रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा आपल्या पदाचा राजीनामा दिला. या पदावरील कार्यकाळ संपण्यास तीन महिने शिल्लक असताना चक्रवर्ती यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तथापि राजीनाम्याचे कारण पूर्णपणे वैयक्तिक असून, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबरोबर मतभेदाचा मुद्दा यामागे नसल्याचे त्यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चक्रवर्ती हे २००९ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर बनले. यानंतर दोन वर्षे त्यांना मुदतवाढ देण्यात आली आणि १५ जून २०१४ रोजी ते या पदावरून निवृत्त होणार होते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या विद्यमान चार डेप्युटी गव्हर्नरांमध्ये सर्वात ज्येष्ठ असलेले चक्रवर्ती हे आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक विचारांमुळे समस्त बँक वर्तुळात नेहमी चर्चेत असत. गुरुवारी दुपारी मुंबईतील ‘सिबिल’च्या सहाव्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर चक्रवर्ती यांच्या ‘मला आधीच मोकळे करा’ या विनंतीला केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून सायंकाळी उशिरा मान देण्यात आला.
गव्हर्नर राजन यांनाही आपल्या निवृत्तीच्या योजनेची आपण कल्पना दिली असून, २५ एप्रिलपर्यंत पदभार कायम ठेवणार असल्याचे चक्रवर्ती यांनी सांगितले. ‘माझी निवृत्तीची तारीख काय असावी, हे ठरविण्याचा सर्वाधिकार मला वाटते माझाच आहे. माझा हा निर्णय मी गव्हर्नरांना खूप आधीच कळविला होता. हा पूर्णपणे माझा व्यक्तिगत निर्णय आहे. केवळ मुदतपूर्व विश्रांतीचा माझा हा विचार आहे आणि मी लागलीच पळही काढलेला नाही.’’असे त्यांनी सांगितले.
परंतु चक्रवर्ती यांच्या निर्गमनानंतर, रिझव्‍‌र्ह बँकेत एकाच वेळी चारपैकी दोन डेप्युटी गव्हर्नरच्या जागा रिक्त होणार आहेत. आनंद सिन्हा हे जानेवारीअखेर सेवानिवृत्त झाले असले तरी आणखी तीन महिने त्यांनी हा पदभार सांभाळावा, ही विनंती त्यांनी मान्य केली आहे. पण एप्रिलअखेर सिन्हा आणि चक्रवर्ती दोघेही रिझव्‍‌र्ह बँकेच्या सेवेतून बाहेर पडणार असून, सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू होणे अवघड दिसत आहे.