देशातील प्रमुख आठ उद्योग क्षेत्राची वाढ गेल्या महिन्यात खुंटली असून मेमध्ये ती ३.६ टक्के नोंदली गेली आहे. कोळसा तसेच खतांच्या उत्पादनामध्ये घसरण झाल्याने यंदा एकूणच पायाभूत सेवा क्षेत्र आक्रसले आहे.

आधीच्या, एप्रिल महिन्यात एकूण प्रमुख आठ क्षेत्राची वाढ २.८ टक्के नोंदली गेली होती.कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, खते, स्टील, सिमेंट व ऊर्जा यांचा समावेश असलेल्या प्रमुख पायाभूत सेवा क्षेत्राची वाढ वर्षभरापूर्वी, मे २०१६ मध्ये ५.२ टक्के नोंदली गेली होती.

यंदा कोळसा व खत उत्पादन नकारात्मक स्थितीत नोंदले गेले असून ते अनुक्रमे ३.३ व ६.५ टक्के राहिले आहे. स्टील निर्मिती ३.७ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. वर्षभरापूर्वी त्याची वाढ तब्बल १३.४ टक्के होती.

शुद्धीकरण उत्पादने आणि ऊर्जा निर्मिती अनुक्रमे ५.४ टक्के व ६.४ टक्क्यांनी वाढली आहे. मे २०१६ मध्ये ती अनुक्रमे ३.३ व ६.२ टक्के होती. यंदाच्या मेमध्ये नैसर्गिक वायू क्षेत्राची वाढ ४.५ टक्के राहिली आहे. मे २०१६ मध्ये हे क्षेत्र उणे स्थितीत होते. प्रमुख आठ क्षेत्रामुळे यंदा तब्बल ४१ टक्के हिस्सा राखणाऱ्या औद्योगिक उत्पादन दरावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.