स्पुटनिक’ला मंजूरी सुखदायी; ‘सेन्सेक्स’ची ६६० अंशांनी मुसंडी

मुंबई : आधीच्या सत्रात झालेल्या विक्रीने मोठी पडझड अनुभवलेल्या भांडवली बाजारातील मंगळवारच्या व्यवहारावर तेजीवाल्यांना पुन्हा पकड मिळविल्याचे दिसून आले. बँका, वित्तीय सेवा आणि वाहन कंपन्यांच्या समभागांच्या खरेदीत गुंतवणूकदारांनी रस दाखविला.

विदेशात विकसित करोना प्रतिबंधक लशींना मंजुरीची प्रक्रिया वेगवान करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय तसेच रशियाच्या स्पुटनिक या लसीच्या भारतात आपत्कालीन वापरास दिलेली मंजुरी या घटकांचा भांडवली बाजारावर मंगळवारी खूपच सकारात्मक परिणाम दिसून आला. विशेषत: जशी अपेक्षा केली जात होती त्यापेक्षा भयकारक पसरत असलेली करोनाची दुसरी लाट आणि त्यातून पुन्हा संपूर्ण टाळेबंदी सरकारकडून लागू केली जाण्याच्या शक्यतेने भांडवली बाजारात  सोमवारी घबराटीचे वातावरण पसरले होते. मात्र स्पुटनिकच्या रूपाने तिसऱ्या लशीचा मार्ग भारतात खुला होणे बाजारासाठी खूपच सुखावणारे ठरले आणि सेन्सेक्सने घेतलेल्या ६६०.६८ अशांच्या मोठय़ा झेपेने ते दाखवून दिले.

मंगळवारचे बाजारातील व्यवहार आटोपले तेव्हा सेन्सेक्स ४८,५४४.०६ अंशांवर स्थिरावला होता. त्याच बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने १९४ अंशांची भर घालून १४,५०४.८० या पातळीवर दिवसाला निरोप दिला. महिंद्र अँड महिंद्र, बजाज फिनसव्‍‌र्ह, बजाज फायनान्स, मारुती, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी आणि अ‍ॅक्सिस बँक यांचे मूल्य गुंतवणूकदारांकडून खरेदी झाल्याने वाढलेले दिसून आले.

व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीएसई मिड कॅप आणि बीएसई स्मॉल कॅप या निर्देशांकामध्ये प्रमुख निर्देशांकांच्या तुलनेत सरस अशी दीड टक्क्य़ांची वाढ दिसून आली.

टीसीएसची ४.२१ टक्क्य़ांनी घसरण

तिमाही निकालांच्या हंगामाची सोमवारी नफ्यात १५ टक्क्य़ांच्या समाधानकारक वाढ नोंदवून उत्तम सुरुवात करणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस अर्थात टीसीएसची ही कामगिरी भांडवली बाजाराला मात्र खूश करू शकली नाही. मंगळवारच्या व्यवहारात या समभागाला गुंतवणूकदारांच्या निराशेचा सामना करावा लागला आणि विक्रीमुळे समभागाचे मूल्य ४.२१ टक्क्य़ांनी गडगडले. बाजाराच्या अपेक्षांची पूर्तता टीसीएसला या कामगिरीतून करता आली नसल्याचे दिसून येते, त्यामुळे तो सेन्सेक्समधील सर्वाधिक घसरणारा समभाग ठरला. टीसीएसच्या बरोबरीने टेक महिंद्र, एचसीएल टेक, इन्फोसिस या सॉफ्टवेअर सेवा निर्यातदार अन्य कंपन्यांनाही घसरणीचा सामना करावा लागला.