अर्थव्यवस्थेच्या प्रमुख पायाभूत क्षेत्रात सलग सातव्या महिन्यांत घसरण नोंदली गेली आहे. सप्टेंबरमध्ये हे क्षेत्र ०.८ टक्क्यांनी घसरले आहे. वर्षभरापूर्वी याच महिन्यात त्या ५.१ टक्के वाढ दिसली होती. करोना छायेतीली मार्च २०२० नंतर ते सलगपणे घसरत किमान स्तरावर पोहोचले आहे.

खनिज तेल, नैसर्गिक वायू तसेच शुद्धीकरण उत्पादनात लक्षणीय घसरण झाल्याने यंदा प्रमुख पायाभूत क्षेत्र रोडावले आहे. तर रासायनिक खते, सिमेंट निर्मिती उणे स्थितीत राहिली आहे. कोळसा, वीज आणि स्टील क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रात घसरण झाली आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान प्रमुख पायाभूत क्षेत्राचे उत्पादन १४.९ टक्क्यांनी घसरले आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ते १.३ टक्के होते.

वित्तीय तूट वार्षिक लक्ष्याच्या ११४.८ टक्के

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत वित्तीय तूट ९.१४ लाख कोटी रुपये झाली आहे. सरकारने चालू वित्त वर्षांसाठी राखलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ११४.८ टक्के आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१९ मध्ये ते ९२.६ टक्के होते. महसुली स्रोत आटल्याने यंदा तुटीचे प्रमाण निर्धारीत मर्यादेपल्याड गेले आहे.