तृप्ती राणे

२ मे २०२० रोजी वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवे कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. कंपनीच्या भागभांडवलदारांच्या व्यतिरिक्त इतर गुंतणावणूकदारांनासुद्धा या सभेबद्धल कुतूहल असतं. गेल्या वर्षी जेव्हा ही सभा पार पडली तेव्हा साधारणपणे सोळा हजारांपेक्षा जास्त लोकांनी तिथे हजेरी लावली होती. टाळेबंदीचा काळ असल्यामुळे या वर्षी त्यांच्या आजवरच्या आयुष्यात पहिल्यांदा ही सभा व्हर्च्युअल पद्धतीने सादर केली.

गुंतवणूक जगतात वॉरेन यांच्या मतांना खूप महत्वाचं स्थान आहे. चांगले उद्योग निवडून त्यात दीर्घकालीन गुंतवणूक करण्याच्या त्यांच्या निर्णयक्षमतेची अनेक उदाहरणे आज या कंपनीच्या प्रगती पुस्तकातून सर्वांना दिसतात. करोना संकटातून किती त्रास होणार, त्यातून कधी बाहेर पडणार, अमेरिका यातून बाहेर येणार की आणि खोलात जाणार इत्यादी प्रश्नांना सामोरं जायची तयारी करून आणि ते सुद्धा त्यांच्या इतक्या वर्षांंच्या जोडीदाराशिवाय  वॉरेन यांनी खूप छान आणि समर्पक उदाहरणं देत समभागधारकांच्या शंकांचं निरसन केलं. आज वाचकांसाठी त्यातील काही महत्वाचे मुद्दे इथे मी मांडत आहे. कारण काही गोष्टी या मूलभूत असतात. देश, भाषा, जात, चलन बदललं तरीही या गोष्टी तशाच राहतात आणि म्हणूनच एक गुंतवणूकदार म्हणून त्यांचं भान नेहमीच ठेवणं हे महत्वाचं आणि फायद्याचं आहे.

येणारा काळ किती खडतर, त्याचे परिणाम किती दूरगामी असतील आणि परिस्थिती कधी सुधारेल हे आज कुणीच सांगू शकत नाही. परंतु उद्योग, गुंतवणूकदार आणि सर्वसामान्य जनता यांच्या मानसिकतेमध्ये नक्कीच आमुलाग्र बदल होणार. तेव्हा फक्त भांडवली बाजार खाली आला आहे म्हणून गुंतवणूक करू नका. थोडं थांबून नीट आढावा घ्या आणि पैसे सांभाळून गुंतवा. आज हाताशी असलेला पैसा सर्वात जास्त सुरक्षित आणि महत्वाचा आहे. तेव्हा योग्य तऱ्हेने त्याचा वापर करणं हे नक्कीच तुमच्या फायद्याचं ठरेल.

*  गुंतवणूक करण्यासाठी कर्ज काढू नये. कारण कर्जाची परतफेड आणि गुंतवणुकीतील परतावे एकाच वेळी होतील याची शाश्वती नसते.

*  जोवर गुंतवणूक सट्टा नाही तोवर ती चांगली.

*  सरकारी रोख्यांपेक्षा जास्त मिळणारा व्याज दर म्हणजेच जोखीम असल्याचा पुरावा.

*  दीर्घकालीन फायदा देण्याचं सामथ्र्य चांगल्या व्यवसाय आणि अनुषंगाने शेअर बाजारात आहे. तेव्हा शेअर बाजारात २०-३० वर्षांंसाठी गुंतवणूक झालीच पाहिजे.

*  प्रत्येक सेकंदाला दिसणारी शेअरची किंमत त्याची ‘व्हॅल्यू’ म्हणजेच मोल दाखवत नाही.

*  एखादा उद्योग जर तुम्हाला आवडतो तर त्याला चालवणारी कार्यकारिणी तुम्हाला योग्य वाटते. त्या उद्योगावर कोणताही वाईट परिणाम झाला नसेल तर फक्त किंमत बदलली म्हणून त्यातून बाहेर पडू नका.

*  अनेक लोकांसाठी निर्देशांकातील गुंतवणूक पुरेशी आहे. परंतु निर्देशांकातील सगळेच उद्योग चांगलेच असतात असं नसल्याने निवडक गुंतवणूक ही जास्त फायद्याची ठरते.

*  भीती ही कुठल्याही विषाणूपेक्षा जास्त लवकर पसरते. जास्त काळ राहते आणि मानसिकतेला जास्त बाधित करते.

*  एखादा गुंतवणूक निर्णय चुकला तर मुद्दल परत येण्याची वाट न बघता त्यातून पुढे होणारा तोटा टाळणं जास्त योग्य आहे.

*  कोणत्याही गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम घडवणारी एक छोटी शक्यतासुद्धा माहित असणं गरजेचं आहे.

कारण ही छोटी शक्यता जर खरंच अस्तित्वात आली तर तिच्यामुळे अगदी कमी काळात एखाद्या उद्योगाचं अस्तित्व धोक्यात येऊ  शकतं.

*  अनिश्चिततेच्या काळात हाताशी पैसे असणं खूप जास्त महत्वाचं असतं. कारण पैसे नक्की कुठे, किती, कधी आणि कशासाठी लागतील हे सांगता येणं फार कठीण आहे.

*  करोनानंतरच्या विश्वात विमान उद्योग, भ्रमंती, व्यवसायिक स्थावर मालमत्ता, करमणूक उद्योग यांच्यामध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत.

*  गुंतवणूक स्वत:ला समजणं महत्वाचं आहे. नाहीतर तुमचे खरेदी आणि विक्रीचे सगळे निर्णय तुम्ही दुसऱ्याच्या विचारांवर अवलंबून कराल.

*  जेव्हा नुकसान किती होणार आहे हे समजत नसेल तेव्हा गुंतवणुकीतून बाहेर पडून वाट बघा. चांगला उद्योग पुन्हा रुळावर येतो आणि गुंतवणुकीची संधी देतो तर वाईट उद्योगातून वेळीच बाहेर पडल्याने नुकसान कमी होतं.

* लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.

trupti_vrane@yahoo.com