मुंबई : सेन्सेक्समधील गेल्या सलग तीन सत्रांतील घसरणीला पायबंद घालण्याचे काम बुधवारी रिझव्र्ह बँकेच्या दुसºया अर्थसाहाय्याने केले. करोना-टाळेबंदीच्या संकटात आरोग्य पायाभूत क्षेत्रासाठी आर्थिक तरतुदीसह सामान्य कर्जदार, व्यावसायिकांना कर्जपरतफेडीसाठी दिलेल्या सवलतीचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आठवड्याच्या तिसºया सत्रात ४२४.०४ अंश वाढीने ४८,६७७.८५ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १२१.३५ अंश भर पडून प्रमुख निर्देशांक १४,६१७.८५ पर्यंत स्थिरावला. प्रमुख निर्देशांक वाढीतील प्रमाण मंगळवारच्या तुलनेत जवळपास प्रत्येकी एक टक्क्याचे राहिले.
रिझव्र्ह बँकेच्या अर्थसाहाय्यामुळे भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी विशेषत: बँक, वित्त समभागांसाठी खरेदी नोंदवली. त्याचबरोबर बुधवारच्या तेजीत औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागही लक्षणीय प्रमाणात उंचावले. भांडवली बाजारात गेल्या सलग तीन व्यवहारांत घसरण नोंदली जात होती.
सेन्सेक्समधील प्रमुख ३० कंपनी समभागांपैकी सन फार्मा (जवळपास ६ टक्क््यांपर्यंत वाढ), कोटक महिंद्र बँक, अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डीज्, टायटन कंपनी, टीसीएस आदींचे मूल्य वाढले. तर बजाज फायनान्स, एशियन पेंट्स व हिंदुस्थान यूनिलिव्हर हे तीन समभाग घसरणीच्या यादीत राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, आरोग्यनिगा, बँक, माहिती तंत्रज्ञान आदी अधिक प्रमाणात वाढले. तर स्थावर मालमत्ता निर्देशांक काही प्रमाणात घसरला.
बँक समभागांना मागणी
पतपुरवठ्याला चालना देणाºया रिझव्र्ह बँकेच्या बुधवारच्या जाहीर उपाययोजनांमुळे भांडवली बाजारात सूचिबद्ध वाणिज्यिक बँकांचे समभागांचे मूल्य वाढले. कोटक महिंद्र बँकेचा समभाग २.४२ टक्क्यांनी वाढला. तर खासगी क्षेत्रातीलच अ‍ॅक्सिस बँकेचे मूल्य जवळपास त्याच प्रमाणात उंचावले. आयसीआयसीआय बँक, सिटी युनियन बँक, आरबीएलही वाढले.