|| अजय वाळिंबे

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (बीएसई कोड – ५००२५३)

एलआयसी हाऊसिंग फायनान्स याच स्तंभातून यापूर्वीही गुंतवणुकीसाठी सुचविला गेलेला शेअर आहे. भारतातील काही आघाडीच्या आणि मोठय़ा गृहवित्त कंपन्यांपैकी ही एक मानली जाते. घरांची खरेदी, बांधकाम, दुरुस्ती, नूतनीकरण, गृह सजावट तसेच वैद्यक व्यावसायिकांसाठी दवाखाना, नìसग होम, ऑफिस इ. विविध कारणासाठी कंपनी कर्जपुरवठा करते. भारतात कंपनीची नऊ क्षेत्रीय कार्यालये असून, २०० शाखा तसेच २७३ विपणन कार्यालये आहेत. सुमारे १२,५०० एजंट आणि २,१०० कर्मचारी असलेल्या एलआयसी हाऊसिंगची देशाबाहेर कुवैत व दुबई येथे देखील कार्यालये आहेत. कंपनी आपली उत्पादने एलआयसीएचएफएल फायनान्स लिमिटेड या १०० टक्के उपकंपनीद्वारे देखील वितरित करते. एलआयसी एचएफएलच्या ४९ शाखा आहेत. सप्टेंबर २०१८ साठी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निष्कर्ष नुकतेच जाहीर झाले आहेत. कंपनीच्या कर्ज वितरणात १६ टक्के वाढ झाली असून वैयक्तिक कर्ज वितरणात ९ टक्के वाढ झाली आहे. गेल्या तिमाहीत व्याजदरात केलेल्या वाढीमुळे कंपनीला निव्वळ व्याजापोटी नफ्याचे प्रमाण (निम) २.४५ टक्के राखण्यात यश आले आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या उलाढालीत ११.९२ टक्के वाढ होऊन ती ४,१९८.२२ कोटी रुपयांवर गेली आहे. तर नक्त नफ्यातील ११.५४ टक्के वाढीमुळे कंपनीचे प्रती समभाग उत्पन्न देखील गत वर्षीच्या तुलनेत १०.१८ रुपयांवरून ११.३६ रुपयांवर गेले आहे. अनुत्पादित कर्जे १.२० टक्क्य़ांवर गेली आहेत. अर्थात हे निकाल तितकेसे आकर्षक नाहीत. मात्र तरीही सध्या शेअर बाजारात गृहवित्त कंपन्यांचे शेअर आकर्षक भावात मिळत असल्याने एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून एलआयसी हाऊसिंगचा विचार करता येईल.

मोठय़ा शहरांतून घरांची मागणी घटत असली आणि बांधकाम व्यवसायला मरगळ आलेली वाटत असली तरीही छोटय़ा शहरांतून मात्र बांधकाम व्यवसायला तसेच गृहबांधणी व्यवसायला चांगले दिवस येतील अशी चिन्हे आहेत. याची मुख्य कारणे म्हणजे सध्या चलती असलेल्या स्मार्ट सिटी योजना, पंतप्रधान आवास योजना, स्वस्त घरांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना आणि उपलब्ध असलेले अर्थसाहाय्य यामुळे आगामी कालावधीत कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. सध्या ५२ आठवडय़ांच्या तळाला असलेला हा शेअर म्हणूनच मध्यम कालावधीच्या गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटतो. मात्र तांत्रिकदृष्टय़ा हा शेअर सध्या मंदीत असल्याने प्रस्तावित खरेदी बाजार कल पाहूनच करावी. गेल्या सहा आठवडय़ांत गैरबँकिंग वित्तीय आणि गृह वित्त कंपन्यांत झालेली मोठी घसरगुंडी पाहता गुंतवणूकदारांनी अशा कुठल्याही वित्तीय कंपन्यांत गुंतवणूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे नाहीतर बुडत्याचा पाय खोलात जायचा.