भारतीय वंशाच्या अमेरिकी महिला स्वाती दांडेकर (वय ६४) यांची आशियायी विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी अध्यक्ष बराक ओबामा यांनी नियुक्ती केली आहे. दांडेकर यांना राजदूताचा दर्जा देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आयोवा प्रतिनिधिगृहात प्रथमच निवडून आलेल्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्याच महिला सदस्य असून २००३ मध्ये त्या निवडून आल्या होत्या. दांडेकर या जन्माने भारतीय असून, अमेरिकेतील विधिमंडळात निवडून येणाऱ्या पहिल्या महिला आहेत. अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आशियायी विकास बँकेवर त्यांची नेमणूक केली आहे. ओबामा यांनी सांगितले, की दांडेकर या अनुभवी असून त्या अमेरिकेपुढे असलेली आव्हाने पेलण्यात यशस्वी होतील. त्यांच्या सेवेसाठी मी त्यांचा ऋणी आहे. त्यांची नियुक्ती करताना आपल्याला आनंदच होत आहे. आयोवा प्रतिनिधी मंडळात त्या २००३ ते २००९ दरम्यान सदस्य होत्या व नंतर आयोवा सिनेटमध्ये त्यांनी २००९ ते २०११ दरम्यान काम केले. त्यानंतर आयोवा युटिलिटी बोर्डवर त्यांनी २०११ ते २०१३ दरम्यान काम केले. व्हिजन आयोवा मंडळावर त्या २००० ते २००३ दरम्यान संचालक होत्या. दांडेकर या त्यांचे पती अरविंद यांच्यासह १९७३ मध्ये अमेरिकेत आल्या व त्यांनी लिन मार कम्युनिटी स्कूलच्या जिल्हा शिक्षण मंडळावर १९९६ ते २००२ दरम्यान काम केले. नंतर आयोवा असोसिएशन ऑफ स्कूल बोर्डच्या त्या २००० ते २००२ दरम्यान सदस्य होत्या त्यांनी आयोवा जिल्हय़ातून पहिल्यांदा निवडणूक लढवली त्या वेळी त्या प्राथमिक फेरीत पराभूत झाल्या होत्या.