फंड विश्लेषण : सोन्याहून पिवळा..!

दिवस सणासुदीचे आहेत, तसेच ते नोकरदारांना दिवाळीला मिळणाऱ्या बोनसचे सुद्धा आहेत.

बिर्ला सन लाइफ इक्विटी फंड

दिवस सणासुदीचे आहेत, तसेच ते नोकरदारांना दिवाळीला मिळणाऱ्या बोनसचे सुद्धा आहेत. नोकरदारांना बोनसचा विनिमय कसा करावा हे सुचविणाऱ्या तीन फंडांच्या मालिकेची ही सुरुवात. या ‘हाय अल्फा’ फंडांनी मागील दहा वर्षांत सोन्यापेक्षा १० टक्के अधिक परतावा दिला आहे. बोनसची थोडी रक्कम तरी या तीनपैकी एखाद्या किंवा तिन्ही फंडांत विभागून गुंतवावी हे सुचविणारा हा पहिला फंड..

उद्या विजयादशमी. विजयादशमीच्या दिवशी सोने खरेदी करण्याचा प्रघात अनेक कुटुंबांत आहे. १९९८ साली १ ऑक्टोबर रोजी विजयादशमी आली होती. १९९८ मध्ये या दिवशी १० ग्रॅम सोन्यासाठी ४,०४५ रुपये मोजायला लागले होते. ४ ऑक्टोबर २०१६ रोजी सोन्याचा भाव होता ३०,८१५ रुपये. मागील १८ वर्षांत या सोन्यातील गुंतवणुकीची ७.६५ पट वाढ झाली. बिर्ला सन लाइफ इक्विटी फंडाची पहिली एनएव्ही २७ ऑगस्ट १९९८ रोजी जाहीर झाली आणि ३० सप्टेंबर १९९८ रोजीची फंडाची एनएव्ही होती १०.९१ रुपये. ४ ऑक्टोबर २०१६ रोजी या फंडाची एनएव्ही होती ५९९.२० फंडाच्या या कालावधीतील वाढ तब्बल ५४.९२ पट इतकी आहे. टक्केवारीच्या भाषेत सांगायचे तर सोन्यातील गुंतवणुकीने या कालावधीत वार्षिक ११.२२ टक्के परतावा दिला आहे, तर या फंडाच्या गुंतवणुकीने वार्षिक २५.२३ टक्के परतावा दिलेला आहे.

३० सप्टेंबर १९९८ रोजी बिर्ला सन लाइफ इक्विटी फंडात गुंतविलेल्या १० हजारांचे ४ ऑक्टोबर रोजी ५.९९ लाख रुपये झाले आहेत. ‘लोकसत्ता-अर्थसल्ला’च्या कार्यक्रमात १५ टक्के फंड हे निर्देशांकाहून सरस कामगिरी करतात हे सादरीकरणातून सांगितले जाते. या निवडक १५ टक्के अव्वल कामगिरी करणाऱ्या फंडात आजच्या फंडाचा समावेश आहे.

१९९८ ते २०१५ या कालावधीत दसऱ्याच्या दिवशी एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवरील परताव्याचा दर

arth07हेन्री मार्कोविट्झ यांना १९५२ मध्ये गुंतवणुकीवरील परतावा व वैविध्य यांच्यातील संबंध निश्चित करणारी ‘मॉडर्न पोर्टफोलिओ थिअरी (एमपीटी)’ विकसित केली. या थिअरीचा विस्तार नंतरच्या काळात ज्या अर्थतज्ज्ञांनी केला, त्यातील एक अर्थतज्ज्ञ विल्यम शार्प. ज्यांना १९९०चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शार्प यांनी परतावा व जोखीम यांच्यातील संबंध मांडणारी पद्धती शोधली जी ‘शार्प रेशो’ म्हणून ओळखली जाते. दोन म्युच्युअल फंडांच्या योजनांची तुलना करण्यासाठी जोखीम, परतावा वैविध्य हे मोजण्याच्या पद्धती संख्याशास्त्राचा वापर करून निश्चित करण्यात आल्या. केवळ गुंतवणुकीवरील परतावाच नव्हे तर निधी व्यवस्थापकांची कार्यक्षमता मोजण्यासाठी ‘अल्फा’ या संकल्पनेचा जन्म झाला. संदर्भ निर्देशांकांच्या तुलनेत फंडाच्या निधी व्यवस्थापकाने नफा कमावण्यासाठी जी जोखीम स्वीकारलेली असते त्याला ‘बीटा’ असे संबोधण्यात येते. तर निधी व्यवस्थापकाची कार्यक्षमता मोजण्यासाठी ‘अल्फा’ हे परिमाण वापरतात. एखाद्या फंडाचा बीटा १.५ आहे व संदर्भ निर्देशांकाचा ८ टक्के परतावा असेल तर तर फंडाचा परतावा किमान १२ टक्के असायला हवा. निर्देशांकाच्या प्रमाणित विचालानाइतके फंडाचे विचलन राखून निर्देशांकाहून अधिक परताव्याची कामगिरी म्हणजे ‘अल्फा’. जसे एखाद्या फंडाचा विशिष्ट कालावधीतील परतावा १२ टक्के आहे व याच कालावाधीत संदर्भ निर्देशांकाने ८ टक्के परतावा दिला असल्यास फंडाची कामगिरी ‘१.५ अल्फा’ समजण्यात येते. परताव्याच्या दरात संदर्भ निर्देशांकाहून अधिक सातत्य राखणारे फंड ‘हाय अल्फा फंड’ म्हणून ओळखले जातात. ज्या फंडांचे निधी व्यवस्थापन सक्रिय आहे अशा फंडाचा हाय अल्फा फंडात समावेश होतो. एस अ‍ॅण्ड पी बीएसई २०० हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. आजच्या फंडाने मागील १२ वर्षे निर्देशांकापेक्षा कमी जोखीम घेऊन निर्देशांकाहून सरस कामगिरी केली आहे. हा फंड मागील दहा वर्षांत डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड गटात सर्वाधिक ‘अल्फा’ देणारा फंड आहे.

अलायन्स अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाने अधिग्रहण केल्यानंतर या फंडाचे ‘बिर्ला सन लाइफ इक्विटी फंड’ असे नामकरण केले. हा फंड ‘बिझनेस सायकल’ फंड आहे. बिझनेस सायकल फंड हे आर्थिक आवर्तनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रांत गुंतवणूक करणारे फंड असतात. सध्या फंडाच्या निधी व्यवस्थापकांनी सर्वाधिक गुंतवणूक खासगी बँका, गैरबँकिंग वित्तीय कंपन्या, वाहन व वाहन पूरक उत्पादने करणाऱ्या कंपन्या, आरोग्य निगा या चार उद्योग क्षेत्रांतून केली असून पाचव्या क्रमांकावर ‘सीएलओबी’ अर्थात रोकड सुलभ गुंतवणुका आहेत. ऑगस्ट महिन्यात फंडाच्या गुंतवणुकीतून चार कंपन्यांना वगळले गेले तर आठ कंपन्यांचा नव्याने समावेश करण्यात आला. फंडाने ऑगस्ट महिन्यात नव्याने समावेश केलेल्या कंपन्यांत वेदान्त, अशोक लेलॅण्ड, गेल, आयडीएफसी व एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्जची वर्णी लागली तर, भारत फोर्ज, अ‍ॅक्सिस बँक, मदरसन सुमी यांना गुंतवणुकीतून वगळले गेले.

ऑगस्ट महिन्यात फंडाच्या गुंतवणुकीत ६५ कंपन्यांचा समावेश होता. फंडाच्या गुंतवणुकीपैकी ५९.५७ टक्के गुंतवणूक लार्ज कॅप प्रकारच्या कंपन्यांतून केली असून ३०.१० टक्के गुंतवणूक मिड कॅप प्रकारच्या कंपन्यांतून केली आहे. मागील १२ महिन्यांतील निच्चांकी एनएव्ही २५ फेब्रुवारी २०१६ रोजी ४११.८४ रुपये तर उच्चांकी एनएव्ही ६ ऑगस्ट २०१६ रोजी ५१०.१६ रुपये नोंद झाली आहे. हा फंड याच फंड घराण्याच्या बिर्ला सन लाइफ अ‍ॅडव्हान्टेज फंडाप्रमाणे समभाग केंद्रित जोखीम स्वीकारणारा फंड नाही.

हा फंड क्रिसिलच्या सातत्य राखणाऱ्या फंडांच्या यादीत जरी नसला तरी मागील प्रत्येक तीन तिमाहीत फंडाच्या कामगिरीत सुधारणा होत असल्याने फंडाची पत क्रिसिलने एका पायरीने सुधारली आहे.

arth08

दिवस सणासुदीचे आहेत तसे नोकरदारांना दिवाळीला मिळणाऱ्या बोनसचे सुद्धा आहेत. नोकरदारांना बोनसचा विनिमय कसा करावा हे सुचविणाऱ्या ‘हाय अल्फा’ फंडाच्या तीन भागांच्या मालिकेची सुरुवात या फंडाने केली. मागील दहा वर्षांत या तीनही फंडांनी सोन्यापेक्षा १० टक्के अधिक परतावा दिला असल्याने बोनसची थोडी रक्कम तरी या तीनपैकी एखाद्या किंवा तीनही फंडांत विभागून गुंतवावी हे सुचविणारा हा पहिला फंड.

(अस्वीकृती: लेखात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

shreeyachebaba@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Birla sun life equity fund

ताज्या बातम्या