सीबीएसई आणि आयसीएसई सारख्या केंद्रीय मंडळांच्या अभ्यासक्रमासाठी पाठय़पुस्तक प्रकाशक कंपनी ‘एस चांद अँड कंपनी’ची प्रारंभिक खुली समभाग विक्री येत्या बुधवार, २६ एप्रिलपासून खुली होत आहे. पुढील तीन दिवस म्हणजे २८ एप्रिलपर्यंत ही भागविक्री सुरू राहील. या माध्यमातून कंपनीने ७२८ कोटी रुपयांची निधी उभारणी प्रस्तावित केली आहे.

या भागविक्रीत पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या समभागासाठी प्रत्येकी ६६० रु. ते ६७० रु. या निर्धारीत किंमतपट्टय़ा दरम्यान बोली लावून गुंतवणूकदारांना सहभागी होता येईल. या भागविक्रीत सुमारे ३०० कोटी रुपयांचे भांडवली समभाग कंपनी नव्याने विक्रीस आणत आहे. तर  खासगी भांडवली गुंतवणूकदार एव्हरस्टोन आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी) त्यांच्याकडील समभागांची या माध्यमातून विक्री करणार आहे.

भागविक्रीतून मिळणाऱ्या भांडवलाचा विनियोग कर्जाची परतफेडीसाठी आंशिक रूपात होणार आहे. एस. चांद, विकास, सरस्वती, मधुबन, इग्नायटर आणि डेस्टिनेशन सक्सेस या नाममुद्रांसह कंपनीची विविध प्रकाशने बाजारात आहेत. देशभरात ५८ शाखा आणि विपणन कार्यालयाचे तिचे विस्तृत जाळे फैलावले आहे. उत्तर भारतातील दिल्लीनजीक असलेल्या साहिबाबाद आणि रूद्रपूर येथील उत्पादन केंद्रातून तिच्या ८५ टक्के प्रकाशनांची छपाई होते. छोटय़ा व्यक्तिगत गुंतवणूकदारांना या भागविक्रीत किमान २२ समभागांसाठी आणि त्यानंतर २२ समभागांच्या पटीत बोली लावणारा अर्ज सादर करावा लागेल. दलाली पेढय़ांनी गुंतवणूकदारांनी या भागविक्रीसाठी अर्ज दाखल करण्याची शिफारस केली आहे.