येत्या २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या देशव्यापी कामगार संपात कोल इंडियाचे कर्मचारीही सहभागी होणार आहेत. या सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा कंपनीतील विविध पाच संघटनांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी सहभागी होतील, असे ‘राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघा’च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे त्यात भगव्या परिवारातील भारतीय मजदूर संघाचाही समावेश आहे.
विविध १२ प्रमुख मागण्यांसाठी देशातील ११ आघाडीच्या केंद्रीय कामगार, कर्मचारी संघटनांनी २ सप्टेंबरच्या संपाची हाक दिली आहे. उद्योग, बँक, विमा क्षेत्र यात सहभागी होत आहे.
कोल इंडियामध्ये कार्यरत इंटक, भारतीय मजदूर संघ, आयटक, हिंद मजदूर संघ, सिटू या पाच संघटनाही संपात उतरणार आहेत. कोल इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीतील प्रस्तावित १० टक्के सरकारी हिस्सा विक्रीला विरोध करत संपाला सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी फेब्रुवारी २०१५ मध्येही सरकारने कंपनीतील १० टक्के हिस्सा भांडवली बाजारात खुल्या भागविक्रीद्वारे विकला आहे. त्या वेळीही कर्मचाऱ्यांनी संप करत विरोध दर्शविला होता. कोल इंडियातील निर्गुतवणुकीतून सरकारने ३,००० कोटी रुपये उभारले आहेत. सरकारची या माध्यमातील चालू आर्थिक वर्षांतील पहिली निर्गुतवणूक प्रक्रिया पार पडली होती. कंपनीतील आणखी हिस्सा विकून सरकारचे एकूण २०,००० कोटी रुपयांचे ध्येय आहे.