आशीष अरविंद ठाकूर

जेव्हा आपण येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात सेनसेक्सवर ३७,००० आणि  निफ्टीवर ११,३५०चा नवीन उच्चांकाचे प्रमेय मांडतो. तेव्हा सद्यस्थितीत बाजार हा तेजीतच असतो असे गृहीतक असावे लागते! मग तेजीच्या बाजारात ३६,०००/ १०,९००च्या स्तरावर तेजीला खीळ बसणार काय? या प्रश्नाच्या उत्तरासाठी या तेजीच्या मुळाकडे जाऊया.  विद्यमान तेजीची सुरुवात ३४,३००/ १०,४०० या स्तरावरून झाली. त्या वेळेला तेजीचे प्रथम वरचे उद्दिष्ट हे ३६,०००/ १०,९०० होते. या उद्दिष्टपूर्तीच्या स्तरावर अत्यल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांनी (शॉर्ट टर्म ट्रेडर) नफा वसुली करायचे सोडून नव्या मोठय़ा तेजीची स्वप्न दाखवून, त्या उच्चांकावर तेजीला फेर धरायला लावून समभाग वरच्या किंमतीत घेण्याच्या मोहात पाडून मग बाजार कोसळल्यावर त्यांना हवालदिल बघण्यापेक्षा त्या मोहाच्या क्षणी सावध करणे जरुरीचे होते व त्या दृष्टीने गेल्या दोन लेखांची मांडणी होती. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव –

*  सेन्सेक्स  :    ३५,६८९.६०

*  निफ्टी     :   १०,८२१.९०

जागतिक व्यापार युद्धामुळे जागतिक भांडवली बाजार सर्वत्र कोसळत असल्याचं ‘गम’ तर होते. पण भारतीय भांडवली बाजार फारच मामुली घसरण दाखवत होता. शुक्रवारी तर सणसणीत वरची उसळी मारल्याने गुंतवणूकदार फारच खुशीत होते असे ‘कही खुशी, कही गम’चे वातावरण गेल्या आठवडय़ात होते.

या आठवडय़ात निर्देशांकानी ३६,०००/ १०,९३०चा स्तर यशस्वीरित्या पार केल्यास प्रथम आधीचा उच्चांक ३६,४४३/ ११,१७१ व नंतर नवीन उच्चांक ३७,००० / ११,३५० दृष्टीपथात येईल ही तेजीची बाजू झाली.

निर्देशांक ३६,००० / १०,९३०च्या स्तरावर टिकण्यास वारंवार अपयशी ठरल्यास निर्देशांक पुन्हा ३५,२५० / १०,७०० ते १०,६८० पर्यंत खाली घसरू शकतो.

सोन्याचा किंमत-वेध

*   सोन्याला ३१,००० रुपयांची पातळी राखण्यात अपयश आले आणि ते ३०,५०० रुपयांच्या स्तरावर घसरले. येणाऱ्या दिवसात सोन्याचा सामान्य मार्गक्रमण पट्टा हा ३०,५०० ते ३१,१५० रुपये असेल व ३१,१५० रुपयांवर शाश्वत तेजी सुरू होऊन ३१,५०० रुपये हे वरचे इच्छित उद्दिष्ट असेल. हे गाठण्यासाठी सोन्याला ३०,५०० स्तराचा आधार टिकवणे नितांत गरजेचे आहे. हा आधार टिकवण्यास सोने अपयशी ठरल्यास ३०,००० रुपयांपर्यंत खाली घसरू शकते. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

लक्षणीय समभाग

मार्कसन्स फार्मा लि.

(बीएसई कोड – ५२२४०४)

शुक्रवारचा बंद भाव – रु. २९.३०

*  मार्कसन्स फार्मा ही हृदयरोग, त्वचारोग व कर्करोगावरील औषधे व वैद्यकीय सुत्रीकरणातील (मेडीकल फॉरम्युलेशन) आघाडीची कंपनी. मार्कसन्स फार्माच्या समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रू. २३ ते ३३ असा आहे.