देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार सप्ताहारंभीच नव्या उच्चांकी टप्प्यावर स्वार झाला. तर वाढीनंतरही सर्वात जुना भांडवली बाजार त्याच्या २८ हजारापुढे कायम राहू शकला नाही. गुंतवणूकदारांच्या नफेखोरीने दोन्ही निर्देशांकाला व्यवहारात त्यांच्या सर्वोच्च टप्प्यावर नेऊन ठेवले.
दोन्ही प्रमुख भांडवली बाजारांनी टक्केवारीत ०.०२ ते ०.०९ वाढ नोंदविली असली तरी व्यवहारात ते सर्वोच्च टप्प्यावर विराजमान झाले. पैकी निफ्टीला हे यश दिवसअखेरही कायम राखता आले. तर सेन्सेक्स मात्र वधारणेच्या अखेरनेही त्यापासून दुरावला. त्याचबरोबर मुंबई निर्देशांक त्याच्या व्यवहारातील २८ हजारापासूनही लांब गेला. उलट निफ्टीला ८,३५० नजीक राहण्यात यश मिळाले.
सेन्सेक्सने व्यवहारात २८,००० पुढील प्रवास करताना २८,०२७.९६ हे नवे शिखर गाठले. सत्रात २७,७६४.७५ पर्यंत तो खालच्या स्तरावर घुटमळला. दिवसअखेर मात्र तो या टप्प्यापासून ढळत किरकोळ वधारणेनेही २८ हजाराखाली येत माघारी फिरला. सेन्सेक्स गेल्या आठवडय़ात, ५ नोव्हेंबर रोजी २८,०१०.३९ पर्यंत गेला होता.
मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकापेक्षा राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सोमवारी अधिक वाढ झाली. ८,३५० हा टप्पा पार करत निफ्टी सत्रात थेट ८,३८३.०५ पर्यंत झेपावला. सेन्सेक्सच्या ६.१० अंश वाढीपेक्षा त्याची वाढ शुक्रवारपेक्षा अधिक, ७.२५ अंशांची राहिली. तर टक्केवारीतही ती अधिक, ०.०९ टक्के  होती.
गेल्या आठवडय़ात दोन वेळा व्यवहार बंद राहिलेल्या भांडवली बाजारात यंदा गुंतवणूकदारांनी प्रमुख निर्देशांकांना सलग चौथ्या व्यवहारात तेजी नोंदविण्यास भाग पाडले. व्याजदर कपातीची शक्यता कमी असूनही बँक समभागांना कमी मूल्यावर अधिक मागणी राहिली.
रविवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामुळे आर्थिक सुधारणांसाठी आवश्यक असलेल्या निर्णयांना अधिक गती मिळेल, असा विश्वास गुंतवणूकदारांनी सोमवारी बाजार उघडताच केलेल्या व्यवहारातून व्यक्त झाला. प्राथमिक अंदाजानुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी २,५३७.१३ कोटी रुपयांची खरेदी बाजारात सोमवारी केल्याचे कळते.
सेन्सेक्समध्ये आयटीसी हा ४.२७ टक्के वाढीसह सर्वात आघाडीवर राहिली. पाठोपाठ सन फार्मा, टाटा पॉवर, डॉ. रेड्डीज लॅब, कोल इंडिया, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एचडीएफसी, एनटीपीसी, विप्रो, हीरो मोटोकॉर्प यामध्ये २.०९ ते १.०२ टक्के वाढ राखली गेली.

सोने २६ हजाराच्याही खाली
मुंबई : गेल्या आठवडय़ात काहीसे सावरलेले मौल्यवान धातूचे दर पुन्हा घसरणीला आले आहेत. सोने दराने तर सोमवारी, नव्या आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी २६ हजाराखालील प्रवास नोंदविला. स्टॅण्डर्ड सोन्याचा १० ग्रॅमसाठीचा भाव सप्ताहारंभी शनिवारच्या तुलनेत २५,९२५ रुपयांवर येऊन ठेपला, तर शुद्ध सोनेही याच प्रमाणात वधारल्याने कसेबसे २६ हजाराच्या काठावर, २६,०७५ रुपयांवर स्थिरावले. चांदीच्या दरात मात्र मोठी आपटी नोंदली गेली. किलोचा पांढऱ्या धातूचा भाव सोमवारी एकदम ३९० रुपयांनी कमी होत ३६ हजार रुपयांना, ३६,११० रुपयांवर स्थिरावला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर गेल्या साडे चार वर्षांंच्या तळात विसावले आहेत. युरोपीय बाजारात प्रतिऔन्स सोने १,२०० डॉलरच्याही खाली आले आहेत.

रुपयाची मात्र उल्लेखनीय कामगिरी
मुंबई : डॉलरच्या तुलनेत भारतीय चलनाने मात्र सप्ताहारंभीच उल्लेखनीय कामगिरी बजाविली. एकाच व्यवहारात १२ पैशांनी वधारत रुपया ६१.५० पर्यंत उंचावला. परकी चलन व्यासपीठावर गेल्या तीन व्यवहारात रुपयाने घसरण नोंदविली होती. शुक्रवारी तर चलन एकदम २१ पैशांनी आपटले होते, तर तत्पूर्वी दोन व्यवहारात मिळून ५ पैशांनी ते रोडावले होते. ६१.४५ या भक्कमतेसह सुरू झालेला सोमवारच्या सत्रातील स्थानिक चलनाचा वेग व्यवहारात ६१.४३ पर्यंत उंचावला, तर दिवसअखेरचा त्याचा विराम हा सत्रातील तळ राहिला. अमेरिकी रोजगारात वाढ होऊनही त्यांचे चलन-डॉलर हे कमकुवत बनले. भांडवली बाजारातील निधी गरजेपोटी रुपया उंचावला.
26