मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेने चालू महिन्यात रेपोदरात थेट अर्ध्या टक्क्यांची वाढ केल्यांनतर सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या कर्जाच्या दरात वाढीची घोषणा केली. मात्र त्या तुलनेत बँकांकडून मुदत ठेवींवरील व्याजाच्या दरात वाढ केली जात नाही. म्हणूनच खासगी क्षेत्रातील येस बँकेने रेपो दराशी संलग्न मुदत ठेवींची मंगळवारी घोषणा केली.

आतापर्यंत रेपो दरासारख्या बाह्य मानदंडावर आधारित (ईबीएलआर) वाढीनुसार कर्जाच्या दरात वाढ केली जाते. मात्र ठेवींच्या बाबतीत त्याप्रमाणे व्याजाच्या दरात वाढ केली जात नव्हती. रिझव्‍‌र्ह बँकेने महागाई नियंत्रणासाठी गेल्या दोन पतधोरणात रेपोदरात ०.९० टक्क्यांची वाढ केली आहे. बँकाकडून कर्जदरात वेगाने वाढ केली जाते, मात्र त्यातुलनेत ठेवींच्या दरात वाढ करण्यासाठी दिरंगाई केली जात असते. यामुळे बँकेने ग्राहकांना रेपो दरातील वाढीचा फायदा मिळून अधिक परतावा मिळावा या हेतूने रेपो दराशी संलग्न मुदत ठेवी सादर केल्या आहेत, असे येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितले. बँकेकडून १ ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवी रेपोदराशी संलग्न करता येणार आहे. रेपो दरात वाढ झाल्यास स्वयंचलितपणे ठेवींवरील व्याजदरात वाढ होणार आहे त्यात मानवी हस्तक्षेपाची गरज भासणार नाही, असेही प्रशांत कुमार म्हणाले.