भटकंतीचे वेड असणाऱ्या प्रत्येक जातिवंत बाइकस्वाराला सफरीचा आनंद व आरामदायीपणासाठी क्रूझ बाइकचे आकर्षण असतेच. गेल्या काही वर्षांत या बाजारवर्गात अनेक विदेशी कंपन्यांच्या बाइक्सचा बोलबाला राहिला आहे. बाजारातील हे वाढते आकर्षण ओळखून बजाज ऑटोने ‘अ‍ॅव्हेंजर्स’ या नाममुद्रेद्वारे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तीन नव्या क्रूझ बाइक्सचा देशी अवतार प्रस्तुत केला आहे. अ‍ॅव्हेंजर २२० क्रूझ, २२० स्ट्रीट आणि १५० स्ट्रीट अशा तीन बाइक्स बजाज ऑटोच्या मोटारसायकल विभागाचे प्रमुख एरिक वाझ यांनी मंगळवारी मुंबईत सादर केल्या. अ‍ॅव्हेंजर श्रेणीतील या बाइकमध्ये दणकटपणा आणि आंतरराष्ट्रीय बाइक्सच्या तोडीची सर्व वैशिष्टय़े व स्टाइलिंगचा तपशिलाने समावेश केला गेला आहे. पुण्यानजीक चाकण येथील प्रकल्पातून त्यांची निर्मिती होणार असल्याने त्या तुलनेने स्वस्तही आहेत. अ‍ॅव्हेंजर २२० क्रूझ, २२० स्ट्रीट यांच्या किमती ८४,००० रुपयांपासून पुढे तर १५० स्ट्रीटची किंमत ७५,००० रुपयांपासून पुढे सुरू होईल.