रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नरांचा सरकारी ‘बाबूंना’ सल्ला; शासकीय सेवेतील व्यवहारांवर बोट

किमान एक दिवस तरी मदतनीस किंवा सहकारी न घेता काम करुन बघितल्यास ‘आम आदमी’चे प्रश्न काय आहेत आणि त्याला किती त्रास सहन करावा लागतो ते समजेल, अशा कानपिचक्या रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सोमवारी सरकारी बाबूंना दिल्या. निवृत्ती किंवा नोकरी सोडल्यानंतर मदतनीस नसताना शासकीय व सार्वजनिक क्षेत्रामध्ये कशा पध्दतीने व्यवहार चालतात आणि यंत्रणा किती खडतर आहे याचा प्रत्यय वरिष्ठ अधिकाऱ्यांना येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

रघुराम राजन यांनी मंत्रालयात सोमवारी ‘यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यान’ देताना शासकीय अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी संवेदनशीलता दाखविण्याचे आवाहन केले.

त्यासाठीचा एक मार्ग म्हणून मदतनीस न घेता किमान एखादा दिवस तरी सार्वजनिक व्यवहार करुन पहावेत, मग त्यात सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या अडचणी येतात, हे उमगेल आणि त्या सोडविण्यासाठी काय करावे लागेल, यासाठी पावले टाकता येतील, असे राजन यांनी सुचविले.

हा उपाय रिझव्‍‌र्ह बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीही मी करणार असल्याचे सांगून राजन म्हणाले, अगदी बँकेतील मुदतठेवीच्या नामांकन बदल करण्यासाठीही कोणत्या अडचणी येतात आणि बँकिग करताना सर्वसामान्यांना कोणता त्रास होतो, हे रिझव्‍‌र्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना दिसून येईल. आपली ओळख लपवून सर्वसामान्यांप्रमाणे व्यवहार केल्यास यंत्रणेतील दोष समजून घेता येतात आणि ते दुरुस्त करण्याचे आपले कर्तव्य पार पाडता येते, असे राजन यांनी स्पष्ट केले. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यावेळी उपस्थित होते.

नवउद्यमींना इशारा

अधिक प्रमाणात दिल्या जाणाऱ्या सवलतींच्या आधारावर व्यवसायाचा पाया रचता येणार नाही, अशा शब्दांत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी नवउद्यमींना (स्टार्ट अप) इशारा दिला आहे. ई-कॉमर्स व्यवसायाकरिता केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या नियमानुसार या क्षेत्रातील कंपन्या, संकेतस्थळांना ३० टक्क्यांहून अधिक सूट अथवा सवलती विक्री होणाऱ्या उत्पादनांवर देता येत नाही. ५० टक्क्यांपर्यंत घसघशीत सूट देऊन तुम्ही तर केवळ महसूल मिळवीत असाल आणि नफा कमावत नसाल तर असा व्यवसाय दीर्घकालासाठी लाभदायक ठरू शकत नाही, असेही राजन यांनी म्हटले आहे. देशातील आघाडीच्या १० पैकी जवळपास सर्व कंपन्या आर्थिक तोटय़ात आहेत.

‘विकासकांनो, घरांच्या किमती कमी करा’

लोकांनी घरखरेदीकरिता तुमच्याकडे यावे असे वाटत असेल तर आधी जागेचे दर कमी करा, असा सल्लाही गव्हर्नर राजन यांनी विकासकांना दिला. कर्ज व्याजदर आणखी कमी होण्याबाबत आपण आशादायी असून जागेच्या किमती कमी झाल्यास खरेदीदारांनाही प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्थावर मालमत्ता क्षेत्राच्या वाढीसाठी पुन्हा एकदा साऱ्या गोष्टी जुळून येतील, असेही ते म्हणाले.