अजय वाळिंबे

दोन आठवडय़ांपूर्वी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमात कोविड काळात कुठले क्षेत्र गुंतवणुकीसाठी सुरक्षित आहे असा एक प्रश्न आला होता. त्याच्या उत्तरादाखल, त्यावेळी एफएमसीजी, माहिती तंत्रज्ञान, ई-कॉमर्स, टेलिकॉम, केमिकल्स, फार्मा अशा काही क्षेत्रांबरोबर इन्शुरन्स क्षेत्राचा देखील विचार व्हायला हवा, असे सांगितले होते. इतर देशांच्या तुलनेत भारतातील सर्वसाधारण विम्याचे प्रमाण अत्यल्प म्हणजे जीडीपीच्या तुलनेत केवळ ०.९४ टक्के आहे. आगामी काळात भारतासारख्या प्रगतिशील देशांत सर्वसाधारण विमा उद्योगाचे वाढते महत्त्व पाहता भवितव्य उज्ज्वल आहे. वीस वर्षांपूर्वी खासगी विमा कंपन्या भारतीय बाजारपेठेत आल्यापासून त्यांचा बाजारपेठेतील हिस्सा तब्बल ५५.८ टक्क्य़ांवर गेला आहे.

आज सुचविलेली ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स लिमिटेड’ ही भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील सर्वसाधारण विमा कंपनी आहे. ही कंपनी मोटार, आरोग्य, प्रवास, शेती, घर, विद्यार्थी, प्रवास, अपघात इ. विविध प्रकारचे विमा संरक्षण प्रदान करते. २००१ मध्ये आयसीआयसीआय या आघाडीच्या वित्तीय संस्थेने, फेयरफॅक्सची उपकंपनी लोम्बार्ड इन्शुरन्सच्या संयुक्त विद्यमाने विमा व्यवसाय सुरू केला. त्या वेळी परदेशी कंपनीने या प्रकल्पात २६ टक्के भांडवली गुंतवणूक केली होती. सप्टेंबर २०१७ मध्ये भारतीय शेअर बाजारात ‘आयपीओ’द्वारे प्रवेश करणारी ही पहिली भारतीय खासगी विमा कंपनी. गेल्या १८ वर्षांत कंपनीने अनेकविध विमा योजनांचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिलेच, या शिवाय आधुनिक काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर करून या व्यवसायाचे आधुनिकीकरण देखील केले. आज बहुतांशी विमा पॉलिसी आणि क्लेम सेटलमेंट हे मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा ऑनलाइन होते. त्यामुळे वेळेची बचत होऊन क्लेम्स देखील लवकर प्रोसेस होतात. कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कॅशलेस मेडिक्लेम प्रोसेसिंगची वेळ ६० मिनिटांवरून केवळ एका मिनिटावर आणली आहे. कंपनीचे मार्च २०२० अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षित निकाल जाहीर झाले आहेत. या कालावधीत कंपनीने १२,४५० कोटी रुपयांच्या उलाढालीवर १,१९४ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. तो गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.४ टक्क्य़ांनी अधिक आहे. कंपनीच्या प्रीमियम अर्थात हप्ते उत्पन्नामध्ये देखील वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत कंपनीचा ग्रोस रिटर्न प्रीमियम (जीआरपी) हा १३५.९२ अब्ज रुपये असून कंपनीने २६२ लाखाहून अधिक पॉलिसी वितरीत केल्या आहेत.

कुठलेही कर्ज नसलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने नुकताच भारती अक्सा जनरल इन्शुरन्सचा सर्वसाधारण विमा व्यवसाय ताब्यात घ्यायचे ठरविले आहे. यामुळे कंपनीचा व्यवसाय अजून विस्तारला जाऊन बाजारातील हिस्सा ८.७ टक्क्य़ांवर जाईल असा अंदाज आहे. या खेरीज कंपनीच्या भारतात ४२५ शाखा होतील तसेच एजंटांची संख्या ५४,२४९ वर जाईल. सध्या हा सौदा थोडा महाग वाटत असला तरी दीर्घ काळात कंपनीच्या व्यवसाय वाढीच्या दृष्टीकोणातून हे एक योग्य पाऊल ठरेल.

गेल्याच वर्षी याच सदरात हा शेअर सुचविला होता. त्या वेळी ज्या गुंतवणूकदारांना हा शेअर घेतला असेल त्यांना ३० टक्के फायदा झालाच आहे. अनुभवी प्रवर्तक, विम्याचे नवीन विविध पर्याय आणि उद्योगाची वाढ पाहता हा शेअर खरेदीसाठी आकर्षक वाटतो. नवीन गुंतवणूकदारांनी सध्या १३०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आपल्या पोर्टफोलियोमध्ये राखून ठेवावा.

आजच्या परिस्थितीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचविलेले शेअर्स हे तुम्हाला खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्यात करावी.

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि.

(बीएसई कोड – ५४०७१६)

शुक्रवारचा बंद भाव : रु.  १,२९९.७५

लार्ज कॅप

प्रवर्तक :                                     आयसीआयसीआय समूह

उद्योग क्षेत्र :                              सर्वसाधारण विमा

बाजार भांडवल :                          रु. ५९,०७३ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :       रु.  १,४४०/८०६

भागभांडवली भरणा :                    रु. ४५४.४८ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                              ५१.८९

परदेशी गुंतवणूकदार         २६.६१

बँक/ म्यु. फंड/ सरकार      १४.०३

इतर/ जनता                      ७.४७

पुस्तकी मूल्य :  रु. १३२.८८

दर्शनी मूल्य :   रु. १०/-

लाभांश :              ३५%

प्रति समभाग उत्पन्न :   —

पी/ई गुणोत्तर :                     ४५.४

समग्र पी/ई गुणोत्तर :           ५४.५

डेट इक्विटी गुणोत्तर :            ०.०८

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    —

रिटर्न ऑन कॅपिटल :             २८.७

बीटा :                                    ०.९०

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.