02 July 2020

News Flash

नावात काय : चलनवाढ

चलनवाढ झाल्याचा प्रमुख परिणाम म्हणजे लोकांची क्रयशक्ती कमी होते.

(संग्रहित छायाचित्र)

कौस्तुभ जोशी

सर्वसामान्य माणूस असो, कॉर्पोरेट कंपनी असो किंवा सरकार सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे चलनवाढ किंवा सोप्या भाषेत भाववाढ. अतिसुलभीकरण करून सांगायचे झाले तर मागील वर्षांच्या तुलनेत या वर्षांत वस्तूंच्या किमती वाढल्या म्हणजेच भाववाढ झाली होय.

पण नीट विचार केला तर यात दोन घटकांची तुलना करताना अभिप्रेत आहे वस्तूची किंमत आणि पशाचे मूल्य. एक उदाहरण घेऊन हा मुद्दा समजून घेऊया. समजा २०१९ साली एक वस्तू विकत घेण्यासाठी ५० रुपये द्यावे लागायचे आणि तीच वस्तू विकत घेण्यासाठी या वर्षी ७० रुपये द्यावे लागतात, याचा अर्थ रुपयाचं मूल्य वस्तूच्या तुलनेत घसरत चालले आहे. म्हणजेच वस्तूची किंमत वाढली आहे. आपण बोलीभाषेत ‘आजकाल पशाला कुठे किंमत राहिली आहे?’ असे म्हणतो त्यातलं हे समीकरण आहे. वस्तूची किंमत कमी होणे आणि चलनाचं तुलनात्मकदृष्टय़ा मूल्य वाढणे म्हणजेच स्वस्ताई येणे. आता महागाईचा संबंध चलनाशी कसा जोडला जातो ते पाहू. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये तीच वस्तू विकत घेण्यासाठी आपण जास्त रुपये खर्च केले, म्हणजेच बाजारात तेवढय़ा चलनाचा पुरवठा वाढला. याचा अर्थ चलनवाढ हे वस्तूच्या किमती वाढण्यामागे खरे कारण आहे. जर बाजारात वस्तू विकत घेण्यासाठी अधिकाधिक चलन उपलब्ध झाले म्हणजेच पशाचा पुरवठा वाढला पण, तेवढय़ा वस्तू उपलब्ध झाल्या नाहीत तरीसुद्धा मागणी आणि पुरवठय़ात रस्सीखेच होते आणि किमती भडकतात. किमती वाढणे किंवा कमी होणे याचा थेट संबंध लोकांच्या हातात किती खेळता पसा आहे याच्याशी असतो.

चलनवाढ झाल्याचा प्रमुख परिणाम म्हणजे लोकांची क्रयशक्ती कमी होते. ज्या प्रमाणात पशाचे मूल्य कमी होते त्याच प्रमाणात आपल्याला मिळणारे पैसेसुद्धा वाढायला नकोत का? उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला दरमहा जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी दहा हजार रुपये लागत असतील आणि चलनवाढीमुळे तीच गरज आज १२ हजार रुपये झाली, पण त्याचे उत्पन्न तेवढय़ा प्रमाणात वाढलेच नाही तर त्याला दोन हजार रुपये कमी खर्च करावे लागतात. आपला आधीचा जीवनमानाचा दर्जा कायम राखून जगता येत नाही यालाच आपण महागाईने कंबरडे मोडणे असे म्हणतो.

चलनवाढ प्रामुख्याने दोन कारणांमुळे होते मागणीतील वाढ झाल्यामुळे चलनवाढ होणे किंवा पुरवठय़ात घट झाल्यामुळे चलनवाढ होणे. जेव्हा विविध कारणांमुळे लोकांची क्रयशक्ती वाढते त्या वेळी ते अधिकाधिक वस्तूंची मागणी करू लागतात. तेवढय़ा वस्तू किंवा सेवा अल्पकाळात निर्माण करण्याची अर्थव्यवस्थेची क्षमता नसते. जरी क्षमता असली तरी अचानक वाढलेल्या मागणीचा सामना करण्यासाठी उत्पादन अल्पकाळात वाढवता येत नाही. अशा वेळी किमती भडकतात. या उलट वस्तू व सेवांचा पुरवठा काही कारणांमुळे घटतो आणि मागणी मात्र तेवढीच राहते. परिणामी मागणी आणि पुरवठा या दोघांमध्ये तफावत निर्माण होते व किमती भडकतात. प्रमाणाबाहेर होणारी चलनवाढ रोखणे रिझव्‍‌र्ह बँकेपुढील मोठे आव्हान असते.

* लेखक वित्तीय नियोजनकार व अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

joshikd28@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2020 3:08 am

Web Title: article on inflation meaning abn 97
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : नगण्य कर्जभार, वजनदार नाममुद्रा
2 बाजाराचा तंत्र कल : रक्तपात ‘निफ्टी’ला आधार-स्तर राखता येईल
3 बंदा रुपया : तंत्रज्ञानाच्या सर्वदूर सुकरतेचे तरंग
Just Now!
X