मागील दोन म्हणजे १६ आणि २३ मार्चचे शुक्रवार, हे मंदीवाल्यांना बक्कल कमाई करून देणारे बाजारातील भयपटाचे सुपर-डय़ुपर हिट शुक्रवार ठरले आहेत..

जाएखाद्या जुन्या लोकप्रिय चित्रपटाची कथा नावासकट घेऊन पुन्हा नवीन चित्रपट (सिक्वेल) बनविला जातो. तसेच बाजारातील मंदीचा (भय इथले संपत नाही, भाग-२) मागील शुक्रवारी प्रदर्शित झाला. या भयपटाची कथा, फेब्रुवारीपासून एकच होती. ती म्हणजे बाजार कोसळणार. यातील विलक्षण योगायोग म्हणजे जसा नवीन चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होऊन अवघ्या दोन-तीन दिवसांत करोडोचा धंदा करतात तसेच मागील दोन म्हणजे १६ आणि २३ मार्चचे शुक्रवार हे मंदीवाल्यांना बक्कल कमाई करून देणारे बाजारातील भयपटांचे सुपर-डय़ुपर हिट शुक्रवार ठरले आहेत. या पाश्र्वभूमीवर बाजाराच्या आगामी वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव –

* सेन्सेक्स : ३२५९६.५४ 

* निफ्टी    :  ९९९८.०५

गेल्या दोन महिन्यांपासून व्यक्त होत असलेली भीती आता प्रत्यक्षात येत असून त्यात विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंदीच्या गडद काळ्या छटांचे विविध रंग भरले जात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी छेडलेले व्यापार युद्ध आणि त्याचा चीनने केलेला प्रतिवाद, खनिज तेलाचे वाढते भाव या आर्थिक दणक्यात निर्देशांकांनी आपली अत्यंत महत्त्वपूर्ण २०० दिवसांची चलत सरासरी (२०० डीएमए) अनुक्रमे सेन्सेक्ससाठी ३२,८५० आणि निफ्टीसाठी १०,१७०च्या स्तराला नकारात्मक खालचा छेद दिला आहे आणि निर्देशांकांच्या बाजार मंदीच्या गर्तेला सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने येणाऱ्या दिवसांत निर्देशांकाचा मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) ३१,००० ते ३३,२०० / ९७००-१०३०० असेल. या मार्गक्रमण पट्टय़ात निर्देशांकाची पायाभरणी झाल्यावर (बेस फॉर्मेशन) निर्देशांकावर मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक येईल.

सोन्याचा  किंमत-वेध

*   गेल्या अनेक लेखात सोन्यावर ३०,५०० ही महत्त्वाची कल निर्धारण पातळी असेल असा उल्लेख केलेला होता. या पातळीखाली सोने ३०,१०० पर्यंत खाली येऊ  शकते. या वाक्याचा प्रत्यय १९ मार्चला ३०,०९५ चा नीचांक नोंदवून दिला. पुन्हा एकदा निर्देशांक आणि सोन्याचा व्यस्त संबंध अधोरेखित केला. शुक्रवारी निर्देशांक गडगडत असताना सोन्याने ३०,५०० ची महत्त्वाची पातळी ओलांडून सोन्याने तेजीच्या दालनात प्रवेश केला आणि आपले पहिले वरचे इच्छित उद्दिष्ट ३०,८०० साध्य केले. सध्या सोन्याला ३०,४०० चा भरभक्कम आधार असून वरील इच्छित उद्दिष्ट ३१,१०० असेल.(सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित).

लक्षणीय समभाग

फ्युच्यर कन्झ्युमर लिमिटेड

(बीएसई कोड – ५३३४००)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ५२.३५

ल्ल  समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा हा ४८ ते ६२ आहे. ६२ च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन पहिले वरचे उद्दिष्ट ७० आणि दुसरे उद्दिष्ट ८० असे असेल. या पातळीच्या वर भाव सातत्याने टिकल्यास दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट १०० ते १२० असेल. गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्कय़ांच्या चार भागात विभागून प्रत्येक घसरणीनंतर हा समभाग खरेदी करावा. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला, ३५ रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा.

आशीष अरविंद ठाकूर ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.