प्रवर्तकांचा हिस्सा कमी करण्याच्या आदेशाबद्दल याचिकेद्वारे नाराजी

मुंबई : देशातील आघाडीची खासगी बँक असलेल्या कोटक महिंद्र बँकेने बँक नियामक रिझव्‍‌र्ह बँकेलाच न्यायालयात आव्हान दिले आहे. बँकेला प्रवर्तकांचा हिस्सा कमी करण्यास सांगितल्याने खासगी व्यापारी बँकेने नाराजी व्यक्त केली.

रिझव्‍‌र्ह बँकेने कोटक महिंद्र बँकेला तिच्या प्रवर्तकांचा हिस्सा डिसेंबर २०१८ पर्यंत २० टक्क्य़ांपर्यंत तर मार्च २०२० पर्यंत १५ टक्क्य़ांपर्यंत कमी करण्याचे आदेश दिले आहेत. बँकेला चार वर्षांपूर्वी नव्याने परवाना देताना रिझव्‍‌र्ह बँकेने ही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली. यानतंर कोटक महिंद्र बँकेच्या प्रवर्तकांना त्यांचा बँकेतील हिस्सा १० टक्क्य़ांपर्यंत आणावयाचा आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वी कोटक महिंद्र बँकेला प्रवर्तकांचा हिस्सा कमी करण्यास बजाविले आहे. यानुसार बँकेने प्राधान्याने समभाग उपलब्ध करून देत प्रवर्तकांनी आपला हिस्सा कमी करावा, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे आदेश आहेत. बँकेला तूर्त १९.७० टक्क्य़ांपर्यंत हिस्सा आणावा लागेल. सध्या ते प्रमाण ३० टक्के आहे. जागतिक गुंतवणूक गुरु वॉरन बफे यांच्या बर्कशायर हॅथवेने गेल्याच आठवडय़ात कोटक महिंद्र बँकेत १० टक्के हिस्सा खरेदी केल्याची चर्चा होती.

दरम्यान, रिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या कोटक महिंद्र बँकेच्या समभागाचे मूल्य मुंबईच्या शेअर बाजारात सोमवारअखेर ६.५६ टक्क्य़ांनी खाली येत १,१९८.१५ वर स्थिरावले. सत्रात ते शुक्रवारच्या तुलनेत ७.२८ टक्क्य़ांपर्यंत आपटले होते.

निश्चलनीकरण चांगले; पण ‘त्या’ नोटा कशाला? – उदय कोटक

दोन वर्षांपूर्वीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निश्चलनीकरणाचे समर्थन करतानाच चलनात नव्याने आणलेल्या २,००० रुपयाच्या नोटेबद्दल कोटक महिंद्र बँकेचे मुख्य प्रवर्तक व कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निश्चलनीकरणाच्या माध्यमातून बरेच काही साध्य झाले; मात्र नव्या मोठय़ा रकमेची आवश्यकता होती का, असा सवालही कोटक यांनी उपस्थित केला आहे.