देशाची निर्यात डिसेंबर २०१९ मध्ये सलग पाचव्या महिन्यात घसरली आहे. मात्र त्याचबरोबर आयातही कमी झाल्याने व्यापार तुटीबाबत काहीसा दिलासा मिळाला आहे. आयातीतही घसरणीचा हा सलग सातवा महिना आहे.

डिसेंबरमध्ये भारताची निर्यात १.८ टक्क्यांनी घसरून २७.३६ अब्ज डॉलर नोंदली गेली. तर आयात ८.८३ टक्क्यांनी कमी होत ३८.६१ अब्ज डॉलर झाली आहे. परिणामी त्या महिन्यातील व्यापार तूट वर्षभरापूर्वीच्या १४.४९ अब्ज डॉलरच्या तुलनेत ११.२५ अब्ज डॉलपर्यंत कमी झाली आहे.

प्रमुख ३० क्षेत्रांपैकी १८ क्षेत्रांत निर्यात घसरण राहिली. तर सोने आयात गेल्या महिन्यात ४ टक्क्यांनी कमी होत २.४६ अब्ज डॉलर नोंदली गेली. तेल आयात ०.८३ टक्क्यांनी कमी होऊन १०.६९ अब्ज डॉलर झाली. प्लास्टिक, रत्ने, दागिने, चामडय़ाच्या वस्तू तसेच रसायन पदार्थाची मागणी गेल्या महिन्यात रोडावली.

चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत निर्यात १.९६ टक्के कमी होऊन २३९.२९ अब्ज डॉलर, तर आयात ८.९ टक्क्यांनी घसरून २५७.३९ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. या दरम्यान व्यापार तूट ११८.१० अब्ज डॉलर झाली. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत ती अधिक, १४८.२३ अब्ज डॉलर होती.