बडय़ा नागरी सहकारी बँकांना मात देईल इतके ठेव संकलन आणि व्यवसाय कामगिरी शिवकृपा सहकारी पतपेढीने साधली आहे. मुंबई, ठाणे, सातारा, कोरेगाव व पुणे या पाच विभागात एकूण ६३ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या या पतसंस्थेने रु. ८८९ कोटींच्या एकूण ठेवी, रु. ६६२ कोटींचे कर्जे असा एकूण रु. १५५१ कोटींच्या व्यवसायाची उद्दिष्टपूर्ती करीत सहकारातील गुणात्मकता आणि जनमानसातील विश्वासार्हतेची पावती दिली आहे.
पतसंस्थावरील बंधने, ९७ वी घटनादुरुस्तीने आणलेले बदल व बंधने, रुपयाची घसरण व आर्थिक मंदी एकाला बाजूला तर दुसरीकडे तीव्र स्वरूपाची स्पर्धा असे असतानाही एप्रिल ते सप्टेंबर २०१३ या सहा महिन्यांत १५५ कोटींच्या नवीन व्यवसायाचे उद्दिष्ट गाठण्यात आले, असे शिवकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष अविनाश भोसले यांनी सांगितले.
पुण्यात आनंदसोहळा
या असामान्य कामगिरीसाठी शिवाकृपाचे सर्व शाखांतील ५०० कर्मचारी आणि ९०० ठेव संकलन प्रतिनिधी यांचा आनंद सोहळा रविवार, ६ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता चिंचवडगाव, पुणे येथे आयोजिण्यात आला आहे. राज्याचे सहकार आयुक्त मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन, तर डॉ. विजय देव हे कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतील. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, पतसंस्थेचे संस्थापक, सर्व संचालक व माजी संचालकांचीही आवर्जून उपस्थिती असेल.