scorecardresearch

‘सेन्सेक्स’ची झड कायम ; जागतिक बाजारातील मंदीचे पडसाद

मागील आठवडय़ात सलगपणे सुरू राहिलेल्या घसरणीने सेन्सेक्सने ५५ हजारांची पातळीही शुक्रवारी सोडली.

मुंबई : जागतिक प्रतिकूलतेपायी भांडवली बाजारावर मंदीवाल्यांनी पकड अधिक घट्ट केली असून, सप्ताहारंभाच्या व्यवहारात प्रमुख निर्देशांकांना झड लागण्याचा क्रम मागील आठवडय़ाप्रमाणे कायम राहिल्याचे दिसून आले. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातील ऐतिहासिक नीचांकी घसरणीने बाजारातील नकारात्मक वातावरणात आणखी भर घातली आणि मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या समभाग विक्रीने सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांना सोमवारी पुन्हा घसरण पाहावी लागली.

मागील आठवडय़ात सलगपणे सुरू राहिलेल्या घसरणीने सेन्सेक्सने ५५ हजारांची पातळीही शुक्रवारी सोडली. तर सोमवारच्या ३६४.९१ अंश (०.६७ टक्के) घसरणीची भर पडून हा निर्देशांक दिवसअखेर ५४,४७०.६७ या पातळीवर बंद झाला. अत्यंत तीव्र चढ-उतारांच्या अस्थिर व्यवहारात, एका प्रसंगी सेन्सेक्स ९०० अंशांच्या गटांगळीसह ५४ हजारांच्याही खाली म्हणजे ५३,९१८.०२ पातळीपर्यंत रोडावला होता. बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक – निफ्टी १०९.४० अंशांची (०.६७ टक्के) तूट दर्शवून १६,३०१.८५ वर दिवसअखेर स्थिरावला. शुक्रवारी १६,२०० कोटींच्या नफ्याची रिलायन्स इंडस्ट्रीजची वित्तीय कामगिरी गुंतवणूकदारांच्या पसंतीस मात्र उतरू शकली नाही. सोमवारच्या व्यवहारात त्याचे उमटलेले प्रत्यंतर म्हणजे कंपनीचा समभाग तब्बल ३.९७ टक्क्यांनी आपटला. किंबहुना निर्देशांकांच्या घसरणीत त्याचा सर्वाधिक हातभार राहिला. बरोबरीने इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, टाटा स्टील, टेक मिहद्र, स्टेट बँक, हिंदूस्तान युनिलीव्हर व आयटीसी या अन्य बडय़ा समभागांचे मूल्यही मोठय़ा प्रमाणात घसरले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stock markets continue to slump amid effects of the global recession zws

ताज्या बातम्या