ऑगस्टमधील ग्राहक किंमत निर्देशांक पाच महिन्यांच्या तळात

भाज्या तसेच अन्य खाद्यान्न किंमतीत उतार नोंदला गेल्याने गेल्या महिन्यातील महागाई दर पाच महिन्यांच्या तळात विसावला आहे. ऑगस्टमधील किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ५.०५ टक्के राखला गेला.

मार्च २०१६ मधील ४.८३ टक्केनंतर यंदाचा दर हा किमान आहे. तर जुलैमध्ये तो ६.०७ टक्के असा गेल्या दोन वर्षांच्या उच्चांकावर होता. वर्षभरापूर्वी, ऑगस्ट २०१५ मध्ये महागाई दर ३.७४ टक्के नोंदला गेला होता. ऑगस्टमध्ये भाज्यांच्या किंमती १.०२ टक्क्य़ाने कमी होत १४.०६ टक्क्य़ावर विसावल्या आहेत. तर अन्य अन्नधान्याच्या किंमती महिन्याभरापूर्वीच्या ७.९६ टक्क्य़ांवरून ५.८३ टक्क्य़ांपर्यंत खाली आल्या आहेत. एकूण अन्नधान्य महागाई निर्देशांक जुलैमधील ८.३५ टक्क्य़ांवरून ऑगस्टमध्ये ५.९१ टक्के झाला आहे.

यंदा लक्षणीयरित्या खाली आलेल्या महागाईच्या दराची दखल रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत तिच्या पुढील पतधोरणात नक्कीच घेतली जाईल, असा मला विश्वास वाटतो. यंदाच्या महागाईतील मोठा उतार मला अपेक्षित असा होताच. याबाबत आता रिझव्‍‌र्ह बँक लवकरच योग्य तो निर्णय निश्चितच घेईल.

– शक्तिकांता दास, केंद्रीय अर्थव्यवहार सचिव.