चालू महिन्यात फ्युचर रिटेल आणि झी मीडिया कॉर्प या कंपन्यांनी हक्कभाग विक्रीमार्फत मोठा निधी उभारण्याचे नियोजन आखले असले, तरी नव्या २०१५ सालात वेगवेगळ्या कंपन्यांनी आपल्या खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी आणि महागडय़ा कर्जाची परतफेड म्हणून हा मार्ग चोखाळण्याचे ठरविलेले दिसते. वर्षभरात असे एकूण ४००० कोटी उभारण्याचे नियोजन आहे.
फ्युचर रिटेल, झी मीडिया कॉर्प यांच्या व्यतिरिक्त जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर, कॅनफिन होम्स, विन्टॅक आणि पोल्सन या कंपन्यांनी सध्या ‘सेबी’कडून आपल्या भागधारकांना हक्कभाग विकून निधी उभारण्याची परवानगी मिळविली आहे. फ्युचर रिटेलची हक्कभाग विक्री ही येत्या १५ जानेवारीपासून सुरू होत आहे, तर त्यापाठोपाठ अन्य कंपन्याही आपला हक्कभाग विक्रीचा कार्यक्रम घोषित करण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनेही ‘सेबी’कडे हक्कभाग विक्रीतून ४८५ कोटी रुपये उभारण्यासाठी परवानगी मागणारा प्रस्ताव सेबीला सादर केला आहे. वर्षभरात आणखीही काही कंपन्यांकडून भांडवल उभारणीचा हा मार्ग जोखला जाण्याची शक्यता आहे.  
विद्यमान भागधारकांनाच कंपनीचे निश्चित मर्यादेत आणि निर्धारित किमतीला (बाजारभावाच्या तुलनेत सवलत देऊन) अतिरिक्त समभाग खरेदीचा प्रस्ताव असे हक्कभाग विक्रीचे स्वरूप असते. सरलेल्या २०१४ सालात या माध्यमातून विविध १२ कंपन्यांनी ५२२४ कोटी रुपयांचा निधी उभारला होता, तर २०१३ सालात १८ कंपन्यांकडून ४१०१ कोटी रुपये हक्कभाग विक्रीद्वारे उभारले गेले होते.