निप्पॉन इंडिया फार्मा फंड

वसंत माधव कुळकर्णी

the new york times book review
बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक

निप्पॉन इंडिया फार्मा फंड हा ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडां’च्या २०१५ च्या यादीचा भाग होता. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर २०१७ मध्ये फंडाचे यादीत पुनरागमन झाले. या वर्षी या कर्त्यांच्या यादीत त्याने पुन्हा जागा (संदर्भ : ‘अर्थ वृत्तान्त’, २० जानेवारी २०२०) मिळविली. २०१४ ते २०२० या सहा वर्षांच्या काळात चार वर्षे हा फंड कर्त्यांच्या यादीचा भाग राहिला आहे. त्यामुळे वाचकांसाठी बिलकूल नवीन नसलेल्या या फंडाची शिफारस यापूर्वी १२ जून २०१८ च्या आणि १७ सप्टेंबर २०१७ च्या ‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’मधून केली गेलेली आहे.

हा फार्मा फंड जेव्हा सुरू झाला तेव्हा १६ वर्षांपूर्वी या फंडाच्या गुंतवणुकीत केवळ औषध उत्पादक होते. उद्योगाच्या बदलत्या रचनेनुसार आरोग्यनिगा क्षेत्रातील नव्या कंपन्यांच्या भांडवली बाजारात सूचिबद्धतेमुळे सेवा पुरवठादार (रुग्णालये, निदानपूर्व चाचण्या, आरोग्य विमा इत्यादी) कंपन्यांचा समावेश गुंतवणुकीत झाला आहे. सध्या फंडाची ८५ टक्के गुंतवणूक आरोग्य निगा आणि औषधनिर्मिती क्षेत्रात तर १५ टक्के गुंतवणूक सेवा क्षेत्रात आहे.

 

आरोग्य निगा आणि ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी) ही गुंतवणुकीसाठी सुरक्षित उद्योग क्षेत्रे समजली जातात. आज मोठय़ा ग्राहकोपयोगी वस्तू निर्मात्या कंपन्यांचे मूल्यांकन महाग आहे तर आरोग्य निगा क्षेत्रातील मूल्यांकन वाजवी असल्याने गुंतवणुकीत धोका एफएमसीजी क्षेत्रातील गुंतवणुकीच्या तुलनेत कमी आहे. औषध उद्योग पाच वर्षांच्या मंदीतून बाहेर येत असल्याने कमी जोखमीत गुंतवणुकीवर माफक परतावा देणारे हे क्षेत्र असल्याने यापेक्षा गुंतवणुकीची चांगली संधी असण्याची शक्यता नाही.

भारतातील औषध निर्माण उद्योगाचा विचार केल्यास साधारण ६०-६५ टक्के विक्री निर्यातीतून आणि ३५ ते ४० टक्के विक्री देशांतर्गत होते. भारतीय औषध कंपन्यांकडून प्रामुख्याने बल्क ड्रग, फॉम्र्युलेशन व हर्बल उत्पादनांची निर्यात केली जाते. भारतातील आरोग्यनिगा क्षेत्राचा विचार केला तर सर्वसाधारण ६० टक्के व्यवसाय जेनेरिक औषधे, ३० टक्के व्यवसाय ब्रॅण्डेड औषधे आणि १० टक्के अन्य सेवा असे व्यवसायाचे विभाजन करता येईल. एकूण औषध विक्रीपैकी ४० टक्के औषधे अमेरिकेत निर्यात होतात. अमेरिका ही भारतीय औषधनिर्मिती क्षेत्रासाठी मोठी बाजारपेठ आहे. भारताच्या औषध निर्यातीचा वृद्धीदर मागील दहा वर्षे २० ते २२ टक्क्य़ांदरम्यान होता. अमेरिकेतील औषधांच्या बाजारपेठेवर भारतीय औषधनिर्मिती कंपन्यांचे नि:संशय वर्चस्व आहे. या उद्योगांपैकी औषधनिर्मिती उद्योगातून झालेल्या निर्यातीत मागील आर्थिक वर्षांत १२ टक्के दराने वाढ झाली आहे. आधीच्या वर्षांत या उद्योगाला अमेरिकेच्या व अन्य राष्ट्रांच्या औषध प्रशासनाने औषधनिर्मितीत असलेल्या त्रुटींवर शिस्तीचा बडगा उगारल्याने या उद्योगाच्या निर्यातीवर मर्यादा आल्या होत्या. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून अमेरिकेत एखादे औषध विकण्यासाठी मिळणारी परवानगी ही विशिष्ट कारखान्यात (साइट अप्रूव्हल) तयार केलेल्या औषधाला असते. यानंतर विशिष्ट उत्पादनाला (प्रॉडक्ट अप्रूव्हल) अमेरिकेत औषध वितरण करण्याची अनुमती मिळते. मागील आर्थिक वर्षांचा विचार केल्यास अमेरिकेला झालेल्या निर्यातीत सर्वाधिक २३ टक्के वाढ झाली आहे. (संदर्भ : सीएमआयई डेटा) अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने निर्यात बंदी घातलेले कारखाने, निर्मिती प्रक्रियेतील त्रुटी दूर केल्याने मागील आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीत निर्यातीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. स्थानिक बाजारपेठेवर भर असलेल्या कंपन्या आणि निर्यातीवर निर्भर असलेल्या कंपन्यांना फंडाच्या गुंतवणुकीत समान वाटा दिला आहे. मागील दोन तिमाहीत कंपन्यांच्या उत्सर्जनात वाढ झाली असली तरी ही वाढ अद्याप कंपन्यांच्या किमतीत प्रतिबिंबित झालेली नाही. सबब अनेक आघाडीच्या कंपन्या वाजवी मूल्यास उपलब्ध असल्याने या फंडाची गुंतवणुकीसाठी शिफारस करत आहे. तीन वर्षे पूर्ण झालेल्या फार्मा फंडांपैकी सर्वाधिक मालमत्ता असलेला हा फंड असून फंडाची ७२.०४ टक्के गुंतवणूक लार्ज कॅप, २१.६७ टक्के मिड कॅप आणि ३.५३ टक्के गुंतवणूक स्मॉल कॅप प्रकारच्या कंपन्यांत आहे. मागील दोन वर्षांपासून निधी व्यवस्थापक शैलेश राज भान हे गुंतवणुकीसाठी समभाग निवड अतिशय चोखंदळपणे करीत असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत त्यांनी समभागांची संख्या निम्म्यावर आणली आहे. जोखीम कमी करण्यासाठी वैविध्यापेक्षा समभागकेंद्रित जोखीम पत्करण्याचे शैलेश राज भान यांचे धोरण फळाला आल्याचे दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी पाच वर्षे आणि तीन वर्षे मुदतीत दिलेल्या परताव्याच्या क्रमवारीत अनुक्रमे आठव्या आणि दहाव्या क्रमांकावर असलेला हा फंड सध्या तीन वर्षे आणि पाच वर्षे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आलेला फंड आहे. क्षेत्रीय फंडातील गुंतवणूक नेहमीच अधिक जोखमीची असते. करोना संक्रमणापश्चात फार्मा कंपन्यांच्या सुरू झालेल्या तेजीत आश्वासक कामगिरी केलेल्या या फंडाला गुंतवणुकीत स्थान देण्यापूर्वी सल्लागाराचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.

फंडाने शुक्रवारी ५ जून रोजी सोळा वर्षे पूर्ण करून सतराव्या वर्षांत पदार्पण केले आहे. सतरावे वर्ष लागलेल्या या फंडाला म्हणूनच म्हणावेसे वाटते – ‘दिवस तुझे फुलायाचे, झोपाळ्या वाचुनी झुलायचे!’

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर