुकीचे २७.२५ लाख रुपये झाले आहेत.

या फंडाने मागील वर्षभरात विशेषत: निश्चलनीकरणाची घोषणा झाल्यापश्चात, निधी व्यवस्थापनात धोरणात्मक बदल केले. रवि गोपालकृष्णन हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आणि श्रीदत्त भांडवलकर हे सह निधी व्यवस्थापक आहेत. एस अ‍ॅण्ड पी बीएसई २०० हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. मागील वर्षभरात फंडाने गुंतवणुकीत असलेल्या समभागांची संख्या ७० वरून कमी करत ऑगस्ट अखेरीस ५२ वर आणली आहे. कायम एकूण गुंतवणुकीच्या ५० टक्के पेक्षा अधिक गुंतवणूक लार्ज कॅपमध्ये गुंतविण्याचे बंधन निधी व्यवस्थापकांवर आहे. उत्सर्जनात वाढ न होणारे समभाग विकून टाकून ज्या समभागाच्या मिळकतीत वाढ आहे अशा आणि गुंतवणुकीत आधीपासून असलेल्या समभागांचे प्रमाण वाढविण्यात आले. ताळेबंदात सुधारणा झालेल्या कंपन्या (उदाहरणार्थ लार्सन अड टुब्रो), कंपन्या ज्या व्यवसायात आहेत त्या व्यवसायात मिळालेली हिस्सावाढ (मारुती सुझुकी इंडिया) या सारखे निकष नव्याने अंतर्भूत केलेल्या कंपन्यांसाठी लावण्यात आले. नव्याने केलेल्या गुंतवणुकीसाठी फंड व्यवस्थापनाने खाजगी बँका, गैर बँकिंग वित्तीय कंपन्या, विमा उद्योग, सीमेंट, वायू वितरण कंपन्या, औद्योगिक वापरासाठीच्या वस्तू, यांना प्राथमिकता देताना संदर्भ निर्देशांकापेक्षा कमी गुंतवणूक माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण या उद्योगांतील कंपन्यांत केली आहे. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, आयटीसी आणि कोटक बँक यांच्यात आहे. पहिल्या पाच गुंतवणुका एकूण गुंतवणुकीच्या सरासरी २५ टक्के तर पहिल्या दहा गुंतवणुका एकूण गुंतवणुकीच्या सरासरी ३८ टक्के आहेत.

निश्चलनीकरणाच्या पाश्र्वभूमीवर सुरू झालेल्या कॅलेंडर वर्षांच्या शेवटच्या तिमाहीला सुरुवात झाली आहे. वर्षांच्या सुरुवातीला व्यक्त केलेले सर्व अंदाज चुकवत बाजाराची वाटचाल सुरु आहे. निश्चलनीकरणामुळे अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर नेमका कोणत्या उद्योग क्षेत्रात घसरला याचे उत्तर उद्यापासून सुरूहोणाऱ्या निकालाच्या हंगामात मिळू लागेल. उद्यापासून रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण विषयक समितीची बैठक सुरू होत आहे. अल्प वृद्धीदर आणि मध्यम महागाईच्या कचाटय़ात सापडलेल्या अर्थव्यवस्थेस पूर्वीचा वृद्धीदर गाठण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून काय पावले उचलली जातात हे पाहावे लागेल. वृद्धीदर आणि महागाई यांचा समतोल साधला जाईल की, पूर्व गव्हर्नर रघुराम राजन यांच्या धोरणांप्रमाणे महागाईला लक्ष्य करणारी धोरणे आखली जातील. रोकड सुलभता आणि महागाईचा दर यांच्यात रिझव्‍‌र्ह बँकेची समिती कशाला महत्त्व देते हे उद्याच्या पतधोरणात दिसेल. जागतिक अर्थव्यवस्था संथ झाल्यामुळे रुपयाचे होणारे अवमूल्यन भारतीय निर्यात वाढीला उपयुक्त नसल्याने रुपयाच्या विनिमय दराबाबत रिझव्‍‌र्ह बँक नेमकी काय भूमिका घेते हे पाहावे लागेल. रिझव्‍‌र्ह बँकेकडून हस्तक्षेप अपेक्षित नसला तरी सद्य तिमाही रुपयासाठी धोकादायक ठरण्याची भीती नक्कीच आहे. रिझव्‍‌र्ह बँक आणि केंद्र सरकार यांच्यातील झालेल्या करारानुसार जानेवारी २०१८ मध्ये महागाईचा दर ४ टक्के (अधिक-उणे २ टक्के) राखणे अनिवार्य आहे. हे लक्ष्य रिझव्‍‌र्ह बँकेने गाठल्यानंतर आता वृद्धीदर वाढविण्यासाठी आणि रुपयाच्या विनिमय दराबाबत गव्हर्नर काय बोलतात याची उत्सुकता आहे.

निश्चलनीकरणामुळे बचतकर्त्यांनी आपली बचत स्थावर मालमत्ता आणि सोने या सारख्या भौतिक साधनांकडून मुदत ठेवी, विमा म्युच्युअल फंड या सारख्या अभौतिक साधनांकडे वळविल्याचे स्पष्ट दिसत आहे. या गोष्टींच्या सर्वाधिक लाभार्थी बँका आहेत. परंतु जेव्हा बँकाकडून कर्जाच्या मागणीत वाढ होईल तेव्हाच बँकांना वाढीव ठेवीचा लाभ होईल.

वस्तू आणि सेवा कर रचनेचा लाभ मालवाहू उद्योगातील कंपन्यांना होणार आहे. पुढील १८ ते २४ महिन्यांचा विचार करता हे व यासारख्या बदलांना अर्थव्यवस्था सामोरी जात असल्याने काही ठरावीक कंपन्यांच्या उत्सर्जनात वाढ संभवत आहे. सतत दुसऱ्या वर्षी पडलेल्या पुरेशा पावसाने ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या क्रयशक्तीत वाढ होण्याची आशा आहे. परिणामी मंदावलेली खाजगी गुंतवणूक आर्थिक वर्ष २०१८-१९ पासून हळूहळू जोर पकडण्याची शक्यता आहे.

निश्चलनीकरणानंतर फंडाने केलेल्या धोरणात्मक बदलांचा लाभ आधी उल्लेखिलेल्या कंपन्यांना होण्याची शक्यता आहे.

नव्याने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना दमदार पुनरागमन केलेल्या या फंडातील गुंतवणूक तीन चार वर्षांसाठी लाभदायक ठरेल अशी शक्यता वाटते.

 

कॅनरा रोबेको इक्विटी डायव्हर्सिफाइड (रेग्युलर प्लान)

एक दृष्टिक्षेप..

* फंडाची पहिली एनएव्ही :  १६ सप्टेंबर २००३

*  सध्याची एनएव्ही  (२७ सप्टेंबर २०१७ रोजी)

      वृद्धी पर्याय       :  ११४.५६ रुपये

      लाभांश पर्याय   :   ३६.२१ रुपये

*  फंड प्रकार : मिड कॅप फंड 

*  संदर्भ निर्देशांक : एस अ‍ॅण्ड पी बीएसई २००

*  किमान एसआयपी : १,००० रुपये

*  किमान गुंतवणूक  : ५,००० रुपये

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2017 1:20 am

Web Title: fund analysis canara robeco equity diversified fund
Next Stories
1 नवविवाहितांचे अर्थनियोजन आणि म्युच्युअल फंड
2 माझा पोर्टफोलियो : ‘माती’तील दुर्लक्षित रत्न
3 कर समाधान : घरभाडे उत्पन्न आणि प्राप्तिकर कायदा
Just Now!
X