सुंदरम इक्विटी मल्टीप्लायर फंड

मल्टी-कॅप फंड

६  एग्झिट लोड :

३६५ दिवसांआधी १ टक्का;

३६५ दिवसांनंतर लोड नाही

हा एक मल्टी-कॅप प्रकारचा फंड आहे. सुंदरम इक्विटी मल्टीप्लायर फंडातील लार्ज कॅप आणि आभासी रोख रक्कम यांची एकत्रित गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या ५० टक्कय़ांपेक्षा कमी न होणारी असल्याने अन्य मिड कॅप केंद्रित मल्टी-कॅप फंडांतील गुंतवणुकीपेक्षा कमी जोखीम असलेला हा फंड आहे. लार्ज कॅप गुंतवणुकीसाठी गुंतवणुकीचे धोरण ‘टॉप डाऊन अप्रोच’ पद्धतीचे आहे. विशिष्ट उद्योग क्षेत्रे निश्चित करून नंतर त्या त्या क्षेत्रातील गुंतवणुकीस योग्य कंपन्या निवडल्या जातात.

सुंदरम हे फंड घराणे मिड कॅप आणि स्मॉल कॅप गुंतवणुकीसाठी ओळखले जाते. त्यामुळेच फंडाच्या मिड कॅप आणि स्मॉल कॅप गुंतवणुकांसाठी ‘बॉटम्स अप अप्रोच’चा वापर केला जातो. फंडाने संदर्भ निर्देशांकाच्या तुलनेत कमी गुंतवणूक औषध निर्माण उद्योगांत, तर संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक गुंतवणूक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात केली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक गुंतवणूक केली असण्याची काही कारणे पुढीलप्रमाणे असू शकतील. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे मूल्यांकन गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे. या कंपन्यांच्या ताळेबंदात आभासी रोकड असल्याने ही रोकड व्यवसायवृद्धीसाठी वापरली जात नसल्याने गुंतवणूकदार फारसे खूश नाहीत. मोठय़ा प्रमाणावर रोकड बाळगल्याने या कंपन्यांच्या उत्सर्जन वृद्धी (‘अर्निग ग्रोथ’) बाबत साशंकता आहे. परंतु अमेरिकेची अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याने आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर २०११ नंतर पहिल्यांदाच चार टक्कय़ांपेक्षा अधिक असल्याने नवीन वर्षांत माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना मागील वर्षांच्या तुलनेत अधिक कंत्राटे मिळण्याची शक्यता आहे. टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिस या बाय-बॅक पूर्ण झालेल्या कंपन्यांच्या उत्सर्जनात पुढील वर्षी चार ते सहा टक्के वाढ दिसणे शक्य आहे.

मिड कॅप आणि स्मॉल कॅप गुंतवणुकांसाठी समभागांची निवड कंपन्यांच्या ताळेबंद, व्यवसाय वृद्धीची क्षमता, व्यवस्थापनातील सुशासन यानुसार होत असते. गुंतवणुकीत असलेल्या मिड कॅप आणि स्मॉल कॅप अनेक समभागांनी मागील वर्षभरात भरघोस परतावा देत निधी व्यवस्थापकांची निवड सार्थ ठरविली आहे. लार्ज कॅप गुंतवणुकीत समभाग केंद्रित जोखीम घेणाऱ्या निधी व्यवस्थापकांनी मिड कॅप गुंतवणुकीत विकेंद्रीकरण करून जोखीम यशस्वीरीत्या नियंत्रित केली आहे.

मल्टी-कॅप वर्गवारीत सर्व फंड घराण्यांच्या मिळून एकूण ५९ योजना असून या पैकी ३९ योजना मिड कॅप आणि स्मॉल कॅप गुंतवणुकीचे प्रमाण ३० टक्कय़ांपेक्षा असलेल्या आहेत. मागील पाच वर्षांत गुंतवणुकीत मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या सोबत ५० टक्कय़ांहून अधिक लार्ज कॅपचे प्रमाण राखलेला हा एकमेव फंड मल्टी-कॅप फंड आहे. नवीन वर्षांतील या फंडाची पहिली शिफारस करण्यासाठी नेमके हे कारण पुरेसे आहे. जरी मागील पाच वर्षांपासून फंडाचे निधी व्यवस्थापक शिव चनानी यांनी नुकताच सुंदरम फंड घराण्याच्या नोकरीचा राजीनामा दिला असला तरी १ जानेवारीपासून फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी एस कृष्ण कुमार यांच्यासह मदनगोपाल रामू हे या फंडाचे निधी व्यवस्थापन पाहणार आहेत. कृष्ण कुमार आणि मदनगोपाल हे दोन्ही सुंदरमचे अनुभवी निधी व्यवस्थापक आहेत.

गुंतवणूकगुरू वॉरेन बफे यांच्या ‘खूप वर्षांपूर्वी कोणी तरी हे झाड लावले म्हणून आज या झाडाच्या सावलीत मी बसू शकलो’ या वाक्याची आठवण करून देणाऱ्या या फंडाने सुरुवातीपासून केलेल्या नियोजनबद्ध गुंतवणुकीवर १४.३१ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या फंडाचा समावेश दीर्घकालीन ‘एसआयपी’साठी केला तर ते नक्कीच किफायतशीर ठरेल याबद्दल   शंका नाही.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)