News Flash

माझा पोर्टफोलियो : लांब पल्ल्याची उत्तम गुंतवणूक संधी

आयसीआयसीआयसारख्या उत्तम प्रवर्तक असलेल्या या कंपनीत दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरेल.

आयसीआयसीआयसारख्या उत्तम प्रवर्तक असलेल्या या कंपनीत दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरेल.

आपल्याकडे ‘खाउजा’ (खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) धोरण स्वीकारल्यावर जे काही महत्त्वाचे बदल झाले त्यात खासगी विमा कंपन्यांना विमा व्यवसायाला परवानगी मिळणे तसेच त्यात थेट परदेशी गुंतवणुकीला विनासायास मंजुरी मिळणे हे प्रमुख होत. त्यामुळेच आयसीआयसीआय, एचडीएफसी, कोटक, भारती अक्सा, मॅक्स, अपोलो म्युनिक इ. अनेक खासगी कंपन्यांनी परदेशी विमा कंपन्यांना बरोबर घेऊन या व्यवसायात उडी मारली आणि आता भारतीय आयुर्विमा महामंडळ तसेच इतर सरकारी विमा कंपन्यांना या खासगी कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स ही भारतातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँक आणि प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्स (प्रुडेन्शियल पीएलसी, लंडन) यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे १६ वर्षांपूर्वी म्हणजे २००१ मध्ये सुरू झालेली जीवन विमा कंपनी आहे. आज कंपनीच्या आधिपत्याखाली १ लाख कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता (एयूएम) असून, तीन लाख कोटींहून अधिक रकमेच्या पॉलिसीज् आहेत. भारतातील ही सर्वात मोठी खासगी जीवन विमा कंपनी असून भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध झालेली पहिलीच विमा कंपनी आहे. जून २०१७ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने ४८३६.७६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३९६.५२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांसाठी १६८२.२३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावणाऱ्या या कंपनीची पहिल्या तिमाहीची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसली तरीही आयसीआयसीआयसारख्या उत्तम प्रवर्तक असलेल्या या कंपनीत दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरेल. लवकरच एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ या दुसऱ्या मोठय़ा खासगी विमा कंपनीचा ‘आयपीओ’देखील येऊ  घातला आहे. त्याचेही सकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसून येतील. गेल्या वर्षी ३३४ रुपयांना ‘आयपीओ’द्वारे बाजारात आलेला आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफचा शेअर सध्या ४१५ रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. तो साधारण ३९० पर्यंत खाली येऊ  शकतो. उत्तम लाभासाठी काही क्षेत्रांतील गुंतवणूक ही प्रदीर्घ कालावधीसाठी करणे आवश्यक असते. अशी खरेदी नेहमी ‘एसआयपी’सारखी नियमितपणे शिस्तबद्धरीत्या करावी. त्यामुळे धोका कमी होऊ  शकतो. सिमेंट, स्टील, वाहन उद्योग यांसारखे मोठे प्रकल्प आणि बँक, विमासारखी क्षेत्रे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीच निवडावीत. त्यामुळेच एक लांब पल्ल्याची उत्तम गुंतवणूक संधी म्हणून आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा विचार करावा.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड         

(बीएसई कोड ५४०१३३)

लार्ज कॅप

प्रवर्तक : आयसीआयसीआय बँक

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                              ८०.७२

परदेशी गुंतवणूकदार         ६.२५

बँक/ म्यु. फंड /                ३.४५

सरकार  इतर                    ९.५८

 

बाजारभाव (रु.)                                   ४२६.३५

उत्पादन / व्यवसाय                             जीवन विमा

भरणा झालेले भागभांडवल (रु.)           १४३५.४१ कोटी

पुस्तकी मूल्य (रु.)                                ४४.६

दर्शनी मूल्य (रु.)                                   १०/-

लाभांश (%)                                           ७४%

प्रति समभाग उत्पन्न (रु.)                     १०.९

पी/ई गुणोत्तर                                        ३३.९५

समग्र पी/ई गुणोत्तर                                —

डेट/इक्विटी गुणोत्तर                              ०.२५

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर                         —

रिटर्न ऑन नेटवर्थ (%)                             २८.७१

बीटा                                                          —

बाजार भांडवल (कोटी रु.)                          ६२,९०७

५२ आठवडय़ातील उच्चांक/ नीचांक (रु.)  ५०८/ २७४

सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 1:10 am

Web Title: icici prudential life insurance company limited company profile
Next Stories
1 अर्थसाक्षरता महत्त्वाचीच!
2 साकारू अर्थ नियोजन : म्युच्युअल फंड अर्थ नियोजनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी  
3 फंड विश्लेषण : कार्य सिद्धीस नेणारा फंड
Just Now!
X