‘लोकसत्ता अर्थभान’ला गुंतवणूकदारांचा दमदार प्रतिसाद

मुंबई :  प्रत्येकाला आयुष्याच्या एका टप्प्यावर निवृत्त व्हावे लागते. तथापि कधी व कोणत्या वयात निवृत्त व्हायचे, यापेक्षा किती पुंजी गाठीशी असताना निवृत्त व्हावे, याचे भान ठेवून कमावत्या तरुण वयातच याचे पूर्वनियोजन केले गेले पाहिजे, तरच निवृत्तीनंतरच निवांत जीवन अनुभवता येईल, असा कानमंत्र रविवारी सकाळी ‘लोकसत्ता अर्थभान’च्या सहाव्या सत्रात बँकिंग आणि वित्तीय व्यवस्थापनतज्ज्ञ सुधाकर कुळकर्णी यांनी दिला.

गुंतवणूकविषयक मार्गदर्शनपर, आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’ कार्यक्रम रविवारी सकाळी दूरचित्रसंवाद माध्यमातून पार पडला. गुंतवणूकदार जागराच्या या मालिकेतील ‘निवृत्तीनंतरच्या निवांतपणासाठी गुंतवणूक नियोजन’ या विषयावरील सहाव्या सत्रात सुधाकर कुळकर्णी आणि आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाचे गुंतवणूकदार शिक्षण विभागाचे पश्चिम विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र दीक्षित यांनी मार्गदर्शन केले. गुंतवणूकदारांकडून आलेल्या प्रश्नांचे निरसनही वक्त्यांनी केले. वक्ते आणि श्रोते यांच्यातील दुवा म्हणून सुनील वालावलकर यांनी समन्वयकाची भूमिका बजावली.

आपण निवृत्त होतो तेव्हा नियमित मिळणारे उत्पन्न थांबते, मात्र आपले दैनदिन खर्च थांबत नाहीत. सध्याचे वाढते आयुर्मान, विभक्त कुटुंब पद्धती, सातत्याने कमी होत जाणारे व्याज दर आणि वाढती महागाई याच्या एकत्रित परिणामामुळे कित्येकांचे निवृत्तीनंतरचे जीवन हे आर्थिक ओढगस्तीचा सामना करावा लागतो. याचे कारण सामजिक सुरक्षिततेचा अभाव, पेन्शन सुविधा नसणे, निवृत्तीच्या वेळेपर्यंत जमा झालेली अपुरी शिल्लक, त्याचप्रमाणे उतारवयातील आजार, त्यातून वाढतच जाणारे वैद्यकीय उपचाराचे खर्च या सर्व बाबींचा विचार करता प्रत्येकाने निवृत्ती नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे सुधाकर कुळकर्णी यांनी नमूद केले.

निवृत्तीनंतर कुठे पैसा गुंतवायचा यापेक्षा कुठे गुंतवणूक करायची नाही, याची काळजी आवश्यक ठरते, हे आवर्जून नमूद करताना कुळकर्णी यांनी गुंतवणुकीतील जोखीम समजून घेणे नितांत आवश्यक असल्याचे सांगितले.

निधी संचय आणि संतुलित वितरण हे निवृत्ती नियोजनाचे दोन टप्पे आहेत. सेवानिवृत्ती निधी सुलभरीत्या जमा करण्यासाठी निवृत्तीच्या १० ते १५ वर्षे आधी गुंतवणुकीस सुरुवात करायला हवी. सेवानिवृत्तीला जमा निधीचे,  जोखीम सोसण्याच्या क्षमतेनुसार कर्जरोखे आणि समभागांमध्ये योग्य वाटप करून, महागाईवर मात करत नियमित उत्पन्न निर्माण करणे शक्य आहे.

शैलेंद्र दीक्षित, पश्चिम विभागीय व्यवस्थापक, गुंतवणूकदार शिक्षण, आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड