माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी इन्फोसिस टेक्नॉलॉजीजने, सरलेल्या जानेवारी-मार्च तिमाहीत १७.१ टक्क्यांच्या वाढीसह ५,०७८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावणारी बुधवारी जाहीर केली. कंपनीने या समयी ९,२०० कोटी रुपये खर्चाची समभाग पुनर्खरेदीची (बायबॅक) योजनाही जाहीर केली. उल्लेखनीय म्हणजे मंगळवारच्या समभागाच्या बंद भावाच्या तुलनेत २५ टक्के अधिमूल्य देणाऱ्या प्रत्येकी १,७५० रुपये या कमाल किमतीला ही समभाग खरेदी कंपनी करणार आहे.

इन्फोसिसचा यंदाच्या मार्च तिमाहीतील ५,०७८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा हा गत वर्षी याच तिमाहीत कमावलेल्या ४,३२१ कोटी रुपयांच्या नफ्याच्या तुलनेत १७.१ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचा महसूलही वर्षागणिक १३.१ टक्क्यांनी वाढून या तिमाहीत २६,३११ कोटी रुपयांवर गेला आहे. कंपनीचा करपूर्व ढोबळ नफा ९,१४७ कोटी रुपयांचा आहे.

भागधारकांसाठी सुखकारक…

कंपनीने मागील पाच वर्षांतील जाहीर केलेली तिसरी समभाग पुनर्खरेदीची (बायबॅक) योजना ही भागधारकांच्या दृष्टीने सर्वात सुखद गोष्ट ठरेल. मंगळवारी भांडवली बाजारातील व्यवहार थंडावले तेव्हा इन्फोसिसचा समभाग १,३९७.१५ रुपयांवर स्थिरावला होता, तर कंपनीने बुधवारी कमाल १,७५० रुपये प्रत्येकी किमतीला ‘बायबॅक’ची घोषणा केली आहे. त्यामुळे भागधारकांना या योजनेत सहभागी होऊन थेट २५ टक्के अधिमूल्य कमावता येणार आहे. शिवाय कंपनीने प्रति समभाग १५ रुपयांचा अंतिम लाभांशही घोषित केला आहे.

नवीन बायबॅक योजनेवर कंपनी ९,२०० कोटी रुपये खर्च करणार आहे. इन्फोसिसने यापूर्वी डिसेंबर २०१७ मध्ये १३,००० कोटी रुपयांची पहिली बायबॅक योजना पूर्ण केली. त्या वेळी प्रति समभाग कंपनीने १,१५० रुपयांची किंमत मोजत, ११.३ कोटी समभाग भागधारकांकडून खरेदी केले होते. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये कंपनीने ‘बायबॅक’वर ८,२६० कोटी रुपये खर्च केले आहेत.

मिळकतीत एक लाख कोटींचा टप्पा

आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील एकूण मिळकतीत १,००,००० कोटी रुपयांचा टप्पा इन्फोसिसने ओलांडला आहे. कंपनीचे मार्चअखेर एकूण वार्षिक उत्पन्न १,००,४७२ कोटी रुपये इतके नोंदविले गेले. ग्राहकांच्या प्रासंगिक गरजांच्या पूर्ततेवर लक्ष, डिजिटल सेवांच्या भांडाराचा विस्तार, कर्मचाऱ्यांचे सबळीकरण वगैरे गोष्टी जागतिक ग्राहकांची सर्वाधिक पसंतीची भागीदार म्हणून इन्फोसिसच्या उदयास मदतकारक ठरल्या आहेत, असे इन्फोसिसचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांनी सांगितले. मिळकत, नफाक्षमता व रोकड प्रवाहाच्या मजबुतीसह, भागधारकांना उत्कृष्ट परतावा देण्याच्या दृष्टीने २०२१ वित्तीय वर्ष मोलाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले.