अर्थसंकल्पपूर्व आशादायी खरेदीने सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्सची सरशी

भांडवली बाजारात पुढील आठवडय़ात सादर होणाऱ्या केंद्र्रीय अर्थसंकल्पाबाबत सकारात्मक आशा पल्लवित झाल्याचे स्पष्टपणे दिसत असून, बुधवारी सलग दुसऱ्या सत्रात निर्देशांकांनी घेतलेल्या दमदार उसळीने प्रत्यय दिला. निश्चलनीकरणाने साधलेले चिंतामय वातावरण निवळत असून, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांकाने नोटाबंदीच्या निर्णयापूर्वीच्या स्तर पुन्हा कमावून हे दाखवून दिले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकाने १ नोव्हेंबर २०१६ नंतर प्रथमच ८,६०० या पातळीपल्याड मजल मारली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने गुरुवारी भांडवली बाजाराचे व्यवहार होणार नाहीत. त्यामुळे जानेवारी मालिकेच्या सौदापूर्ती एक दिवस आधी बुधवारीच उरकरण्यात आली. सौदापूर्तीला फ्युचर्स आणि ऑप्शन्स व्यवहारातील प्रलंबित शॉर्ट पवित्रा आवरता घेण्याची बाजारात दिसलेली भूमिका, त्याचप्रमाणे काही आघाडीच्या कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा चांगले आलेले तिमाही निकाल यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अर्थसंकल्पपूर्व खरेदीच्या उत्साहाला खतपाणी घातले. जागतिक स्तरावरून प्रमुख बाजारातील सकारात्मक संकेत स्थानिक गुंतवणूकदारांसाठी उपकारक ठरले. नवीन ट्रम्प प्रशासनाकडून अर्थवृद्धीला चालना देणाऱ्या व्यय व गुंतवणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल या आशेने अमेरिकेच्या भांडवली बाजाराने मंगळवारच्या व्यवहारात विक्रमी पातळीला स्पर्श केला. परिणामी पहाटे लवकर खुल्या झालेल्या आशियाई तसेच युरोपीय बाजारातही बुधवारी तेजीचे वारे होते.

बुधवारच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी गत तीन महिन्यांतील मरगळलेल्या वातावरणाला सोडचिठ्ठी देत अनुक्रमे १.२१ टक्के आणि १.५० टक्के अशी दमदार वाढ नोंदविली. बाजारातील व्यवहार सकाळी प्रारंभापासूनच सकारात्मक होते आणि दिवस सरत गेला तसे सेन्सेक्सचा पारा चढत गेला. २७,८७७ या दिवसांतील उच्चांकाला गवसणी घालून सेन्सेक्स मंगळवारच्या तुलनेत ३३२.५६ अंश कमावून २७.७०८.१४ वर स्थिरावला. आधीच्या दोन दिवसांतील ३४१.०८ अंशांची वाढ जमेस धरल्यास सेन्सेक्सने तीन दिवसांत ६७३.६४ अंश कमाई केली आहे.

निफ्टी निर्देशांकाने नोव्हेंबर २०१६मध्ये ८,६०० ची पातळी तोडली होती, ती बुधवारच्या व्यवहारात मोठी झेप घेत पुन्हा कमावली. १२७ अंशांच्या वाढीसह निफ्टी  निर्देशांक ८,६०२.७५ अशा दिवसातील जवळपास उच्चांकी पातळीवरच व्यवहार थंडावले तेव्हा स्थिरावलेला दिसला.

बाजारात बँकिंग, धातू, वाहन आणि ग्राहकोपयोगी उत्पादने या अर्थसंकल्पातील तरतुदींच्या प्रमुख लाभार्थी उद्योगक्षेत्राच्या समभागांची मोठय़ा प्रमाणावर खरेदी दिसून आली. सर्वाधिक २.३३ टक्क्यांची वाढ बँकिंग निर्देशांकाने साधली. त्या खालोखाल ग्राहकोपयोगी उत्पादन कंपन्या (२.२६ टक्के), तेल व वायू उद्योग (१.७५ टक्के), सार्वजनिक उपक्रम (१.६४ टक्के) आणि धातू उद्योग (१.३९ टक्के) अशी क्षेत्रवार निर्देशांकांची कमाई राहिली.

एचडीएफसी लि. (४.३१ टक्के) हा सेन्सेक्स निर्धारित करणाऱ्या समभागांमध्ये सर्वाधिक वाढ साधणारा ठरला. अदानी पोर्ट्स (३.६१ टक्के), तर १५.०४ टक्के अशी समाधानकारक तिमाही नफ्यात वाढीची कामगिरी नोंदविणाऱ्या एचडीएफसी बँकही (१.५६ टक्के) वधारणाऱ्या समभागांच्या यादी राहिला. निकाल जाहीर करणाऱ्या अन्य कंपन्यांमध्ये मारुती सुझूकी (१ टक्का) वधारला, तर भारती एअरटेल (१.५२ टक्के) घसरणीत राहिला. सेन्सेक्समधील ३० पैकी २३ समभागांनी मोठी कमाई केली.

एकंदर बाजारात खरेदीचे स्वरूप सर्वव्यापी होते. बीएसई मिड कॅप आणि स्मॉल कॅप या मधल्या फळीतील समभागांनाही मोठी मागणी मिळाल्याचे दिसून आले. परिणामी हे निर्देशांक अनुक्रमे ०.९० आणि ०.८७ टक्के अशी प्रमुख निर्देशांकाच्या तुल्यबळ वधारलेले दिसून आले.

सध्या आघाडीच्या कंपन्यांचे तिमाही निकाल हे नोटाबंदीतून अपेक्षिल्या गेलेल्या मंदीपासून तरलेले दिसून येतात. त्यामुळे बाजार निर्देशांकांनीही नोटाबंदीच्या चिंतेतून डोके वर काढत, त्यापूर्वीचा स्तर पुन्हा गाठलेला दिसून येतो. भरीला जागतिक स्तरावरील सकारात्मकता गुंतवणूकदारांच्या उत्साहाला चालना आणि बाजाराला नव्या उंचीकडे प्रवृत्त करीत आहेत.  – विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित बीएनपी परिबा फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस