रिझव्‍‌र्ह बँकेला विश्वास; सुरळीत अर्थव्यवस्थेबाबतही अपेक्षा

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा कमी नुकसान होण्याची पतधोरण आढावा समितीला आशा आहे. २ ते ४ जून दरम्यान झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीचे इतिवृत्त रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केले. या इतिवृत्तात अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येण्याबाबत समिती सदस्यांनी झालेल्या चर्चेत आशावाद व्यक्त केला.

करोनाच्या दुसऱ्या लाटेतील बाधितांची संख्या पहिल्या लाटेत बाधित झालेल्यांपेक्षा कमी असून उपचारानंतर बरे होणाऱ्यांचे प्रमाणदेखील अधिक आहे. संसर्ग बाधितांच्या संख्येत वेगाने घट झाल्याने, व्यवहारही सुरळीत होत आहेत. अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांबद्दल समितीच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. तथापि, काही सदस्यांनी महागाई वाढण्याची जोखमी लक्षात घेता व्याजदर स्थिर ठेवण्याबाबतचे मत व्यक्त केले.

मे २०१२ मध्ये किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर ६ टक्कय़ांहून अधिक होता. महागाईचा दर सतत सहा महिने ४ टक्कय़ांपेक्षा कमी किंवा ६ टक्क्यांपेक्षा अधिक राहिल्यास रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांना संसदेसमोर त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागते. पतधोरण आढावा समितीच्या पुढील बैठकीत महागाईच्या दराबाबत तपशीलवार चर्चा करण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे या इतिवृत्तात म्हटले आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये चलनवाढ व वृद्धीदर यांत संतुलन साधून अर्थव्यवस्था सामान्य स्थितीत येईल. रिझव्‍‌र्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२२ अखेर वृद्धीदराची अपेक्षा उंचावत ९.५ टक्कय़ांवरून ९.७ टक्के केली असून आधीच्या चलनवाढीच्या दरात वाढ करत ५.१ टक्कय़ांवरून ५.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

पतधोरण आढावा समिती सदस्यांचे, दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर झालेला आघात मर्यादित असण्यावर एकमत झाले आहे. समिती सदस्य डॉ. आशिमा गोयल यांनी, दुसऱ्या लाटेमुळे पुरवठय़ापेक्षा मागणीवर अधिक परिणाम झाल्याकडे सदस्यांचे लक्ष वेधले. याच मुद्दय़ावर समिती सदस्य प्रा. वर्मा यांनी, ग्राहकांचा कल खरेदीपेक्षा सावधगिरी बाळगत बचतीकडे असल्याने अर्थव्यवस्थेतील मागणी कमी झाली आहे, असे मत व्यक्त केले. समिती सदस्य व रिझव्‍‌र्ह बँकेचे कार्यकारी संचालक डॉ. सागर यांनी, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राबविलेल्या धोरणांमुळे खाजगी गुंतवणुकीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी, सरकारने ३०.५% भांडवली खर्च वाढविला असल्याचा परिणाम गुंतवणूक चक्राला चालना मिळेल, असा आशावाद व्यक्त केल्याचे या इतिवृत्तात म्हटले आहे.