“अर्थव्यवस्थेच्या वृद्धीलाच रिझर्व्ह बँकेचं प्राधान्य आहे. सध्या करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक पावलं उचलली जात आहे,” अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी दिली. ‘एसीबीय बँकिंग अँड इकॉनॉमिक्स कॉनक्लेव्ह’ या आयोजित व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. तसंच करोना हे गेल्या १०० वर्षांतील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट असल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी करोनामुळे परिणाम झालेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली.

“आपली अर्थव्यवस्था आणि आर्थिक प्रणाली किती मजबूत आहे या करोनाच्या काळात आपण दाखवून दिलं आहे. आपल्या आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवरील शतकातील हे सर्वात वाईट संकट आहे. नोकरीपासून दैनंदिन कामांवरही त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे,” असं दास यावेळी म्हणाले. तसंच ग्लोबल चेन व्हॅल्यू, वर्ल्ड ऑर्डर आणि जगभरातील कामगारांवरही या मोठा परिणाम झाल्याचे ते म्हणाले.

“फेब्रुवारी २०१९ पासून आतापर्यंत आम्ही ११५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. वृद्धी दरात झालेल्या घरणीतून सावरण्यासाठी तशा प्रकारची पावलं उचलण्यात आली आहेत. याबाबत मॉनिटरी पॉलिसी कमिटी रिझॉल्युशनमध्येही सांगण्यात आलं आहे. करोनाच्या संकटानं अनेकांचे प्राणही गेले आणि अनेकांच्या जीवनशैलीवर त्याचा परिणामही झाला,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

२५० बेसिस पॉईंट्सची कपात

रिझर्व्ह बँक हळूहळू रेपो दरात आणखी कपात करेल असा निर्णय मॉनिटरींग कमिटीनं घेतला आहे. यानुसार फेब्रुवारी २०१९ ते येणाऱ्या काळापर्यंत रेपो दरात एकूण २५० बेसिस पॉईंट्सची कपात केली जाणार असल्याची माहिती दास यांनी दिली.

आर्थिक स्थिरता महत्त्वाची

“रिझर्व्ह बँकेचं विकासालाच प्राधान्य आहे. तसंच आर्थिक स्थिरताही तितकीच महत्त्वाची आहे. करोना महामारीमुळे एनपीएमध्ये वाढ होईल आणि भांडवलातही घट होईल.” असंही ते यावेळी म्हणाले. लॉकडाउननंतर हळूहळू निर्बंध उठवले जात असल्यानं त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. संकटाच्या काळात भारतीय कंपन्या आणि उद्योगांनीही उत्तम काम केलं असल्याचंही दास यांनी स्पष्ट केलं.