गुंतवणुकीला ‘लॉक-इन कालावधी राखण्याचे ‘सेबी’चे संकेत

मुंबई : ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ला मुदतीत परतफेड करता न आल्याच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेल्या रोख तरलतेची समस्या लक्षात घेता, म्युच्युअल फंडांच्या लिक्विड योजनांसाठी नियम कठोर बनविण्याचे भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने स्पष्ट संकेत दिले आहेत.

अन्य अनेक उपाययोजनांसह लिक्विड फंडातील गुंतवणूक अल्पकाळासाठी कुलूपबंद (लॉक-इन) करण्याच्या उपायांवर ‘सेबी’कडून विचार सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सूचित केले. या शिवाय, ३० अथवा अधिक दिवसांनी मुदतपूर्ती असलेल्या सर्व रोख्यांच्या मूल्याबाबत ‘मार्क टू मार्केट’ रोकड क्षमता (मार्जिन) राखणे बंधनकारक करण्यासारखा उपायही विचारात घेतला जात असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. सध्याच्या घडीला असे मार्क टू मार्केट मूल्य ६० वा अधिक कालावधीच्या रोख्यांबाबत फंड घराण्यांकडून बाळगली जात आहे.

या पावलांबाबत सेबीद्वारे म्युच्युअल फंड सल्लागार समितीच्या बैठकीत विचारविनिमय केला जाईल आणि त्या पश्चात सेबीकडून परामर्श पत्र खुल्या चर्चेसाठी प्रस्तुत केले जाईल. परामर्श पत्रावर येणाऱ्या अभिप्राय, सूचना आणि हरकती लक्षात घेऊन अंतिम नियम ठरविले जातील.

प्रवेश आणि निर्गमनावर कोणतेही बंधन आणि शुल्क नसलेला लिक्विड फंड हा गुंतवणुकीचा अत्यंत तरल प्रकार समजला जातो, त्यात अल्प कालावधीसाठी गुंतवणूक कायम राखणारा लॉक-इन कालावधी बंधनकारक केल्यास, त्याचा सर्वाधिक फटका हा संस्थात्मक गुंतवणूकदार, बँका आणि बडय़ा कॉर्पोरेट्सना बसेल, असे निरीक्षण क्वांटम म्युच्युअल फंडाचे मुख्याधिकारी जिमी पटेल यांनी नोंदविले.

लॉक-इन कालावधी राखल्याने निर्गमनावर मर्यादा येईल आणि याचा फायदा हा किरकोळ व्यक्तिगत गुंतवणूकदारांना निश्चितच होईल, असाही एक सूर आहे. मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या प्रवेश आणि निर्गमनावर निर्बंध आल्याने लिक्विड फंडांच्या नक्त मालमत्ता मूल्यात (एनएव्ही) स्थिरता येईल आणि हे छोटय़ा गुंतवणूकदारांच्या पथ्यावर पडणारे असेल.

सरलेल्या सप्टेंबर महिन्यात आयएल अ‍ॅण्ड एफएस आणि तिच्या उपकंपन्यांत निर्माण झालेल्या पेचाच्या पाश्र्वभूमीवर, लिक्विड फंडातून महिनाभरात सुमारे २ लाख कोटी रुपयांचे निर्गमन अनुभवास आले आहे. अर्थात ऑक्टोबर महिन्यात लिक्विड फंडात पुन्हा ओघ सुरू झाल्याचे आढळून आले, या महिन्यात लिक्विड फंडातील शुद्ध ओघ सुमारे ३६,००० कोटी रुपयांच्या घरात आहे. देशातील ४२ फंड घराण्यांकडील एकूण २२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक गंगाजळीत लिक्विड फंडांतील गुंतवणूक ही ४.५ लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे.